Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/१२/२०१६

"Musalman" The only handwritten newspaper in India or may be in the world

"मुसलमान
हा एक धर्म आहे हे कुणीही सांगेल. पंरतू “मुसलमान” नावाचे एक वर्तमानपत्र आहे हे थोड्या लोकांना माहीत आहे आणि हे वर्तमानपत्र भारतातील किंबहुना  जगातील एकमेव हस्तलिखित वर्तमानपत्र आहे हे अगदीच कमी लोकांना ठाऊक आहे.”हस्तलिखित वर्तमानपत्र” ! आश्चर्य वाटले ना ? होय “मुसलमान” हे वृत्तपत्र आजही हाताने लिहिले जाते आणि हेच या वृत्तपत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. एखाद्या गोष्टीने झपाटून जाणे म्हणजे काय असते याचे प्रत्यंतर या वृत्तपत्राची माहिती मिळाल्यावर येते. वर्ष १९२७ , ब्रिटीशकालीन भारत. याच काळात चेन्नई तत्कालीन मद्रास या शहरातील सईद अफजतउल्लाह या व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरु केले.त्याकाळी मुद्रण कला बाल्यावस्थेतच होती आणि म्हणावी तेवढी फोफावली नव्हती म्हणून “मुसलमान” हे हस्तलिखित या प्रकारात सुरु झाले, भाषा उर्दू हे सांगणे न लगे. सईद अफजतउल्लाह यांच्या नंतर या वृत्तपत्राची धुरा त्यांच्या मुलाकडे म्हणजे फजलउल्लाह यांच्याकडे आली. स्वातंत्र्योत्तर काळसुद्धा म्हणावा तितका विकसित नव्हताच त्यामुळे वृत्तपत्र तसेच म्हणजे हस्तलिखित याच प्रकारात सुरु राहिले.फजलउल्लाह यांनी जीवनाच्या अखेर पर्यंत याच वृत्तपत्राचे कार्य सुरु ठेवेल असा निर्धारच केला होता.जेंव्हा त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली होती त्यावेळी ते कार्यालयात वृत्तपत्राचेच कार्य करीत होते.त्यांचे निधन झाल्यावर आता सध्या संपादक म्हणून कार्य पाहणा-या त्यांच्या मुलाने म्हणजेच सईद आरीफउल्लाह यांनी वडीलांचा वारसा सुरु राहावा या प्रेरणेने २००८ पासून वृत्तपत्राची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.मार्केटिंग मध्ये एमबीए झाल्यावर मोठ्या पगाराची नोकरी करण्याच्या संधी असून सुद्धा अत्यल्प उत्पन्न असणा-या या क्षेत्रास केवळ वडिलोपार्जित वारसा सांभाळण्यासाठी आरीफ ने या कार्यास वाहून घेतले.मुस्लीम तहजीब अर्थात मुस्लीम संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याची परंपरा आहे.“कॅलीग्रॅफी” चा वापर करून हस्तलिखित कुराणाच्या प्रती राजे- महाराजे,धनिक यांच्यासाठी लिहिल्या जात असत.मुद्रण कलेतील क्रांती नंतर मात्र हस्तलिखित हा प्रकारच सर्वच संस्कृतीमधून बाद होऊ लागला,आता तर संगणक,स्मार्ट फोनचे युग आहे,हाताच्या बोटाने स्मार्ट फोनवर पेन चालवतात त्याप्रमाणे लिहिता येते,आपण बोललेले संगणकाच्या पडद्यावर टाईप होते.मग कोण कशाला हाताने लिहिणार? परंतू “मुसलमान” मात्र अजूनही हाताने लिहिल्या जात आहे.त्यांना नावे ठेवणारी मंडळी आहे, हसणारे लोक आहेत.तरीही अव्याहतपणे मुसालमानचे कार्य सुरूच आहे.फक्त ७५ पैस्यात मिळणा-या मुसलमानच्या २१००० प्रती रोज निघत आहेत. संपूर्ण भारतात त्याचे वाचक आहेत.३० ते ३५ वर्षांपासून कार्य करणा-या कर्मचा-यांचे कुटुंब तेथे आहे.तीन वार्ताहर  ज्यामध्ये एक हिंदू आहे आणि तीन “कॅलीग्रॅफर्स” आहेत जे टाक किंवा बोरूने आणि शाई ने लिहितात ( नवीन पिढीसाठी टाक-जुन्या काळातील लिहिण्याचे साधन ज्याचे टोक शाईत बुडवून लिहावे लागते ) एक पान लिहिण्यास त्यांना 2 तास लागतात.“मी सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर मी माझा “युनिकनेस” माझा वेगळेपणा गमावून बसेल” असे आरीफउल्लाह यांना वाटते आणि म्हणून ते “मुसलमान” ला हस्तलिखितच ठेवणार आहे.आताच्या या झगमगत्या दुनियेत अत्यल्प मोबदला असूनही वडिलोपार्जित व्यवसाय व वारसा जोपासणा-या आरीफउल्लाह व त्यांच्या सहका-यांना सलाम.आरीफउल्लाह हस्तलिखित वृतपत्र सुरु ठेवण्याच्या  “रोजोल्युशनवर” ठाम राहिले.आपण सुद्धा आता “न्यू ईअर रोजोल्युशन” करणारच आहोत,तेंव्हा आपण सुद्धा जे काही रोजोल्युशन करू त्यावर ठाम राहूयात.


नूतन वर्षाभिनंदन ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा