Click "Follow" Button below To Follow this Blog

०९/०५/२०१६

...ना मुंह छुपाके जियो
      विदर्भ म्हटला कि प्रचंड ऊन,अंगाची लाही लाही होऊन जाते.आताशा विदर्भच नव्हे तर ग्लोबल वॉर्मिंगचां तडाखा सर्व जगाला बसत आहे.या कडक ऊनापासून बचावासाठी पूर्वी माणसे डोक्याला मोठा रुमाल बांधत असत.बहुतांश बायका “हाउस वाईव्ह्स” असल्यामुळे घराबाहेर पडतच नसत आणि पडल्या तर डोक्यावर पदर अथवा ओढणी घेत.नाहीतर मग स्त्रिया पुरुष दोघेही गळ्याशी गाठ बांधलेला हातरुमाल डोक्यावर दोघेही बांधत असत.काही वर्षांपासून मोठे रुमाल , “स्टोल” आले आणि मग ते पूर्ण चेहरा झाकून बांधण्याची “फॅशन” आली. उन्हाळ्यात बहुतेक सर्वच फक्त डोळे तेवढे उघडे राहतील आणि बाकी डोके चेहरा झाकलेला राहील अशा अवतारात उन्हाळ्यातच नव्हे तर इतर ॠतुंमध्ये सुद्धा बाहेर पडू लागले.चहेरा झाकून बाहेर निघणा-यांमध्ये तरुण मुलींचे प्रमाण जास्त.काही प्रमाणात प्रौढ स्त्रिया व माणसे सुद्धा असे संपूर्ण चहेरा झाकून निघतात.आमचे मित्र गजानन अंबुस्कर एकदा राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करीत होते.एका स्थानकावर एक प्रौढा आणि तिच्या सोबत एक तरुणी अर्थात स्कार्फने चहेरा झाकलेली.अशा दोघी बसमध्ये येऊन बसल्या.बस मध्ये बसल्यावर प्रौढा त्या तरुणीला “स्कार्फ काढ आता उन नाही आहे” असे म्हणाली. “नाही” इति तरुणी.यावर प्रौढा म्हणाली “अग बदमाश, गैरकृत्ये करणारे लोक असे चहेरा लपवत असतात, चांगली माणसे नव्हे. आता काढ पाहू स्कार्फ” तेंव्हा तरुणीने स्कार्फ काढला.हा किस्सा गजूने मला सांगितल्यावर त्या प्रौढ बाईने किती सोप्या शब्दात चहेरा न झाकण्याचे कारण सांगितले याचे कौतुक वाटले.(आज काल अर्थाचा अनर्थ करण्याची पद्धत फार आहे. चहेरा झाकून घेणारे सर्वच बदमाश, गैरकृत्ये    करणारे असा येथे अर्थ घेऊ नये हि नम्र विनंती) “उपमा कालिदासस्य्” अशी संस्कृत मध्ये म्हण आहे. अर्थात उपमा द्यावी तर महाकवी कालिदासासारखी.कालिदासाचा उपमा देण्यात हातखंडा होता.त्या प्रौढ बाईने सुद्धा चहेरा सतत झाकून ठेवणा-यांना बदमाशांची उपमा सहजच देऊन टाकली.मान्य आहे उनापासून संरक्षण केले पाहिजे परंतु जिथे उन नाही तिथेहि बरेच जण तोंड लपवून असतात.हल्ली तर सर्वच  ॠतुंमध्ये चहेरा झाकलेला असतो. चहेरा झाकलेला व्यक्ती अपहरण, मारहाण, अपघात अशा संकटात कधी सापडला तर जवळून जाणारा परिचित अथवा नातेवाईक सुद्धा थांबणार नाही कारण कळतच नाही कोण आहे.चहेरा सतत झाकून ठेवण्याचा हा एक तोटा सुद्धा ध्यानात घ्यावयास हवा.काही लोक म्हणतील की उन्हाळा सोडून इतर ॠतुंमध्ये आम्ही चहेरा झाकतो कारण प्रदूषणापासून बचाव होतो.परंतु जर प्रदूषणापासून वाचायचे असेल तर मग घरी आल्यावर आपण आपला चहेरा स्वच्छ धुवून घेऊ शकतो ना.उन्हाळ्यात आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे हे निर्विवाद सत्य आहे.“सर सलामत तो पगडी पचास” परंतु नेहमीच चहेरा झाकून नका ठेवू.तुमच्यावर वर उल्लेखल्या प्रमाणे काही वाईट प्रसंग आला तर तुम्ही सहज ओळखले गेले पाहिजे.”लोकांची नजर चांगली नसते” असेही चहेरा झाकण्याचे कारण सांगितले जाते.परंतु चहेरा झाकून घेऊन गैरफायदा घेणारे सुद्धा आहेत.लोकशाहीनुसार आपण पहेरावा बाबत स्वतंत्र आहोत कुणालाही या लेखातून दोष द्यावयाचा नाही.आपल्या प्रकृतीची काळजी सर्वांनी घेणे चांगलेच आहे.उनापासून बचाव अवश्य व्हावा परंतु जिथे आवश्यक नसेल तिथे आपला स्कार्फ काढून टाकावा.त्या प्रौढ स्त्रीने सांगितल्याप्रमाणे आपण चांगले लोक आहोत आपण का तोंड लपवावे ? आपणास ऊन, फॅशन, आपली स्वत:ची काळजी या सर्वातून सुवर्णमध्य काढायचा आहे.गैर प्रकार,गैर कृत्ये  करण्या-यांप्रमाणे आपण आपला चहेरा सतत का झाकावा? उन असो,वारा असो,पाउस असो या सर्वाना सोसत तसेच जीवनातील दुख:ना सामोरे जात “ना मुंह छुपाके जियो और ना सर झुकाके जियो ” असे जगले पाहिजे.
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा