भगवानने
मुंह दिया;लगे मांगने
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील नागरिकांना ‘फुकट’
मिळवण्याची सवय सरकारनेच लावून दिली आणि आपल्या देशात ‘देणारे’ कमी आणि ‘घेणारे’
जास्त झाले. विनोबांनी जमिनी दया म्हटल्यावर अनेकांनी आपल्या जमिनी “भूदान चळवळीत’
दान केल्या. त्याच देशातील लोक आता नातेवाईक, मित्र, सख्खा भाऊ यांच्या तसेच सरकारी जमिनी
हडपण्याच्या मागे लागले. आपल्या देशात आता “मांगीलाल” अर्थात सरकारकडे सतत काही ना काही
मागण्या करणारे लोक भरपूर प्रमाणात वाढले आहेत. हिंदीत मागणे या मराठी शब्दासाठी “मांग”
हा समानार्थी शब्द आहे. “हमारी मांगे पुरी करो” म्हणत अवास्तव, अवाजवी मागण्या अर्थात
“मांग” करणा-यांना "मांगीलाल" हे विशेषण लावावेसे वाटले. (मांगीलाल नांव असणा-यांनी कृपया
गैरसमज करून घेऊ नये. तसा गैरसमज करून घेतला तर या लेखा विरोधात सुद्धा काही मागणी
होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.) दररोज काही ना काही मागण्या, निवेदने सरकार दरबारी
अव्याहतपणे सुरु असते. अर्थात रास्त मागण्या असतील तर काही हरकत नाही. जेथे कुठे सरकार
चुकत असेल अथवा सरकार काही सोयी, सुविधा पर्यंत पोहचवू शकत नसेल, जनतेच्या हक्कांवर गदा
येत असेल तर मागण्या होणे जरुरीच आहे.परंतू अशा मागण्या करता-करता मग स्वत:च्याच पात्रात
तूप कसे ओढता येईल याचाच सतत विचार आणि मग स्वत:स न्याय मिळावा म्हणून सरकार दरबारी
जातांना उगीचच काहीही टुमणे लावणे, अवाजवी दुरदृष्टीहीन, देशाचे हित सोडून स्वहिताच्या
मागण्या करणे बरोबर नव्हे. मागील रविवारी नव्यानेच सुरु झालेल्या खामगांवातील प्रशासकीय
इमारती मध्ये जाण्याचा योग आला. अंमळ थोडा वेळ होता म्हणून तेथील प्रवेशद्वारा जवळ नव्या
रंग-रंगोटी केलेल्या इमारतीच्या भिंतीवर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या मागण्यांचे एक
पत्रक चिटकवले होते ते वाचले.एक तर नवीन इमारतीवर असे पोस्टर चिटकवावे तरी कसे वाटते
देव जाणे. या पोस्टर वर एक मागणी होती की, कर्मचा-यांची शासकीय निवासस्थाने त्या-त्या
कर्मचा-याच्या नावावर करावीत. ही मागणी पाहून व्यथा, आश्चर्य असे मिश्र भाव मनात आले.
“जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडीले सर्व घरदार सोडला सुखी संसार” अशा
एका कवितेच्या ओळी आठवल्या. देशासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवणा-या त्याच हुतात्म्यांच्या
पुढच्या पिढ्यांनी अशा मागण्या कराव्यात?तुमच्यावर अन्याय होत असेल, वेतन, पगारवाढ
या बाबत वा तत्सम इतर काही मागण्याबाबत काहीही म्हणणे नाही.परंतू तुम्ही सेवानिवृत्त
झाल्यावर तुम्हाला शासकीय निवास्थान आंदण म्हणून दिले तर नवीन चतुर्थश्रेणी कर्मचा-याच्या
निवासस्थानाचे काय?त्यांची सोय सरकारने कुठे आणि कशी करायची?त्याला पुन्हा नवीन घर
देऊन ते पण नंतर त्याच्या सेवानिवृत्त्नीनंतर आंदणात द्यायचे का? क्रांतीवीर चित्रपटात
एका प्रसंगात नाना पाटेकर म्हणतो, “भगवानने मुंह दिया;लगे मांगने” त्याप्रमाणेच
आपल्या देशवासियांना मागण्याची, याचना करण्याची सवयच जडली आहे.सर्व याचक झाले आहेत. या
मागण्या करतांना काही विचार केला जातो की नाही? कुणाच्या सुपीक डोक्यातून या अशा मागण्या
निघतात. सरकार कडून काय-काय पाहिजे?तुम्ही सरकारकडे नोकरी करता तुम्हाला त्याचा मेहनताना
मिळतो, सेवानिवृत्ती वेतन मिळते, वाहन भत्ता, आरोग्य बिले, प्रवास बिले ई मिळते अजून
किती मागणार? चतुर्थ श्रेणी कर्मचारी बंधुंनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याचे निराकरण
व्हायलाच हवे.तुम्हाला विरोध आहे असा गैरसमज करू नये. परंतू तुमच्या वरील
मागण्यांप्रमाणे इतर सर्वच कर्मचा-यांनी अशा मागण्या केल्या तर? आपल्या मागण्या करतांना
सर्वानीच स्वहीताप्रमाणे देशाहित सुद्धा पहाणे जरुरी नाही का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा