जो मिल गया उसी को
मुकद्दर समझ लिया
कालच्या लोकसत्ता
मध्ये खेळाच्या पानावर याच शीर्षकाची एक बातमी होती. देव आनंदच्या जगण्याच्या तत्वज्ञानाच्या
“मै फिक्र को धुएमे उडाता चला गया” या गाण्यातील एक अंतरा शीर्षकातील याच ओळीने सुरु
होतो.लहानपणापासून कधी चिंता निर्माण झाली तर आमचे तिर्थरूप याच गाण्याचा दाखला देत
आम्हाला कधीही चिंता न करण्याचे सांगत आले आहे.त्यामुळे हे गाणे तसे पाठच आहे.
साहीर लुधियानवीने लिहिलेले व जयदेव ने संगीतबद्ध केलेलं हे एक हिंदी चित्रपटसृष्टीच्या
इतिहासातील “माईलस्टोन” म्हणावे असे अप्रतिम गीत आहे. या गीतात सर्वच सौंदर्य एकवटले
आहे साधना,देव, जयदेव,साहीर,दिग्दर्शक विजय आनंद.अशा या सुमारे 50 वर्षांपूर्वी प्रदर्शित
झालेल्या हम दोनो चित्रपटातील गीताची ओळ बातमीचे शीर्षक असलेली पाहून बातमी वाचण्यास
घेतली.बातमी होती “पद्माकर शिवलकर” यांची.उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेल्या पद्माकर शिवलकर
यांना “बी सी सी आय” ने क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार
देण्याचा निर्णय घेतला. हे बातमी वाचल्यावर समजले.पद्माकर शिवलकर मुंबई कडून खेळणारे डावखुरे गोलंदाज होते.वीस वर्षे ते मुंबई संघाकडून कसोटी क्रिकेट खेळले.सर्वाधिक
विकेट घेणारे ते गोलंदाज आहे. त्यावेळेचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज असून सुद्धा त्यांची
निवड भारतीय क्रिकेट संघात कधीही होऊ शकली नाही हे त्यांचे आणि भारतीय क्रिकेट
संघाचे सुद्धा दुर्दैव म्हणावे लागेल.त्यावेळी त्यांच्या ऐवजी बिशनसिंग बेदी यांची
निवड करण्यात आली होती. ती कशी झाली तो भाग वेगळा.
“हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा उसळूनी कोणाचे जीवन उधळी ,
दे कुणास यश उधळोनी”
या शिवलकरांनीच गायलेल्या गीताप्रमाणे शिवलकर यांच्या दैवगतीच्या चेंडूने मात्र त्यांच्या भारतीय संघातील प्रवेशास मात्र हुलकावणी दिलीच.खेळाडू मग ते क्रिकेट वा अन्य कोणत्याही खेळातले असू
देत त्यांची निवड ही पूर्णत: दैवावरच अवलंबून असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
गुणवत्ता असून सुद्धा आपल्या देशातील अनेक खेळाडू मागे का राहिलेत ? कसे राहिलेत ?
क्रिकेटमध्ये तर तीव्र स्पर्धा असते एखादा गुणवंत खेळाडू त्याचे संपूर्ण जीवन
झोकून एखाद्या खेळासाठी देतो आणि जर त्याच्या ऐवजी कुण्या दुस-याची निवड होत असेल
तर ती किती वेदनादायी असते हे तो खेळाडूच
जाणू शकतो. इतर कुणी त्याचे दु:ख समझू शकत नाही. पद्माकर शिवलकर सुद्धा असेच दु:खी
झाले असतील. परंतू त्यांनी सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवला आणि खेळतच राहिले वयाच्या
५० व्या वर्षापर्यंत. कुणाशीही तक्रार नाही की दु:ख उगाळत बसले नाही.
“कबीरा खडा बाजार्मे मांगे सबकी खैर
ना काहू संग दोस्ती ना काहू संग बैर”
या कबीराच्या
उक्तीप्रमाणे शिवलकर राहिले. ते बरे आणि त्यांचे क्रिकेट बरे. कुणी कितीही अन्याय
करो वा कुणावर कितीही अन्याय होवो नियती मात्र अन्याय होणा-यावर अन्याय होवू देत
नाही. नियती त्या अन्याय होणा-या व्यक्तीची दखल घेतेच किंवा घ्यायला भाग पाडते.एखादा व्यक्ती किंवा संस्था कुणावर अन्याय करीत असेल तर त्या व्यक्तीला किंवा
संस्थेला ते ज्ञातच असते आणि कधी ना कधी त्याचे मन, अरबीत फार चांगला शब्द आहे “जमीर”
त्याला “तू अन्याय केला आहेस “ हे सांगतेच आणि मग त्याला स्वस्थ बसवत नाही.त्याप्रमाणेच
घडले बी सी सी आय या संस्थेचा चा “जमीर” इतक्या
वर्षानी जागृत झाला असेल असेच म्हणावे लागेल आणि म्हणून त्यांनी पूर्वी अन्याय
झालेल्या पद्माकर शिवलकर यांना परवा सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला.
क्रिकेट रसिकांच्या विस्मृतीत गेलेले नांव पद्माकर शिवलकर पुन्हा प्रकाश झोतात
आले. माध्यमांनी त्यांना दूरध्वनी करून ही आनंदाची बातमी सांगितली. “इतक्या उशीरा
तुमची दखल घेतली गेली तुम्हाला काय सांगावेसे वाटते ?” असा प्रश्न विचारला असता या
साध्या,देव आनंद सारख्या उत्साही आनंदी माणसाने सकारात्मक आणि जीवनाचे तत्वज्ञान सांगणा-या
देव आनंदच्या गीताची ओळ गायली “जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया”.त्यांनी
दिलेल्या अशा उत्तराने त्यांची प्रतिमा अधिकच उजळली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा