चंदनाच्या पाटावर
सोन्याच्या ताटामंधी...
“चंदनाच्या पाटावर सोन्याच्या
ताटामंधी मोत्याचा घास तुला भरविते...तुला बघून कळी माझी
लई खुलते“ १९७० दशकाच्या
उत्तरार्धात झळकलेल्या दादा कोंडके यांच्या “तुमचं आमचं जमलं” या चित्रपटातील या गाण्याची आठवण परवा ताजी झाली कारण सोन्याच्या ताटामधे खरोखर जेवण करण्याचा आनंद लुटल्या
गेला.निमित्त होते ते उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने त्याच्या घरी दिलेल्या
मेजवानीचे.या कार्यकर्त्याने स्वपक्षातील अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे,
राधाकृष्ण विखे पाटिल इ.जेष्ठ नेत्यांना घरी मेजवानीसाठी आमंत्रित केले. या
मेजवानीसाठी नांदेड येथील “कॅटरर्स” कडून भांडी व जेवण बोलावले गेले होते.
जेवणासाठी सोन्याची ताटे होती. ती सोन्याचा मुलामा दिलेली होती असा मुलामा
नेत्यांनी नंतर आपल्या प्रतिक्रियेत दिला. गरीबांच्या घरी जाणे, तेथे जेवणे असा दिखावा काँग्रेस नेतृत्वाकडून
कित्येक वर्षांपासून केल्या जात आहे. एकीकडे असे देखावे करणे आणि दुसरीकडे
नेत्यांनी सोन्याच्या म्हणा वा सोन्याचा मुलामा दिलेल्या ताटांमधे जेवणावळी करणे
हे या पक्षातील विरोधाभास दर्शविणावरे आहे.अशारितीने थाट-माट दाखवणे हे सर्वच
पक्षातील नेत्यांकडून वारंवार घडत असते. या देशाने अनेक नेते पाहिले आहेत की जे
अत्यंत गरीबीतून पुढे आले परंतू उच्च्पदावर गेल्यावर सुद्धा त्यांनी “साधी राहणी
आणि उच्च विचारसरणी” यांचा त्याग केला नाही. आता एखादा व्यक्ती त्याच्या घरी कशी
मेजवानी देईल हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू जेंव्हा लोकप्रतिनिधी
म्हणा, राज्यकर्ते म्हणा, विरोधक म्हणा यांची समाजातील वर्तनाची बाब येते तेंव्हा
त्यांना अतिशय जपून वावरावे लागते आणि नेमका याचाच विसर या नेते मंडळींना पडतो. लोकप्रतिनिधी , राज्यकर्ते
, विरोधी पक्ष यांना सर्वाना सार्वजनिक जीवनात फार विचारपूर्वक वावरावे लागते
किंबहुना त्यांनी तसे वावरावे अन्यथा आज-कालच्या तंत्रज्ञान समृद्ध जगतात
त्यांच्यावर नामुष्की ओढवू शकते कारण माध्यमे सर्वदूर पोहचली आहेत चलचित्र काढणे,ध्वनी
मुद्रण करणे अतिशय सुलभ पद्धतीने आणि सूक्ष्म साहित्याने करणे शक्य झाले आहे. बरेचवेळा तसे घडले सुद्धा आहे. नुकतेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत एका उमेदवाराने एका शाळेच्या मुख्याध्यापकास
धमकी दिल्याची ध्वनिफीत सर्वदूर पसरली होती.तसेच या सोनाच्या ताटातील जेवणावळीचे झाले.
एकीकडे तुमचे पक्षाध्यक्ष गरीबांच्या घरात जेवतात
त्याची प्रसिद्धि सुद्धा जोरात होते आणि दुसरीकडे तुम्ही सुवर्ण किंवा तत्सम ताटात
पंगतीस बसता तेंव्हा “गरीबी हटाव” नारा ज्यांच्यासाठी तुमच्या माजी
पक्षश्रेष्ठींनी दिला होता असा थाट-माटाची पंगत पाहून ते गरीब सुद्धा अवाक झाले. अनेक साधे नेते काँग्रेस पक्षाने या देशास
दिले आहेत गांधीजींपासून ते अगदी कालच्या पंतप्रधानपद गेल्यावर लगेच शासकीय बंगला
सोडणा-या मनमोहनसिंह यांच्या पर्यंत. पृथ्वीराज चव्हाण देखील दुष्काळग्रस्त भागात
गेले असता त्यांनी एका ठिकाणी पंगतीस जाणे टाळले होते असे सांगतात.प्रश्न जेवणाचा
मुळीच नाही. ते तर “उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म” असे आहे हे रामदास स्वामींनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. उदर
भरण जरुर करा नव्हे ते झालेच पाहीजे कारण तुमच्यावर देशाची जबाबदारी आहे तुमच्या पोटात असले तरच तुम्ही कार्य करू शकाल. परंतू ते जेवण रोज एकचवेळ जेवण करणा-या आणि तसेच दिवसभर
उपाशी राहणा-या हजारो लहान व मोठया गरीब जनते समोर बडेजाव व श्रीमंतीचे ओंगळवाणे
प्रदर्शन करणारे नसावे याचे तरी निदान भान ठेवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा