...मना कल्पना धीट ‘सैराट’ धावे
सैराट सिनेमा प्रदर्शित झाला. माध्यमांवर
खूप प्रसिद्धी मिळाली आणि तरुणाईने चित्रपटगृहांना पूर्वीचे दिवस आल्याची ‘सैराट’
चर्चा सुरु झाली. अबाल वृद्धांनी चित्रपट गृहाकडे धाव घेतली. चित्रपट पहिला नसतांना
त्याच्या बद्दल कसे लिहिणार? मग चित्रपट नाही परंतु त्याच्या शीर्षका विषयी लिहिण्याची
ईच्छा झाली.परंतु मराठी सिनेमा असला तरी “What
is ‘Sairat’(सैराट)? असे तरुण इंग्रजीत विचारू लागले. मला सुद्धा “सैराट” म्हणजे काय? याची उत्कंठा
लागली.प्रेमकथा असलेला हा चित्रपट पाहून आलेल्यांना सुद्धा “सैराट” शब्दाचा अर्थ नीट
सांगता येईना.नागराज मंजुलेंना भर भक्कम फायदा करून देणा-या या सिनेमापेक्षा
त्याच्या नावाचा अर्थ समजत नव्हता त्यामुळे चलबिचल सुरु होती.एखाद्या गोष्टीचा
ध्यास घेतला ती मिळवण्याची तीव्र इच्छा असली कि ती मिळतेच.नागराज मंजुलेंच्या आधी
फार पूर्वी ‘सैराट’ हा शब्द वापरला गेला आहे. आणि ते वापरणारे समर्थ रामदास स्वामी
यांचेशिवाय अजून कोण असणार?समर्थांची शिकवण आजही चारशे वर्षानंतर उपयोगी पडेल अशी आहे.
आणि मग “सैराट” शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी समर्थच आजच्या “समाज माध्यमांच्या”
रूपातून अर्थ सांगण्यास धावून आले. रामदास स्वामींचे ३ श्लोक “व्हॉटस् अॅप” वर
भाच्याने पाठवले. समर्थांचा “सैराट” हा शब्द तिन्ही श्लोकात होता.
क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ।।
मना कल्पना धीट “सैराट” धावे ।
त्या मानवा देव कैसेनी पावे ।।
जे लोक काहीहि न करता मनाचे वारू, कल्पनांचे
घोडे सैराट सोडतात त्यांना देव कसा बरे भेटेल ? असा या वरील श्लोकाचा अर्थ. जसा
श्लोक वाचला तसा सैराट म्हणजे अनियंत्रित, सुटलेले, निसटलेले मोकाट जनावर असा काहीसा अर्थ आहे हे ध्यानात आले.
आणखी पुढे दुस-या श्लोकात समर्थ म्हणतात
धीट “सैराट” मोकाट । चाट चावट वाजट ।
थोट उद्धट लंपट । बटवाल कुबुद्धी ।।
येथे सुद्धा सैराट
म्हणजे भीड भाड न बाळगणारा म्हणजेच मोकाट अर्थात स्थळ काळ कोणते आहे याचा काहीही एक
विचार न करता वागणारा म्हणजेच कुबुद्धीचा व्यक्ती असा अर्थ दिसून येतो.
या सिनेमातून कुणी काहीही बोध घेवो. परंतु
ज्याला समाजात विवेकाने वागायचे आहे व वैराग्य प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याने
कधीही चौखूर उधळलेल्या गुराप्रमाणे मोकाट, सैराट होवू नये.
परी ते होवू नये मोकाट । नष्ट भ्रष्ट आणि चाट । सीमाच नाही “सैराट”
।
याप्रमाणे समर्थांनी सांगून ठेवले आहे. या
सिनेमातून नवीन तरुण काय बोध घेतील देव जाणे. सिनेमा केवळ सिनेमा म्हणून पहा.त्याच्यातील
चांगले ते घ्या आपल्या घरी सुद्धा आपल्यावर प्रेम करणारे आई-वडील आणि इतर नातेवाईक
आहेत याचेसुद्धा भान ठेवा. राजकारणा पासून ते स्वयंपाक कसा करावा, आणि स्वच्छता
कशी राखावी इ. सर्वच आपल्यासाठी सांगून ‘दासबोध”,“आत्माराम” असा पुस्तकरूपी ठेवा ठेवून
गेलेल्या रामदास स्वामींच्या ग्रंथांचे वाचन तरुणाईने केले तरी आपणास “कसे आचरण
करावे ?” हे समजेल आणि तरुणांनी जर “वाचले तरच ते वाचणार आहेत” आपल्या भारतातील
संत आणि त्यांचे साहित्य तसेच आपली संस्कृती याचा अभ्यास करण्यास विदेशी लोक येतात
तेंव्हा आपणास सुद्धा त्याचे ज्ञान हवेच. तरुणांनी असे ज्ञान मिळवले तर आजचे तरुण
हे निव्वळ “सैराट” झालेले तरुण नाही आहेत हे समाजाला कळेल.
( आधार : www.dasbodh.com)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा