स्वकीयच झाले “बुत-शिकन”
ज्याने संभाजी महाराजांना क्रूरपणे मारले त्या औरंगजेबच्या नावाने औरंगाबाद शहर आहे ते औरंगाबाद नाव सुद्धा खपायला नको. त्याचे थडगे तर या महाराष्ट्राच्याच भूमीत आहे त्याबाबत कुठे काहीही आंदोलन, धरणे, तोडफोड नाही. मर्दुमकी फक्त प्राच्यविद्या संशोधन केंद्रे आणि पुतळे यांची नासधूस करण्यात ! कारण तसे केल्याने कुणी प्रतिहल्ला करण्याची भीती नाही.
उर्दू मध्ये “बुत” या शब्दाचा अर्थ होतो
मूर्ती किंवा पुतळा आणि बुत-शिकन म्हणजे मूर्ती-भंजक. महाराष्ट्राने अनेक बुत-शिकन
पाहिले आहेत.याचे दाखले आपणास पर्यटनासाठी गेल्यावर तेथील भग्नावशेष पाहिल्यावर दिसतात
किंवा आजही नद्यांमध्ये भग्न मुर्त्या सापडतात तेंव्हा मिळतात. त्या काळात
महाराष्ट्रात पुतळे नव्हतेच त्यामुळे मंदिरातील मुर्त्या आणि शिल्पे भग्न केली जात
असत. आता मंदिरातील मुर्त्यांऐवजी पुतळ्यांना लक्ष्य केले जात आहे. इतके बुत-शिकन महाराष्ट्राच्या
भूमीत आले आणि मूर्ती भंजन करून गेले परंतू आजही “बुत-परस्ती” अर्थात मूर्ती पूजा
सुरूच आहे. तात्पर्य हे की मूर्ती भंजन केल्याने ज्याची मूर्ती आहे त्याची जनमानसातील
प्रतिमा काही पुसली जात नाही आणि हे काही या बुत-शिकनांच्या लक्षात येत नाही.
पूर्वी हे जे बुत-शिकन होते ते परकीय होते आणि आता मात्र आपले स्वकीयच बुत-शिकन
झाले आहेत. काही वर्षांपूर्वी दादोजी कोंडदेव यांच्या पुतळा हटवला आणि परवा थोर
नाटककार, कवी, बाल साहित्यिक महाराष्ट्राचे शेक्सपिअर राम गणेश गडकरी उपाख्य
गोविंदाग्रज उपाख्य बाळकराम यांच्या पुतळ्यावर समाजकंटकानी आघात करून तो पाडला आणि
अज्ञातस्थळी नेवून टाकला. संवेदनशील मनाच्या प्रत्येकालाच अतीव दु:खं झाले गडकरी व
इतर तत्कालीन साहित्यिकांचे आत्मे सुद्धा तळमळले असतील. या प्रसंगाने तालीबान्यांनी
बुद्ध मूर्ती तोडल्याची आठवण झाली. महाराष्ट्रात शिवाजी महाराज. संभाजींराजे यांची
नावे घ्यायची आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या अंधारात “एकच प्याला”
रिचवून ज्याने “मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा” हे काव्य रचले, लहान
मुलांना समजावे म्हणून एकही जोडाक्षर नसलेली “चिमुकली इसापनीती” लिहिली त्याच थोर साहित्यिकाचा
पुतळा या मंगल देशांतील अर्थात महाराष्ट्रातील लोकांनीच पाडायचा. काय हे दुर्दैव!
१०० वर्षांपूर्वी अर्धवट लिहिलेल्या “राजसन्यास” या नाटकात म्हणे संभाजी
राजांबद्दल गडकरींनी अनुद्गार काढले आहेत म्हणून त्यांचा पुतळा पाडला असे या समाजकंटकांचे
म्हणणे. नाटकात जे काही म्हटले आहे त्याच्या आधीचे आणि नंतरचे सुद्धा वाचावे आणि
असेलच काही आक्षेपार्ह तर सनदशीर मार्गाने लढावे. परंतू आजकाल लोकशाहीच्या या
देशात ज्याला जसे वाटेल तसे तो करत आहे. १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या लिखाणाचा
एवढा राग येतो या न्यायाने तर मग संभाजी महाराजांना ज्याने हाल-हाल करून मारले त्या
औरंगजेबच्या विरोधात सुद्धा प्रखर आंदोलन व्हावे. त्याचे नावं, त्याचे ते टोप्या
शिवण्याचे किस्से इतिहासातून काढण्याची मागणी व्हावी, ज्याने संभाजी महाराजांना
क्रूरपणे मारले त्या औरंगजेबच्या नावाने औरंगाबाद शहर आहे ते औरंगाबाद नाव सुद्धा
खपायला नको. त्याचे थडगे तर या महाराष्ट्राच्याच भूमीत आहे त्याबाबत कुठे काहीही
आंदोलन, धरणे, तोडफोड नाही. मर्दुमकी फक्त प्राच्यविद्या संशोधन केंद्रे आणि पुतळे
यांची नासधूस करण्यात ! कारण तसे केल्याने कुणी प्रतिहल्ला करण्याची भीती नाही. वरून स्वत:ला मावळे म्हणवून घेतात. मावळे बुत-शिकन
नव्हते. इंग्लंड देशातील लोक म्हणतात की, “एकवेळेस तुम्ही इंग्लंड घ्या परंतू
शेक्सपिअरला धक्का लावू नका”. महाराष्ट्रात मात्र असा मान साहित्यिक आणि कलाकारांना नाही. पुणे मनपा ने जरी पुतळा पुन्हा बसविण्याचा ठराव घेतला असला तरी राम गणेश
गडकरी तुम्ही पुतळ्यात नसून मराठी साहित्य
रसिकांच्या मनात आहात तेथून तुम्हाला कोणी हटवू शकत नाही. तुमच्या या पुतळ्यावरील हल्ल्याने एक चांगले झाले आता ज्या
नवीन पिढीला निदान तुमच्या माहिती नव्हती ती त्यांना झाली आहे आणि त्या निमित्ताने
ते सुद्धा तुमचे लिखाण वाचतील आणि लेखणीला लेखणीने उत्तर द्यावे शस्त्रे घेऊन
तोडफोड करून नव्हे अशी बौद्धिक कुवत त्यांच्यात येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा