Click "Follow" Button below To Follow this Blog

२३/०२/२०१७

Great Freedom Fighter One And Only Vinayak Damodar Savarkar visited Khamgaon on 18 Feb 1942. 75 years completed to his Khamgaon Visit on 18 Feb 2017

यज्ञकुंड धगधगतच राहणार 

         

                    दि 18 फेब्रुवारी 1942 ला  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे संत पाचलेगांवकर महाराज आयोजित “हिन्दू संघटन यज्ञ” या कार्यक्रमा करीता खामगांवला आले होते.यावर्षी 18 फेब्रुवारीला या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाली.या घटनेचे स्मरण म्हणून खामगांव अर्बन बँक आणि विदर्भ साहित्य संघ खामगांव यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड” हा भागवताचार्य मा. श्री वा.ना.उत्पात यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.18 फेब्रुवारी ला मोहनरावांनी प्रमुख वृत्तपत्रातून सावरकर यांच्या खामगांव भेटीचा व पाचलेगांवकर महाराज भेटीचा सविस्तर वृत्तान्त प्रसिद्ध केला होता. तो वाचूनच सावरकर यांच्या खामगांव भेटीची इत्यंभूत माहिती मिळाली. मग काय शनीवार 18 फेब्रुवारीचे सायंकाळचे नियोजन आखून घेतले कारण हा कार्यक्रम चुकायला नको होता. कार्यक्रमाची सुरुवात “जयोस्तुते जयोस्तुते” या सावरकर रचित काव्याने जोशात समूहगान करुन झाली व श्रोत्यांमधे चैतन्य निर्माण झाले. श्री वा.ना.उत्पात यांनी त्यांच्या अमोघ शैलीत सावरकर यांच्या जीवनातील अनेक घटनांचा उलगडा केला.श्री उत्पात यांचे वय ७७ वर्षे असूनही त्यांची दांडगी स्मरणशक्ती व संस्कृतप्रचुर अमोघ वक्तृत्व याचा प्रत्यय श्रोत्यांना येत होता.सावरकर यांचे बालपण, इंग्लंडमधील दिवस,रॅंगलर परांजपे, खेर यांचे किस्से. सावरकरांच्या प्रेरणेने मदनलाल धिंग्रा व अनंत कान्हेरे कसे प्रेरित झाले होते आणि त्यांनी इंग्रज अधिका-यांना कसे ठार केले हे श्रोत्यांना कळले.“ने मजसी ने परत मातृभूमीला” हे काव्य ब्रायटनच्या समुद्र कीना-यावर सावरकरांना कसे स्फुरले ते रडत-रडत हे गीत गात होते आणि पाल हा त्यांचा सहकारी ते उतरवून घेत होता हे सांगतांना उत्पात यांचा गळा भरून आला होता तसेच अनेक श्रोत्यांचे डोळे पाणावले होते. 1905 या वर्षी दूरदृष्टीच्या सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती आणि त्याचा निषेध गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून केला होता. नंतर 1938 मधे स्वत: गांधीजींनीच विदेशी कपड्यांची होळी करीत आपसूकच सावरकरांचे अनुसरण केले होते.फाळणी होणार हा अंदाज सुद्धा सावरकरांना आधीच आला होता.फाळणी नंतर नेहरुंना पंतप्रधान न करता डॉ.आंबेडकर यांना पंतप्रधान करावे अशी बॅ. जिना यांची विनंती गांधीजींनी धुडकावून लावली होती असे कथन श्री उत्पात यांनी पट्टाभी सीतारामय्या यांच्या पुस्तकाचा दाखला देत केले.आज खोटा इतिहास लिहिणारे गल्लोगल्ली झाले आहेत,सावरकरांची एवढी उपेक्षा का? असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.सावरकर व त्यांचे जेष्ठ बंधू बाबाराव, पत्नी, वहीनी, कनिष्ट बंधू सर्व कुटुंबच्या कुटुंब स्वातंत्र्यासाठी झटले.सावरकरांच्या वहीनीला तर नाशिकच्या घाटावरील पिंडाच्या भातावर जीवन जगावे लागले. कुणाशीही तुलना नाही परंतू सावरकर यांच्या इतक्या हाल अपेष्टा कुणाच्याच झाल्या नाहीत.इतके सोसणा-या सावरकरांची भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर सुद्धा उपेक्षा केली.शत्रुराष्ट्र पाकीस्तानचे पंतप्रधान लियाकत अली आले असता सरकारने आपल्या स्वातंत्र्यवीरास तुरुंगात धाडावे ! अशी निर्लज्ज कृती भारतातच होवू शकते. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असतांना त्यांच्या पुढाकारामुळे संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावले गेले व मागील शासनाच्या सावरकरांच्या बाबतीतील चुकांचे पापक्षालन केले.शेवटी “झालेत बहु, होतील बहु परंतू या सम हाच” असे स्वातंत्र्यवीरांना उद्देशून ते म्हणाले.व्याख्यानाचा विषय सावरकर म्हटल्यावर विशिष्ट वर्गच कार्यक्रमाला हजर राहील अशी अपेक्षा असते परंतू कोल्हटकर स्मारक पूर्ण भरलेले पाहून सावरकर आता जनतेला कळू लागले पटू लागले अशी आशा वाटली आणि सावरकर हे धगधगते यज्ञकुंड जनतेत असेच धगधगतच राहणार याची खात्री पटली. असा सर्वांगसुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खामगांव अर्बन व विदर्भ साहित्य संघ पदाधिका-यांचे आभार. भविष्यात सुद्धा असे उत्तमोत्तम, सावरकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर "जे जे उत्तम उदात्त उन्नत" कार्यक्रम आयोजित करावेत अशीच सर्व रसिकांच्या वतीने विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा