Click "Follow" Button below To Follow this Blog

२६/०१/२०१७

Famous Lyricist Jaswant Raj Sharma Alias "Naqsh Layalpuri" passed away on 22 Jan 2017 article regarding his lyrics

.....तुझको दुंगा सदा
गाणे ऐकत ऐकत प्रवास हा एक सुखद अनुभव असतो. त्यातही जर जुनी अर्थपूर्ण गाणी असतील तर दुधात साखरच.असाच जुनी गाणी ऐकत ऐकत रविवारी प्रवास करीत होतो. “पेन ड्राईव्ह” वर सर्वात पहिले गाणे लागले “न जाने क्या हुवा” त्यानंतर “दो दिवाने शहर मे“ , “ये मुलाकात एक बहाना है “ हे खानदान चित्रपटातील सुश्राव्य गीत अशी एका पाठोपाठ एक श्रवणीय गाणी लागत होती आणि प्रवासाचे ईप्सित स्थळ येण्याच्या आधी लागले ते “ मै तो हर मोडपर तुझको दुंगा सदा” प्रवासाच्या शेवटी जे
Naqsh Layallpuri With Lata Mangeshkar
गाणे लागते तेच मग बराच वेळ ओठावर येत असते. प्रवासात सर्व गाणी ऐकत असताना वरील गीतांचा गीतकार कोण हे ध्यानी मनीही आले नाही. सोमवारी वृत्तपत्रातून वृत्त झळकले की “नक्श लायलपुरी” यांचे रविवारी 22 जाने 2017 रोजी निधन. नाव ऐकलेले असल्याने संपूर्ण वृत्त वाचन केले आणि त्यात नक्श लायलपुरी अर्थात जसवंत राज शर्मा यांच्या बाबत माहेती आणि त्यांच्या काही गीतांचा समावेश होता.रविवारी त्यांचे निधन आणि त्यांचीच गाणी मी रविवारी ऐकत होतो, आपोआपच त्यांना श्रद्धांजली दिल्या गेली होती. जुन्या काळातील मजरूह सुलतानपुरी,शैलेन्द्र,आनंद बक्षी,इंदीवर अशा अनेक प्रख्यात गीतकारांमध्ये नक्श लायलपुरी हे सुद्धा एक गीतकार होते परंतू इतर गीतकारांप्रमाणे त्यांना नावलौकिक प्राप्त झाला नाही. पंजाब प्रांतात लायालपुर या गावी जन्म झाला असल्याने त्यांनी गावचेच नाव धारण केले. लहानपणापासूनच उर्दू भाषेची गोडी त्याना लागली आणि मग नंतर कविता स्फुरू लागल्या. १९५२ मध्ये चित्रपटसृष्टीत चित्रपटांकरीता गाणी लिहिण्यास सुरुवात केली ती अगदी आजतयागत. तत्वनिष्ठ असल्याने त्यांनी इतरांच्या तुलनेत कमी गाणी दिली परंतू जी पण काही गाणी दिली ती आजही रसिकांच्या स्मरणात आहे. अमोल पालेकरच्या “घरौंदा” मधील सर्व गीते गुलजारची होती परंतू
  “दो दिवाने शहर मे....आशियाना धुंडते है“ हे गाणे आजही तेवढेच ताजे आहे आणि सामन्याला शहरात घर मिळणे किती कठीण असते अशा काळाशी सुसंगत आहे. त्यांनी बी ग्रेड चित्रपटांसाठी गाणी लिहिली ते चित्रपट भलेही रसिक विसरले असतील परंतू त्या चित्रपटांतील नक्श लायलपुरी यांची गीते मात्र रसिक आजही गुणगुणतात ती गीते आजही रेडीओ आणि विविध दुरचित्रवाहीन्यांवरून प्रसारित होत असतात. पैसे मिळतात म्हणून “त ला त” व “म ला म” त्यांनी जोडले नाही, आपल्या काव्याशी तडजोड त्यांनी केली नाही आणि म्हणूनच त्यांची गीते एवढी सरस आहेत आणि त्यामुळेच त्याना म्हणावे तितके व्यावसायिक यश मिळाले नाही. आर्थिकप्राप्ती होत राहावी , उदरनिर्वाह चालत राहावा म्हणून नक्श लायलपुरी यांनी पोस्टात नोकरी सुरु ठेवली व स्वत:ला आवडतील अशा रचना काही विशिष्ट संगीतकार जसे नौशाद,खय्याम,जयदेव यांच्याकडे करीत राहिले. नुरी तील “चोरी चोरी कोई आये “ ,आहिस्ता आहिस्ता मधील “माना तेरी नजरमे“ , “ चांदनी रातमे एकबार” हे दिले नादान मधील गीत , “प्यार का दर्द है“ तसेच अलीकडच्या  काळातील “जाते हो परदेस पिया जातेही खत लिखना “ अशी त्यांची मधुर गीते आजही रसिकांना लक्षात आहेत. उत्कृष्ट गीतकार असूनही ते उपेक्षित राहिले व आता रसिकांना सोडून गेले. ते आता कुणालाही ऐकू शकणार नाहीत परंतू तरीही रसिक मात्र त्यांच्याच शब्दात म्हणतील “मै तो हर मोड पर तुझको दुंगा सदा मेरी आवाज को दर्द के साज तू सुने न सुने”                                        

२०/०१/२०१७

Navjyotsingh Siddhu changed 2 parties within very few month. Article about it.

कोलांटया उडया



    परवा भाजपा , काल आप आणि आज काँग्रेस अश्या कोलांटया उडया माजी क्रिकेटपटू , माजी खासदार , विनोद आणि शेरो शायरीचा बादशहा तसेच क्रिकेट समालोचक नवज्योतसिंग सिद्धू याने मारल्या. भारतात पक्ष बदलणे हे काही नवीन नाही सत्ते साठी मोठ-मोठ्या दिग्गज नेत्यांनी सुद्धा हे प्रताप केलेले आहेत. ज्या पक्षांनी मोठे केले त्या पक्षाला सोडून सत्तापिपासू नेते दुस-या पक्षात गेले आहेत. जेष्ठ नेत्याचा काँग्रेस ते पुलोद पुन्हा काँग्रेस आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास सुद्धा जनतेने पहिला आहे. तसेच एकाचवेळेस ब-याच नेत्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत काँग्रेस मध्ये जातांना या महाराष्ट्रानी पाहिले आहे. कालच शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर हे “व्हाया” मनसे करीत भाजपा मध्ये प्रवेश करते झाले. नारायण दत्त तिवारी आता भाजपाच्या उंबरठ्यावरच आहे. सिद्धू सुद्धा आता अशाच नेत्यांच्या मांदियाळीत जाऊन बसला आहे.राहुल गांधींना सतट पप्पू म्हणत आणि मनमोहनसिंग याना “सरदार ही पर असरदार नही” अशी निर्बात्सना करणारा सिद्धू हा त्यांच्याच काँग्रेस पक्षात समाविष्ट झाला आहे. सिद्धू हा बोल बच्चन सुद्धा आहे. आपल्या बोलण्याने सोमोरच्याला कसे प्रभावित करावे हे त्यास ज्ञात आहे. परंतू प्रत्येकवेळेस त्याच्या श्रीमुखातून बरोबर तेच निघेल असेही नसते.” मी जन्मत: काँग्रेसचा” , “भाजपा म्हणजे कैकयी” अशी मुक्ताफळे त्याने काँग्रेसच्या दावणीला गेल्यावर उधळली. तू जर काँग्रेसचा आहे  तर मग   दुस-या घरी तू का गेलास ? तुला ज्या भाजपाने  खासदार बनवले तो कैकयी कसा ? बरे कैकयी आहे तर मग तू कोण ? तू राम म्हणावास काय ? तर नाही कारण तू तर वनवासा ऐवजी सत्तेकडे चाललास. रामाने हसत हसत सर्व दु:ख स्विकारले तू तर मुख्यमंत्री पदाची लालसा बाळगत सत्तेची फळे भोगण्यास आतुर आहे. तूला भरत म्हणावे तर तो भरताचा सुद्धा अपमान होईल. कारण सत्ता अगदी हाता तोंडाशी असतांना त्याने त्या सत्तेचा त्याग केला आणि आपल्या राज्याशी निष्टा बाळगत वनवास्याप्रमाणे राहिला. मग तू जर भाजपाला कैकयी म्हणतोस तर तू मात्र ईश्वाकू वंशातील कुणीही वाटत नाहीस. तू वाटतोस तर रामायणातीलच “वाली” वाटतो . कारण किष्किंधा राज्याच्या गादीवर बसण्यासाठी त्याने बंधू सुग्रीव यास राज्याच्या बाहेर हाकलून दिले, त्यातही भरीस भर म्हणजे सुग्रीव पत्नीस त्याने बलपूर्वक आपलेसे केले असते. भाजपा कैकयी आहे तर मग तू मात्र रामायणातील वालीच आहेस. कारण वाली सत्तापिपासू होता आणि तू सुद्धा तसाच सत्तापिपासू वालीने गादीसाठी भावाला दुखावले आणि तू गादीसाठी दोन पक्ष सोडले. आता कुणी हे म्हणत असले की मला जनतेची सेवा करयाची आहे आणि ते करण्यासाठी सत्ता हवी तर हे सर्व न समजेल अशी भारतीय जनता दुधखुळी नाही. तुझ्या कडून मुष्टी प्रहाराने एका व्यक्तीने प्राण गमावला होता आणि त्या कलंकातून सुद्धा तू कधीच मुक्त झाला आहेस आणि जनता सुद्धा ती घटना विसरली आहे. सिद्धू तू खरेच उत्कृष्ट क्रिकेटपटू , उत्कृष्ट क्रिकेट समालोचक , उत्कृष्ट वक्ता , विनोदाची जाण असलेला शेरो शायरी तोंडपाठ असलेला प्रज्ञावंत आहेस. तुझे गुण पाहून तू अश्याप्रकारे दल बदल करशील अशी कुणाची अपेक्षा नव्हती मात्र तुझ्या कोलांटया उड्या ह्या डोंबा-याच्या खेळातील कोलांटया उड्या मारणा-या माकडालाही लाजवणा-या ठरल्या
.

१२/०१/२०१७

Government forgot Swami Vivekanand on his birth anniversary 2017

असे कसे विसरता ?


परवाच्या सांज दैनिकात एक वृत्त  आले होते. ते वृत्त वाचून आश्चर्य आणि खेद दोन्ही वाटले. अभाविप खामगाव ने शासनास एक निवेदन दिल्याचे ते वृत्त होते. हे निवेदन शासनाच्या शासकीय कार्यालयात साज-या केल्या जाणा-या थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी हे कार्यक्रम असणा-या परिपत्रकात स्वामी विवेकानंद जयंतीचा अनुल्लेख झाला होता याबाबत दिले होते. स्वामी विवेकानंद जयंतीचा शासनास विसर पडला तो सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना. फडणवीस हे अभाविपच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय झालेले आहेत आणि स्वामी विवेकानंद अभाविप ला प्रात:स्मरणीय आहेत.शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुध्दा या “योद्धा संन्यासास” आदर्श मानतात. म्हणजे स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानणारे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असतांनाही असे कसे काय झाले? किंवा अशी चूक हे परिपत्रक काढणा-या संबंधितांकडून कशी काय झाली? याचे कारण आपल्याकडे चूक झाल्यावर त्या चूक करणा-यास दंड मात्र अगदीच सौम्य होतो. त्यामुळे मग “क्या होता?, देख लेंगे” अशी कर्मचा-यांची मानसिकता असते आणि ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातही बहुतांश कर्मचारी हे बुद्धिमत्तेच्या जोरावर शासकीय सेवेत आलेले नाहीत.त्यामुळे यांच्याकडून अपेक्षित असे कार्य होतच नाही. मग काय काहीतरी थातूर-मातूर काम केले अर्धावेळ चहाच्या टपरीवर व्यतीत केला की घरी.“बारभाई खेती आणि काही ना लागे हाती” या स्वरुपाचा कारभार शासनाचा असतो.त्यामुळे मग राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नावच उत्तरांच्या पर्यायांमध्ये नसते,विजेची बिले चुकीची येतात,शिक्षकांना देशाची राजधानी माहेत नसते,कृषी विभाग कर्मचा-यास भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात ते माहित नसते,रस्ते एका वर्षातच खराब होतात,पाण्याच्या नवीन बांधलेल्या टाक्या पडतात अशा कितीतरी अक्षम्य चुका शासकीय कर्मचा-यांकडून होतांना आपण पहात असतोच त्यातलीच एक चूक म्हणजे परिपत्रकात स्वामी विवेकानंद जयंतीचा झालेला अन्नुलेख.अर्थात चूक लक्षात आल्यावर नेहमीप्रमाणे मग पुन्हा नवीन परिपत्रक काढून केलेल्या चुकीला ठिगळ लावले गेले तो भाग वेगळा.ज्या स्वामी विवेकानंदानी जगाला भारत हा कसा देश आहे याची जाणीव करून दिली,जे स्वामी विवेकानंद भारतीय तरुणांचे गेल्या कित्येक वर्षांपासून “युथ आयकॉन” आहे. त्यांना कसे विसरता? एवढी तुमची स्मरणशक्ती कमी आहे ? आणि असेलच कमी स्मरणशक्ती आणि ती वाढवण्याची मनापासून ईच्छा जर असेल तर त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला स्वामीजींची ग्रंथ संपदा वाचल्यावर मिळेल.ती वाचा, त्यातून कामातील एकाग्रता सुद्धा प्राप्त करता येईल.हे शासकीय कर्मचा-यानो स्वामीजी म्हणतात, “तुम्ही जे कार्य अंगिकारले आहे ते जीव ओतून करा, इतर सगळे विसरा तुम्हाला यश हमखास मिळेल” आणि येथेच तुमची चूक होते तुम्ही इतर सर्व काही करता परंतू तुमचे जे मुख्य कार्य आहे ते विसरता.जीव ओतून, कर्तव्य भावनेने कार्य करणे आता शासकीय क्षेत्रातून दुरापास्त झाले आहे मग तेथे यश-अपयश ते काय ? यश मिळो अथवा न मिळो “पगार तो शुरू ही है“ आणि म्हणून तुमच्या कडून वर सांगितल्या आहेत तशा चुका घडतच राहतात.अशा चुका खाजगी क्षेत्रात मात्र फार कमी होतांना दिसून येतात कारण तेथील कर्मचारी हे फक्त आणि फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर निवडलेले असतात.आपले नेते ज्यांना आदर्श मानतात,संपूर्ण देशातील जनतेला जे वंदनीय आहे अशा थोर पुरुषांची जयंती,पुण्यतिथी हे दिवस तुम्ही असे कसे विसरता?               
 

०५/०१/२०१७

Great writer,poet from Maharashtra Ram Ganesh Gadkari alias "Govindagraj" alias "Balakram" 's statue located in Sambhaji Garden Pune is demolished, article on that issue

स्वकीयच झाले बुत-शिकन 

ज्याने संभाजी महाराजांना क्रूरपणे मारले त्या औरंगजेबच्या नावाने औरंगाबाद शहर आहे ते औरंगाबाद नाव सुद्धा खपायला नको. त्याचे थडगे तर या महाराष्ट्राच्याच भूमीत आहे त्याबाबत कुठे काहीही आंदोलन, धरणे, तोडफोड नाही. मर्दुमकी फक्त प्राच्यविद्या संशोधन केंद्रे आणि पुतळे यांची नासधूस करण्यात ! कारण तसे केल्याने कुणी प्रतिहल्ला करण्याची भीती नाही. 
उर्दू मध्ये “बुत” या शब्दाचा अर्थ  होतो मूर्ती किंवा पुतळा आणि बुत-शिकन म्हणजे मूर्ती-भंजक. महाराष्ट्राने अनेक बुत-शिकन पाहिले आहेत.याचे दाखले आपणास पर्यटनासाठी गेल्यावर तेथील भग्नावशेष पाहिल्यावर दिसतात किंवा आजही नद्यांमध्ये भग्न मुर्त्या सापडतात तेंव्हा मिळतात. त्या काळात महाराष्ट्रात पुतळे नव्हतेच त्यामुळे मंदिरातील मुर्त्या आणि शिल्पे भग्न केली जात असत. आता मंदिरातील मुर्त्यांऐवजी पुतळ्यांना लक्ष्य केले जात आहे. इतके बुत-शिकन महाराष्ट्राच्या भूमीत आले आणि मूर्ती भंजन करून गेले परंतू आजही “बुत-परस्ती” अर्थात मूर्ती पूजा सुरूच आहे. तात्पर्य हे की मूर्ती भंजन केल्याने ज्याची मूर्ती आहे त्याची जनमानसातील प्रतिमा काही पुसली जात नाही आणि हे काही या बुत-शिकनांच्या लक्षात येत नाही. पूर्वी हे जे बुत-शिकन होते ते परकीय होते आणि आता मात्र आपले स्वकीयच बुत-शिकन झाले आहेत. काही वर्षांपूर्वी दादोजी कोंडदेव यांच्या पुतळा हटवला आणि परवा थोर नाटककार, कवी, बाल साहित्यिक महाराष्ट्राचे शेक्सपिअर राम गणेश गडकरी उपाख्य गोविंदाग्रज उपाख्य बाळकराम यांच्या पुतळ्यावर समाजकंटकानी आघात करून तो पाडला आणि अज्ञातस्थळी नेवून टाकला. संवेदनशील मनाच्या प्रत्येकालाच अतीव दु:खं झाले गडकरी व इतर तत्कालीन साहित्यिकांचे आत्मे सुद्धा तळमळले असतील. या प्रसंगाने तालीबान्यांनी बुद्ध मूर्ती तोडल्याची आठवण झाली. महाराष्ट्रात शिवाजी महाराज. संभाजींराजे यांची नावे घ्यायची आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या अंधारात “एकच प्याला” रिचवून ज्याने “मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा” हे काव्य रचले, लहान मुलांना समजावे म्हणून एकही जोडाक्षर नसलेली “चिमुकली इसापनीती” लिहिली त्याच थोर साहित्यिकाचा पुतळा या मंगल देशांतील अर्थात महाराष्ट्रातील लोकांनीच पाडायचा. काय हे दुर्दैव! १०० वर्षांपूर्वी अर्धवट लिहिलेल्या “राजसन्यास” या नाटकात म्हणे संभाजी राजांबद्दल गडकरींनी अनुद्गार काढले आहेत म्हणून त्यांचा पुतळा पाडला असे या समाजकंटकांचे म्हणणे. नाटकात जे काही म्हटले आहे त्याच्या आधीचे आणि नंतरचे सुद्धा वाचावे आणि असेलच काही आक्षेपार्ह तर सनदशीर मार्गाने लढावे. परंतू आजकाल लोकशाहीच्या या देशात ज्याला जसे वाटेल तसे तो करत आहे. १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या लिखाणाचा एवढा राग येतो या न्यायाने तर मग संभाजी महाराजांना ज्याने हाल-हाल करून मारले त्या औरंगजेबच्या विरोधात सुद्धा प्रखर आंदोलन व्हावे. त्याचे नावं, त्याचे ते टोप्या शिवण्याचे किस्से इतिहासातून काढण्याची मागणी व्हावी, ज्याने संभाजी महाराजांना क्रूरपणे मारले त्या औरंगजेबच्या नावाने औरंगाबाद शहर आहे ते औरंगाबाद नाव सुद्धा खपायला नको. त्याचे थडगे तर या महाराष्ट्राच्याच भूमीत आहे त्याबाबत कुठे काहीही आंदोलन, धरणे, तोडफोड नाही. मर्दुमकी फक्त प्राच्यविद्या संशोधन केंद्रे आणि पुतळे यांची नासधूस करण्यात ! कारण तसे केल्याने कुणी प्रतिहल्ला करण्याची भीती नाही. वरून स्वत:ला मावळे म्हणवून घेतात. मावळे बुत-शिकन नव्हते. इंग्लंड देशातील लोक म्हणतात की, “एकवेळेस तुम्ही इंग्लंड घ्या परंतू शेक्सपिअरला धक्का लावू नका”.  महाराष्ट्रात मात्र असा मान साहित्यिक आणि कलाकारांना  नाही. पुणे मनपा ने जरी पुतळा पुन्हा बसविण्याचा ठराव घेतला असला तरी राम गणेश गडकरी तुम्ही पुतळ्यात नसून मराठी साहित्य रसिकांच्या मनात आहात तेथून तुम्हाला कोणी हटवू शकत नाही. तुमच्या या पुतळ्यावरील हल्ल्याने एक चांगले झाले आता ज्या नवीन पिढीला निदान तुमच्या माहिती नव्हती ती त्यांना झाली आहे आणि त्या निमित्ताने ते सुद्धा तुमचे लिखाण वाचतील आणि लेखणीला लेखणीने उत्तर द्यावे शस्त्रे घेऊन तोडफोड करून नव्हे अशी बौद्धिक कुवत त्यांच्यात येईल.