दोन मांझी आणि संवेदनाहीन
आपण
बातमी जरी ओडीसा मधील असली तरी संवेदनाहीन आपण असेच म्हणावे
लागेल.कारण देश हा माणसांचा बनलेला असतो. या नात्याने मग आपण सर्वच संवेदनाहीन
नाहे काय? कटू आहे परंतू सत्य आहे की आपण भारतीय दिवसें-दिवस संवेदनाहीन बनत चाललो
आहोत. त्यातल्या त्यात वैद्यकीय सेवा म्हटली की विचारूच
नका. बिहार मध्ये पत्नीला
वैद्यकीय सेविका त्वरीत पुरवता आली नाही म्हणून मोठा पहाड एकट्याने फोडून रस्ता
करणा-या “माऊंटन मॅन” दशरथ मांझी याचा किस्सा नुकत्याच एका चित्रपटाने जागा समोर
आणला आणि आता अजून एका दुस-या मांझीचा किस्सा जागा समोर सोशल मिडीयाने आणला. हा
दुसरा मांझी म्हणजे ओरिसा राज्यातील दाना मांझी. क्षय रोगाने ग्रस्त पत्नीला रुग्णालयात
भरती केल्यावर तिचा तेथे मृत्यू झाला. मांझीचे खेडे रुग्णालयापासून ५० ते ६० किमी
अंतरावर. रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. मांझी कितीतरी वेळे
प्रतीक्षा करीत तेथे थांबला परंतू रुग्ण आथवा त्याचे आप्त यांची आस्थेने, आपुलकीने
चौकशी करतील ते रुग्णालयाचे कर्मचारी कसले? मांझी शेवटी कंटाळला, थकला आणि त्याने
पत्नीचे कलेवर कापडात गुंडाळले, खांद्यावर घेतले आणि १२ वर्षाच्या मुलीसह रुग्णालय
सोडले. रुग्णालय तेथील कर्मचारी यांचे तरीसुद्धा काही भान नाही. मांझी पत्नीचे शव एकटा
खांद्यावर घेवून अंदाजे 15 किमी दोन तास घेवून कुणालाही तक्रार न करीता चालत होता.
याला काय म्हणावे ? ६९ वर्षे झाली स्वतंत्रता प्राप्त होवून. या देशातील नागरिक
मात्र सुविधांपासून वंचितच, गरीबी हटाव सारख्या शाब्दिक चळवळी करून गरीबी अजून हटलीच
नाही. ती उलट वाढतच आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधींची अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती
मोजता-मोजता संबंधीत कर्मचा-यांच्या नाकी नऊ येते. मांझीच्या गरीबीमुळे त्याच्यावर
ही वेळ आणली होती. शेवटी एका स्थानिक माध्यमाने मांझीची ही करूण गाथा प्रकाशित
केली. ‘सोशल मिडीयावर’ झळकली. नंतर मग मृतदेह तेथून पुढे नेण्यासाठी रुग्णवाहिका पाचारण
करण्यात आली. मांझी कडे मदतीचा ओघ पसरला सर्वात आधी मदत कुणी करावी ? सर्वात आधी
मदत पोहचली ती ‘बहरीनच्या पतंप्रधानांची.नंतर एका NGO ने मांझीला मुलीचे शिक्षण आणि
मुलगी मोठी होई तो दरमहा ठराविक रक्कम देण्याचे ठरवले.
मांझीला मदत मिळाली खरी परंतू दशरथ मांझी, दाना मांझी यांसारखे अजून किती मांझी आपण निर्माण होवू देणार आहोत? आपल्या मनातील गरीबांविषयीची कळवळ संपली का? आपणास आपले कर्म, आपला पैसा , आपले कुटुंब यांसोबतच इतर भारतीय नागरिकांशी काहीही घेणे देणे नाही का ? स्वामी विवेकानंद म्हणतात “ मै उसी को महात्मा समझूंगा जिसका हृदय गरिबोंके लिये रोता है अन्यथा वो दुरात्माही है” या वाक्याच्या अनुषंगाने आपण सर्वच आता दुरात्मेच झालेलो आहोत. आणि तसे जर नाही आहे तर मग बिहार मधील दशरथ मांझीला एकट्याने पहाड फोडून रस्ता तयार करण्याचे काम पडलेच नसते आणि ओरिसा मधील दाना मांझी यांस पत्नीचा मृतदेह एकट्याने खांद्यावर न्यावा लागला नसता. परंतू तसे नाही आहे आणि म्हणूनच ६९ वर्षानंतर अनेक घोटाळे करून गबर झालेले आणि गरीबी, दुही कायम ठेवणारे लोकप्रतिनिधी असलेल्या आपल्या देशाची ही हार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा