Click "Follow" Button below To Follow this Blog

१२/०६/२०२५

Article about Raja Raghuvanshi murder case

 कालाय तस्मै नमः 

सोशल मिडियामुळे  गेट-टुगेदर होण्याचे प्रस्थ सुद्धा वाढले आहे. अनेक वेळा गेट-टुगेदर मधून जुन्या प्रेम प्रकरणांना उजाळा मिळतो आहे. जे जुन्या काळात होऊ शकले नाही ते प्रेम पुनश्च भेटल्यानंतर उफाळून येत आहे आणि त्यातून मग वैवाहिक जीवनात नवीन पेच निर्माण होतो आहे.

उपनिषदांमध्ये सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे. एका राजाची कन्या सत्यवान नावाच्या लाकूडतोड्या सोबत लग्न करते. पुढे जंगलात वडाच्या झाडाखाली सत्यवान मृत्युमुखी पडतो. त्याचे प्राण यमराजकडून परत मिळवण्यासाठी सावित्री यमराजाच्या मागे जात राहते आणि त्याला तिच्या पतीचे प्राण परत करावे म्हणून विनंती करत राहते. तिच्यात आणि यमराज यांच्यात मोठा संवाद होतो. तो पुर्ण संवाद येथे दिल्यास लेख मोठा दिर्घ होईल आणि आजकाल अलक (अति लघु कथा) चा जमाना आहे. म्हणून इथे थोडक्यात सांगत आहे. शेवटी यमराज या युक्तिवादात पराभूत होतात आणि सावित्रीला पुत्रवती भव असा आशीर्वाद देतात आणि सावित्री मग माझ्या पतीशिवाय मी पुत्रवती कशी होऊ शकेल ? म्हणून यमाराजाला पेचात पकडते आणि यमराज सत्यवानाचे प्राण परत करतो अशी ती कथा आहे. या गोष्टीचे स्मरण म्हणून भारतामध्ये दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी व्रत करते आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून ईश्वराजवळ प्रार्थना करते. आपली पत्नी आपल्यासाठी व्रत ठेवते याचा काही ना काही परिणाम पतीच्या वर्तणुकीवर सुद्धा होतच असतो. त्या दोघात प्रेमाची भावना वृद्धिंगत होत असते. तसेच या सणामुळे वृक्ष संवर्धन,  वृक्ष प्रेम याचा सुद्धा संदेश आपसुकच मिळतो. सत्यवान सावित्रीच्या कथेमुळे भारतातील स्त्रीला तिचा पती हा सर्वस्व आहे आणि तो तिला जीवनभर साथ देणार आहे म्हणून तो दीर्घायुषी असावा असा संदेश मिळतो.  शतकानुशतके भारतातील स्त्रिया हे व्रत साज-या करत आलेल्या आहे. भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा वडाचे झाड नसते म्हणून वडाच्या फांदीची, वडाच्या झाडाच्या प्रतिकृतीची पूजा NRI स्त्रिया करतात. 

    अशी ही सर्वांना ज्ञात असलेली वटसावित्रीची कथा जरी असली तरी आता मात्र काळ झपाट्याने बदलतो आहे. कुटुंब संस्कृती लोप पावत चालली आहे. अशातच सोशल माध्यमांमुळे स्त्री-पुरुषांची ओळख मोठ्या प्रमाणात होते आहे तसेच त्यांच्यामध्ये संवाद सुद्धा साधला जातो आहे, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड कल्चर मोठ्या प्रमाणात फॉफावले आहे. लिव्ह इन रिलेशनशिप प्रकार पण बोकाळला आहे त्याबरोबरच सोशल मिडियामुळे जुनी मित्रमंडळी सुद्धा जोडल्या जात आहे. त्यांचे गेट-टुगेदरचे प्रस्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुणाईलाही लाजवेल अशा जोशात, जल्लोषात  वाढले आहे. अनेक वेळा गेट-टुगेदर मधून जुन्या प्रेम प्रकरणांना उजाळा मिळतो आहे. जे जुन्या काळात होऊ शकले नाही ते प्रेम पुनश्च भेटल्यानंतर उफाळून येत आहे आणि त्यातून मग वैवाहिक जीवनात नवीन पेच निर्माण होतो आहे. सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या प्रकरणात सोशल मिडीयाचा किंवा गेट-टुगेदर वगैरेचा अद्याप तरी काही निष्कर्ष पोलिसांनी काढलेला नाही परंतु तरी इथे हा विषय मांडावासा वाटला.

    पुर्वीच्या पतीवर अवलंबून राहणाऱ्या स्त्रियांना पती हा परमेश्वर आहे अशी शिकवण दिली जात असे पण आता स्त्रिया या स्वावलंबी झालेल्या आहेत आणि त्यांना पतीवर अवलंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. या लेखात सर्वच स्त्रियांना दोष देण्याचा मुळीच उद्देश नाही उलट माधवी लता सारख्या काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच असा पूल बांधणाऱ्या तरुणी सुद्धा आजच्याच काळात आहे. परंतु गेल्या काही वर्षात असे अनेक गुन्हे घडले की ज्यामध्ये स्त्रियांनी त्यांच्या पतींची हत्या केली आहे. सौरभ नामक पतीला मारून त्याचे तुकडे टाकीत टाकून ती टाकी सिमेंटने बंद करून टाकणा-या मुस्कानची घटना सुद्धा ताजीच आहे आणि आता परवा वटपौर्णिमेच्याच आसपास सोनम रघुवंशी नामक नवविवाहितेने तिच्या पतीची मेघालयात मधुचंद्राच्या वेळेस हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सोनमने तिच्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे. सोनमला जर राजा रघुवंशी सोबत लग्नच करायचे नव्हते तर तिने ते का केले? लग्न केल्यावरही ती त्याला घटस्फोट देऊ शकत होती पण तिने तसे सुद्धा नाही केले आणि राजा रघुवंशीचा नाहक बळी गेला. भारतीय स्त्रिया, भारतीय पुरुष,  भारतीय कुटुंब यांच्या  विचारसरणीमध्ये झपाट्याने बदल झालेला आता दिसतो आहे. काहीही होऊ द्या आम्हाला फक्त एन्जॉय पाहिजे ही वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढते आहे.

    राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणांमधून तरुण मुला मुलींना हेच सांगावेसे वाटते की तुम्हाला जर का कोणी पसंत नाही तर त्याच्याशी लग्नच करू नका. लग्न केल्यावर पटत नसेल तर कायदेशीर रित्या विभक्त व्हा परंतु कट करून हत्या करणे, कुणाच्या कुटुंबाला दुःखाच्या सागरात बुडवणे यासारखे  कृत्य  करू नका. 

     आज-काल आपल्याच संस्कृतीला, कथांना सणांना नावे ठेवण्याची सवय झालेली आहे. अनेकांना सत्यवान सावित्रीच्या कथेचा येथे केलेला उल्लेख सुद्धा रुचणार नाही कुणी त्याला भाकडकथा ही म्हणेल परंतु या कथेमधून पती आणि पत्नी मधील प्रेम वृद्धिंगत होण्यास हातभार लागतो हेही तितकेच खरे आहे. पत्नी जेव्हा पतीसाठी व्रत करते तेव्हा आपोआपच पतीला सुद्धा तिच्याबद्दल आदर वाटू लागतो, कुटुंब यशस्वीरित्या पुढे जात राहते. पती पत्नीत योग्य संवाद असेल तर त्या घरातील मुलांची मानसिक व शारीरिक वाढ सुद्धा योग्य प्रकारे होते. समाजात प्रत्येक वेळी आणि प्रत्येक जातीत सुद्धा चांगल्या वाईट अशा प्रवृत्ती असतात हजारो वर्षांपूर्वी पतीचे प्राण यमराज कडून परत आणणारी स्त्री होऊन गेली आणि आता मात्र सोनमसारख्या तरुणीने तिच्या पतीस यमसदनी पाठवले आहे.  यावर कालाय तस्मै नमः नाही म्हणावे तर काय म्हणावे ?

०५/०६/२०२५

Article about increasing number ofaccidents

वाहन नियंत्रणात असावे


    वाहन म्हटले की स्टेअरिंग, इंजिन मधील अनेक चक्रे, गाडीची चाके हे आलेच. चाक म्हणजे चक्र. चक्र हे भगवान विष्णूच्या हाती असणारे आयुध त्यामुळे या चक्राला  आपल्या नियंत्रणात ठेवणे, त्याचा आदर करणे हे सदैव ध्यानात ठेवले पाहिजे.

आज भारतात चकचकीत रस्त्यांचे जाळे विणल्या गेलेले आहे. कधी नव्हे असे रस्ते भारतात निर्माण झाले आहे. या रस्त्यांसोबतच भारतात प्रचंड खप होतो तो म्हणजे वाहनांचा. निरनिराळ्या कंपन्यांच्या चार चाकी आणि  दुचाकी वाहनांचा मोठा खप भारतात दरवर्षी होत असतो. तसेच नवीन नवीन मॉडेल सुद्धा बाजारात उपलब्ध होत असतात. तरुणांना क्रेझ असते दुचाक्यांची अर्थात बाईकची. नाईट रायडर्स म्हणून एक संकल्पना सुद्धा भारतातील मोठ्या शहरांमध्ये चांगली फोफावली आहे. यामध्ये रात्री रस्ते सुनसान असताना वेगाने बाईक रायडिंग केले जाते. काही तरुण तर दिवस असो अथवा रात्र, गर्दी असो अथवा सुनसान रस्ता त्यांचे वाहन मात्र सुसाटच धावत असते. तरुण म्हटले की जोश उत्साह साहस हे सर्व आलेच परंतु या साहसामुळे, उत्साहामुळे, जोशामुळे इतरांच्या जीवावर संकट येता कामा नये. मी स्वतः अनेक तरुणांना भर रहदारीच्या रस्त्यावरून वेगाने वाहन चालवतांना पाहिले आहे.

     सुटाळा खामगाव, येथील शुभम दुतोंडे हा  रविवार 1 जुन रोजी स्पर्धा परिक्षेसाठी म्हणून  खामगावहून अकोला येथे जाण्यास निघाला. हायवेवर चढतांना विरूद्ध दिशेने येणाऱ्या बाईकस्वारांनी शुभमच्या गाडीला जोरात धडक दिली, त्याला अकोला येथील  रुग्णालयात नेण्यात आले, मेंदूला जोरात मार लागला होता, शस्त्रक्रिया झाली, परंतू 4 तारखेला त्याची प्राणज्योत मालवली. सायंकाळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. B.tek झालेला शुभम एम.पी.एस.सी ची तयारी करीत होता. खामगांवात अनेकांना परिचित अशा हिंदुस्तान लिव्हर मधील रामेश्वर दुतोंडे यांचा  शुभम हा तरुण मुलगा आज बाईक अपघातामुळे निधन पावला हे सर्वांसाठी मोठे शोकदायक आहे. शुभमसारख्या हुशार, तरुण मुलाचे निधन झाले. समोरून विरुद्ध दिशेने येणा-या दुचाकीस्वारांच्या चुकीमुळे या बाईक अपघातात शुभमचे निधन झाले असे वृत्त आले आहे. यावरून इतर तरुणांनी बोध घ्यावा. तरुणांच्या अकाली निधनाने समाजाची, देशाची न भरून निघणारी हानी होत असते शिवाय परीवारजनांना सुद्धा असा अकाली मृत्यू हा धक्कादायक आणि शोककारक असतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा रस्त्यावरती अत्यंत सुंदर "संतुलित वेग सुरक्षित जीवन" , "सडक पे मस्ती जान नही सस्ती" , "नजर  हटी दुर्घटना घटी", अशा पाट्या लिहिल्या असतात. पण अशा पाट्यांकडे साफ दुर्लक्ष केले जाते आणि चकचकीत रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने हाकली जातात. तसे पाहिले तर नवीन  रस्ते हे दुभाजकांसह आहे परंतु अपघातांची संख्या ही कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे यावर सर्वांनीच विचार करणे अत्यंत आवश्यक झाले आहे

     कोणतेही वाहन म्हटले की त्याला चाक आलेच.  चाक म्हणजे चक्र आणि चक्र हे भगवान विष्णूच्या हाती असणारे आयुध त्यामुळे या चक्राला आपल्या नियंत्रणात ठेवणे, त्याचा आदर करणे हे आपण नेहमीच ध्यानात ठेवले पाहिजे. या लेखाद्वारे सर्व तरुणांना हेच आवाहन करण्यात येते की त्यांनी  वाहन नियंत्रित वेगातच चालवावे. 

२९/०५/२०२५

Article about vaishanavi hagwane suicide.

 दुल्हा बिकता है 

कायदा जर का स्त्रियांच्या बाजूने आहे तर याची सुशिक्षित वैष्णवीला तिची जाऊ मयुरीला किंवा वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींना त्याची कल्पना नसेल असे म्हणता येणार नाही. मग वैष्णवीवर आत्महत्या करायची वेळ का आली?

दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे
ये जो संसार है चोर बाजार है
धोखा बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर दुल्हा बिकता है या चित्रपटातील हे उपरोक्त शीर्षक गीत अनेक वेळा आठवले आणि समाजात अनेक वर्षापासून चालत आलेली हुंडा प्रथा,  वधूचा छळ, हुंडाबळी अशी दुल्हा बिकता है ची स्थिती आजच्या बदललेल्या भारतातही कायमच असल्याचे जाणवले. 

     गेल्या काही दिवसापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी प्रेमविवाह असूनही वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींकडून भरमसाठ असा हुंडा वस्तू,  रोख आणि सोन्याच्या रूपात वसूल केला. यामध्ये आलिशान फॉर्च्युनर गाडी, 51 तोळे सोने यांचा समावेश आहे. गौहर कानपुरी यांनी  1980 च्या दशकात रचलेल्या खालील ओळी किती समर्पक आहेत बघा

माल-ओ-जर भी मिले और मका दहेज मे
माँगते है जमी आस्मा दहेज मे
रिश्ते नातो के होते है सौदे यहा
पाँव पर गिर गयी पगड़िया दहेज मे
रस्म के नाम पे धर्म के नाम पे
दाता बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे

वधू, घर, जमीन हे सगळे प्रथेच्या, धर्माच्या नावाखाली मागून नात्यांचा व्यापार केला जातो.  आज समाज एवढा पुढे गेला असतांनाही, स्त्रिया विविध क्षेत्रात पुढे गेल्या असतांनाही वैष्णवी सारख्या स्त्रीला सासरच्या जाचामुळे आत्महत्या करावी लागते आणि तिच्या मोठ्या जावेलाही तसाच त्रास सहन करावा लागतो ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. विवाह ठरल्यावर कुटुंबात किती आनंद असतो, वधूच्या मनी किती स्वप्ने असतात. पण जेंव्हा सासरची मंडळी जाच देतात तेंव्हा कवी गौहर कानपुरी यांना सनई जणू ओरडते आहे वाटते, डोली त्यांना वेश बदललेली अर्थी वाटते आणि बरेचदा दुर्दैवाने तसेच घडत सुद्धा असते.

चीखे शहनाई आगन से डोली चली
भेष बदले हुए जैसे अर्थी चली
बाप माँगे दुआ लाज रख ले खुदा
लाल जोड़े मे छुपके ग़रीबी चली
वक़्त है निर्दयी मा तो रोने लगी
परदा बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे

पोटची मुलगी नेहमीसाठी दूर जाणार म्हणून  आई बिचारी रडत असते, बाप पोरीच्या सुखासाठी देवाची करुणा भाकत असतो. वैष्णवीचे सुद्धा असेच झाले आधी आवडत्या मुलाच्या घरी तिची डोली तर गेली पण काही दिवसातच अर्थी सुद्धा निघाली.         

     आज कायदा हा स्त्रियांच्या बाजूने आहे किंबहुना असे म्हटले तर हरकत नाही की कायदा इतका काही स्त्रियांच्या बाजूने आहे झाला आहे की पत्नी पिडित पतींची संघटना सुद्धा स्थापन झाली आहे. पतीला मारून टाकून त्याच्या शरीराचे तुकडे सिमेंटने टाकीत बंद करून टाकणा-या निष्ठूर बायका आहे. यवतमाळच्या जंगलात पतीला जाळून मारणा-या स्त्री सारख्या स्त्रिया सुद्धा अनेक आहेत. हे वास्तव सुद्धा नाकारता येणार नाही. 

     पण कायदा जर का स्त्रियांच्या बाजूने आहे तर याची सुशिक्षित वैष्णवीला तिची जाऊ मयुरीला किंवा वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींना त्याची कल्पना नसेल असे म्हणता येणार नाही. मग वैष्णवीवर आत्महत्या करायची वेळ का आली ? तर हगवणेसारखे मोठमोठे लागेबांधे असलेले अनेक दबंग कुटुंब आजही स्त्रियांवर अत्याचार करत असतात. त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना आजही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. वैष्णवी, मयुरी या दबंग हगवणेच्या अशाच शिकार झाल्या.

     हुंडाबळी कधी बंद होणार ?  30-40 वर्षांपूर्वी हुंडाबळीच्या अनेक घटना घडल्या होत्या,  आजही घडत आहेत याला काय म्हणावे ?  याला अटकाव कसा होईल ? आजही हुंडा का द्यावा लागतो ? आजही फॉर्च्यूनर आणि 51 तोळे सोने देऊन नवरा मुलगा विकत का घ्यावा लागतो ? हुंडा न घेण्याचे प्रतिज्ञापत्र घेणे, आयकर नियमात हुंड्याबाबत काही करता येईल का ? यावर सरकारने विचार करणे अत्यावश्यक झाले आहे.  स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या हगवणेसारख्या लोकांना हगवण लागेल अशा शिक्षा करणे आवश्यक आहे.

कब तलक़ दुल्हनो की चढ़ेगी बली
मसली जाएगी कब तक ये नाज़ुक कली
ये है बेटी तेरी ये तेरी बहन है
राम गोपाल हो या शराफ़त अली
सब है बहरूपीए इनसे ये पूछिए
सपना बिकता है बोलो खरीदोगे
दूल्हा बिकता है बोलो खरीदोगे
वैष्णवीसारख्या अशा आणखी किती मुलींचे बळी जाणार आहे ? किती अशा नाजूक कळ्यांना कुस्करल्या जाणार आहे ? सरकारने हगवणेसारख्या दबंग, हुंडा घेणाऱ्या, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना अशी काही चांगली अद्दल घडवली पाहिजे की, पुन्हा कुण्या वैष्णवीला आत्महत्या करावी लागणार नाही अशा काही उपाययोजना, कठोर नियमावली घालण्याची गरज झालेली आहे अन्यथा दुल्हा बिकता आहे प्रमाणे हुंडाबळी हे सर्व सुरूच राहील. 

      शेवटी आणखी एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते की, एरवी अनेक गोष्टींसाठी मोर्चे आंदोलने या महाराष्ट्रात होतात मग वैष्णवी आत्महत्या प्रकरणांमध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, तोडफोड कशी काय झाली नाही ? ही सुद्धा तमाम महाराष्ट्र वासियांसाठी आश्चर्यजनक अशी बाब आहे.

२७/०५/२०२५

Small article about Sawarkar

मुलांना ओघवती भाषा कशी येईल ? 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या 142 व्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. पु. ल. देशपांडे यांनी सावरकर पुण्यतिथी निमित्त 26 फेब्रुवारी 1983 रोजी अंदमान येथे दिलेल्या भाषणातील अंश येथे देत आहे.

सावरकरांनी किती त-हांची श्रीमंती आपल्याला दिली आहे. भाषेवरून मला आठवतंय सावरकरांनी रूढ केलेले कितीतरी शब्द आपण वापरत असतो. ते आपल्याला माहिती नसतं. सुरुवातीला जेंव्हा ते आले, तेंव्हा ते कसे काय रूढ होणार, म्हणून त्यांची चेष्टा झाली. परंतु ते सरकारी खात्यांनं रूढ केलेले शब्द नव्हते. तर एका प्रतिभावंत कवीनं रूढ केलेले शब्द होते. या दोनात फरक असतो ! 'मोले घातले रडाया' म्हणून सरकारात भाषाशुद्धीचे लोक बसवलेले असतात. इकडची डिक्शनरी घेऊन इकडे शब्द घाल, अस त्यांचा चालू असतं. पण हा प्रतिभासंपन्न कवी होता. 'रिपोर्टर'च भाषांतर करताना त्यांनी 'वार्ताहर' असं केलं. वार्तांच, म्हणजे बातम्यांचं हरण करणारा, खेचून नेणारा,  तो वार्ताहर... इथे  प्रतिभासंपन्न कवीची छाप दिसते. आज महाराष्ट्र किंवा अगदी पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरीसुद्धा 'मेयर' याच्यापेक्षा 'महापौर' याचा अर्थ लोकांना जास्त कळतो. संपादक आणि वृत्तपत्रातील बाकीचे पदाधिकारी त्यांची पदं हे सगळे आजचे रूढ शब्द सावरकरांनी दिलेत. चित्रपटसृष्टीतल्या लोकांचे तर सगळे शब्द सावरकरच देत आहेत. दिग्दर्शक हा शब्द त्यांनी दिला. संकलक हा शब्द त्यांनी दिला. अशा तऱ्हेनं त्यांनी मराठी भाषा समृद्ध केलेली आहे.

     आजही जर मुलांना ओघवती भाषा शिकवायची असेल, त्यांचं बोलणं जास्त चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे निबंध रोज मोठ्याने वाचून घ्यावेत म्हणजे वैचारिकदृष्ट्याही तो मुलगा मोठा होईल आणि भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीनंही तो मुलगा मोठा होईल.

👉प्रेम वैद्य यांच्या 'स्वातंत्र्यवीर' या 2007 च्या दिवाळी अंकातील अंदमानच्या कोठडीतून या  लेखावरून साभार.

👉 प्रेम वैद्य यांना उपरोक्त माहिती 'हिंदू अस्मिता' 16, एम.आय.जी. ( शॉप कम रेसिडेन्स ) नंदा नगर, मेन रोड इंदोर - 452011 दिनांक 16 मे 2000 च्या अंकातून प्राप्त झाली आहे.

संकलक - विनय वरणगांवकर

मुक्त पत्रकार तथा स्तंभलेखक , खामगांव


२२/०५/२०२५

36 banglow demolished in PuneLand mafia

36 बंगले जमीनदोस्त


खरेदी-विक्री, टाऊन प्लॅनिंग, महसूल विभाग अशा बांधकाम संबंधित कार्यालयात अवैध परवानगी देणाऱ्यांवर तसेच अवैध बांधकाम करणाऱ्या भू माफियांवर कठोर कारवाई करणे आवश्यक झाले. आहे नाहीतर या लोकांमुळे जंगले, नद्या, डोंगर लवकरच नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.


     जमिनीसाठी मुंबई, पुणे तसेच इतरही अनेक शहरात अनेक गैरकायदेशीर कृत्ये घडली आहेत, घडत आहेत. येथे मोठ्या संख्येने भूमाफियांचे जाळे निर्माण झाले आहे. आदर्श घोटाळा हा सुद्धा सदनिकांच्या मोहातूनच घडला होता. आज आदर्श इमारत भकास आहे.  विकासक व भूमाफिया जमिनीसाठी कुठल्याही थरास जाण्यास तयार आहेत. मग ते एखाद्याचा जीव घेणे असो किंवा मग नदी, नाल्यांमध्ये अतिक्रमण करून पर्यावरणास क्षती पोहोचवणे असो. 
     मागे एकदा रवी तिवारी यांनी पवईत डोंगर हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पवई येथे काही दिवसांपूर्वी डोंगर होता परंतू अल्पावधीतच हा डोंगर कसा काय पोखरला जाऊ शकतो? असे म्हटले होते. पवईतील नागरिकांना या डोंगरामुळे जो काही निसर्गाचा आनंद मिळत होता. त्या आनंदास ते आता मुकले आहेत. 
   परवा पुण्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने  36 आलिशान बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केल्याचे वृत्त झळकले. 31 मे पर्यंत ही बंगले पाडण्याची कारवाई सुरू राहणार आहे. गट नंबर 90, चिखली, ता. हवेली, जि. पुणे इथे "रिवर विला हाउसिंग सोसायटी" या अंतर्गत नदीच्या पात्रामध्ये विकासकाने (बिल्डर) येथे 36 बंगल्यांचे अवैध बांधकाम केले होते. ज्या इंद्रायणी नदीतून तुकाराम महाराजांचे अभंग जसेच तसे प्राप्त झाली होते,  ज्या इंद्रायणी काठी देवाची आळंदी आहे, ज्ञानेशाची समाधी लागली आहे त्या इंद्रायणीच्या पात्रातच या अवैध बंगल्यांचे बांधकाम झाले होते. या अवैध बांधकामाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी देतांना सुप्रीम कोर्टाने बंगले पाडण्याचा आदेश दिला तसेच मालकांना पाच कोटी रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला. ज्या लोकांनी या बंगल्यांमध्ये गुंतवणूक केली होती मेहनतीचे पैसे लावले होते आज त्यांच्यावर रडकुंडीची वेळ आलेली आहे. 
     आता मुद्दा हा आहे की गृह कर्ज हे तात्काळ उपलब्ध असल्यामुळे घर लवकर बांधता येते.  पुर्वी लोक वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहात कारण इझी लोन नव्हते. आता या इझी लोन मुळे फ्लॅट, प्लॉट, घर यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रियल इस्टेट असल्यामुळे लोक त्यात गुंतवणूक करतात आणि लोकांची घराची मागणी असल्यामुळे मग बांधकाम व्यवसायिक सुद्धा अल्प मोबदल्यात शेती विकत घेतात आणि तेथे ले-आउट निर्माण करतात. यात गैरकायदेशीर पद्धतीने सुद्धा कामकाज केले जाते, विकासक त्याचे पैसे प्राप्त करून मोकळा होऊन जातो पण पुढे घरमालकाला मात्र सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा नाहक त्रास  होतो. 
   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने किंवा प्रशासनाने हे बंगले निर्माण होण्यापूर्वीच जर कडक धोरण स्वीकारले असते तर कदाचित इथे बंगलेच निर्माण झालेच नसते परंतु झारीतील शुक्राचार्यांमुळे हे बंगले उभे राहिले आणि आता ते पाडण्याचे काम सुरू आहे. 
   भूमाफिया, विकासक हे नियम, कायदे यांची सर्रास पायमल्ली करण्यास कसे काय धजाऊ शकतात ? झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? भूमाफिया, विकासक यांनी कायदे, नियमांचा भंग करण्यासाठी दिलेल्या नजराण्यांमुळे अशी अवैध बांधकाम करण्याची कृत्ये घडतात. हे असेच जर घडत राहिले तर पुढील पिढ्यांना नदी पात्रे, डोंगर, पर्वत तर चित्रातूनच दाखवावे लागतील. कर्मचा-यांशी साटेलोटे करून अत्यल्प मोबदल्यात शासकीय जमिनी, डोंगर, वन जमिनी लाटायच्या व त्यावरील भूखंड, सदनिका अव्वाच्या सव्वा भावात विकून गब्बर बनायचा हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. पवईच्या घटनेबाबत भाष्य करतांना तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते खरे परंतू प्रत्यक्षात तसे घडेल की नाही ईश्वर जाणे. आज अर्धा डोंगर पोखरल्या गेला आहे प्रत्यक्ष कारवाई होईतो कदाचित संपूर्ण डोंगरच पोखरला जाण्याची शक्यता नाकारत येत नाही. तसेच आता पुण्यातील हे 36 बंगले पाडले जातील आणि अनेक वर्ष ही जागा तशीच पडलेली राहील.
 आता पुण्यात काही भागातच डोंगर, नदीपात्रे शिल्लक राहिली आहेत. भूमाफिया, विकासक यांची वक्रदृष्टी त्यावर आता पडलीच आहे. त्यांच्या या वक्रदुष्टीवर शासनाने डोळेझाक करून चालणार नाही. जमिनी लाटण्याचा हा उद्योग बंद पाडण्यासाठी विकासाचा समतोल साधून महाराष्ट्रात इतरत्र सुद्धा रोजगाराच्या संधी निर्माण करणे अत्यावश्यक झाले आहे. तसे जर झाले तर दररोज पुण्या-मुंबईकडे येणारे लोंढेच्या लोंढे कमी होतील.  डोंगर पोखरणे, नद्यांची जागा लाटणे अशा विकासक, भूमाफिया यांच्या बेकायदेशीर कृत्त्यांकडे दुर्लक्ष करून नोकरदार, अधिकारी, राजकारणी यांचेकडे पैशाचे डोंगर उभे राहत असतील तर मग इंद्रायणी नदीतील जमीन जशी लाटण्याचा प्रयत्न झाला तसा इतरही ठिकाणी होतच राहील आणि मग नद्यांवर अतिक्रमण करून घरे बांधल्याने भविष्यात पुराच्या त्रासामुळे नागरिकांनाच त्रास होईल. (मुंबई मिठी नदी प्रकोप)
     आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे पुण्यातल्या या अवैध बांधकामाला अटकाव मिळाला आहे खरा परंतु तरीही अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये नदी नाल्यांमध्ये सर्रास अतिक्रमणे सुरू आहे. सरकारने यासंबंधीचे नियम अधिक कठोर करायला पाहिजे आणि खरेदी-विक्री, टाऊन प्लॅनिंग, महसूल विभाग अशा बांधकाम संबंधित कार्यालयात अवैध परवानगी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे नाहीतर या लोकांमुळे जंगले, नद्या, डोंगर लवकरच नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.