Click "Follow" Button below To Follow this Blog

३०/०७/२०२६

Article on abusing and vulgarllity in jantar mantar protest

 ना माँ का डर, ना बाप का डर बेटा निकला व्हॉलेंटीयर 

जंतर-मंतर दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात  तरुण तरुणींनी केलेला अश्लीलतेचा कळस पाहून त्यांची कीव येते, रागही अनावर होतो. हे निर्लज्ज तरुण तरुणी त्याच वैभवशाली देशातील आहे का ज्या देशात अनेक महान तरुण होऊन गेले.

लहानपणी अभ्यास न करता जी मुले निव्वळ खेळायला, हुंदडायला जाणाऱ्या मुलांना  वडील मंडळी शीर्षकात जी हिंदी भाषेतील म्हण दिली आहे ती ऐकवत असत. बरेच राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचे वॉलेंटियर बनावे म्हणून आवाहन करीत असतात. नुकत्याच नव्याने जन्म घेतलेल्या आणि अजब नांव धारण केलेल्या झुरळ पार्टीने सुद्धा तसे आवाहन त्यांच्या वेबसाईटवरून केलेले आहे. त्याच पार्टीने नीट पेपरफूट प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले आणि त्यासाठी लाखो Gen Z तरुण रस्त्यावर उतरले होते. आंदोलना दरम्यान या तरुणांनी मांडलेला उच्छाद अवघ्या जगाने पाहिला. या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रचलित झाले  तरुण-तरुणींच्या तोंडातून देशाच्या पंतप्रधानांना दिलेल्या शिव्यांची लाखोली ऐकून भारतातील सुज्ञ, विचारी, संस्कारी जनांना वाईट वाटले, वेदना झाल्या. शिव्याच नव्हे तर अश्लील हावभाव सुद्धा Gen  Z पिढीतील काही तरुण करत होते. एका महिला पत्रकाराचा विनयभंग सुद्धा या दरम्यान झाला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे काही गैर नाही. सरकार जर का काही चुकीचे करत असेल तर आंदोलन होणारच पेपरफुटीचे प्रकरण झाल्यावर cjp ने आंदोलन पुकारले परंतु नीट पेपरफुटीमध्ये सहभागी असणाऱ्यांवर सरकारने कारवाई केलेली होती.  काहींना अटक सुद्धा झाली होती. तरीही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा तगादा सीजेपीने लावला व अखेर त्यांनी तो दिला. त्यांच्या  आंदोलनात काही समाजकंटक सहभागी झाले आणि त्यांनी शिव्या, अश्लील हावभाव, तोडफोड, पोलिसांवर हल्ले, सार्वजनिक संपत्तीची नासधूस अशी कृत्ये केली पण असे करणारे तरुण हे सीजेपीचे नव्हते असे अभिजीत दिपके यांनी सांगितले. पण ते कोण होते हे आता हळूहळू पुढे येत आहेच. काही तरुणांची मजल तर भारतीय सेना, पोलीस यांच्याविरुद्ध अपशब्द काढण्यापर्यंत त्यांना धक्काबुक्की करणे व मारण्यापर्यंत गेली. कोण होते हे तरुण ? यांची एवढी हिंमत कशी काय होते ? यांना मदत करणारे कोण होते ? यांच्या मागे आतंकवादी , देशविघातक लोकं होते का ? याचा सर्व शोध तपास यंत्रणा आता घेतीलच. मोदींना हुकुमशहा म्हणत हे नतद्रष्ट तरुण त्यांना शिव्या देत होते. मोदी जर हुकूमशाह असते तर हे तरुण त्यांना अशा मोकाटपणे सुसाट शिव्या देऊ शकले असते का ? यांना हुकूमशहा कसा असतो ते दाखवण्यासाठी अफगाणिस्तान, दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये पाठवायला हवे. हिटलरची कृत्ये वाचायला द्यायला हवी. तेंव्हा यांना लोकनियुक्त पंतप्रधान आणि हुकुमशाह यातला फरक कळेल. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की जो लोकशाहीचे तंतोतंत अनुसरण करतो. या देशाने कित्येक असे तरुण पहिले आहे ज्यांनी अल्पायुष्यात मोठी प्रगल्भता दाखवून महान कार्ये केली आहे. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तोरणा किल्ला जिंकला तेव्हा शिवाजी महाराज सोळा वर्षाचे होते, 

उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या ।
विचार पाहतां प्रत्यया आल्या । यथातथ्य ॥
शिव्या दिल्या की त्या अंतरात्म्याला जाऊन लागतात असे सांगणारे रामदास स्वामी ऐन तारुण्यात घर सोडून बाहेर पडले होते व जगाला दासबोध सारखा ग्रंथ दिला, वयाच्या तिशीत  अमेरिकेमध्ये हिंदू धर्माची पताका फडकवून, भारताचा नावलौकिक वाढवून स्वामी विवेकानंद 39 व्या इहलोक सोडून गेले होते, वयाच्या चाळिशीत महापराक्रमी बाजीराव पेशव्याने 41 लढाया जिंकून शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा भारतभर विस्तार केला होता, सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू या तरुणांनी ऐन तारुण्यात देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते, प्राण दिले होते. अशा या तरुणांची यादी केली तर त्या यादीनेच कितीतरी पाने भरून जातील. अशा या तरुणांच्या देशात जंतर-मंतर दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात काही तरुण-तरुणींनी केलेला अश्लीलतेचा कळस पाहून त्यांची कीव येते, रागही अनावर होतो. हे निर्लज्ज तरुण-तरुणी त्याच वैभवशाली देशातील आहे का ज्या देशात वर उल्लेखलेले महान तरुण होऊन गेले ? असा प्रश्न या देशवासीयांना हे आंदोलन पाहून पडला.
     Gen  Z पिढीतील अनेक तरुण हे चांगल्या इमारती, भरमसाठ फी, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या शाळा महाविद्यालयातून शिकलेले आहे. त्यापैकीच काही या आंदोलनामध्ये समाविष्ट होते. मग यांना खरोखरच चांगले शिक्षण मिळाले आहे ? यांनी जिथे शिक्षण घेतले त्या शिक्षण संस्था भरमसाठ फी घेऊनही यांना एक आदर्श विद्यार्थी का घडवू शकल्या नाहीत ? की खरे विद्यार्थी हे घरीच होते व  आंदोलनकर्त्यांमध्ये मध्ये सर्व समाजकंटक आणि देशविघातक प्रवृत्ती होत्या ?  मोठमोठ्या शहरांमधील इंग्रजी शाळांमधून, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य मिळत आहेत का ? असे काही प्रश्न या आंदोलनातील काही तरुण-तरुणींना अश्लील हावभाव आणि शिवीगाळ करतांना पाहून तमाम देशवासीयांना पडले आहे. 
         विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांचा सत्ता प्रवेशासाठी मार्ग म्हणून उपयोग करणाऱ्या सगळ्या पक्षांच्या उपद्रवी कार्यकर्त्यांना या देशातील जनता "ना माँ का डर, ना बाप का डर बेटा निकला व्हॉलेंटीयर" असेच आज म्हणत असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा