Click "Follow" Button below To Follow this Blog

१४/०३/२०१७

Article against Hon Minister Dilip Kamble's speech

आम्हाला काय कुणाची भीती ?

होळीच्या दिवशी आपल्या राज्याचे सामजिक न्याय राज्यमंत्री मंत्री ना.मा.दिलीप कांबळे यांनी “घाबरायला मी काय ब्राह्मण आहे काय?” असे वक्तव्य केले.राज्यमंत्री महोदय तुमच्या वक्तव्यामुळे ब्राह्मण घाबरतात आणि तुम्ही घाबरत नाही हे सूचित होते. मा. कांबळे साहेब ब्राह्मण हे अनंत काळा पासून या देशाचे शुर सरदार राहिली आहेत. देशावर जेंव्हा जेंव्हा संकट आले तेंव्हा तेंव्हा ब्राह्मणाने आपली दऊत-लेखणी व पळी-पंचपात्रे सोडून ढाल तलवार हाती घेतली आहे.बाजीराव पेशवे ,बाजीप्रभू, मुरारबाजी, पानिपतला लढणारे सदाशिवराव, विश्वासराव पेशवे “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती,देव,देश,अन धर्मापायी प्राण घेतले हाती” म्हणत या देशासाठी लढले.शत्रू आल्यावर घाबरून पळाले नाहीत.तुम्ही जर म्हणत असाल की ब्राह्मण घाबरतात तर होय ब्राह्मण घाबरतात.पंरतू ते घाबरतात या देशाचा कायदा तोड़ण्याला,ब्राह्मण घाबरतात ते इभ्रतीला, ब्राह्मण घाबरतात ते भ्रष्टाचार करण्याला, ब्राह्मण घाबरतात अनितीला, ब्राह्मण घाबरतात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार न वागण्याला. तुमच्या सारखे सामाजिक न्यायखात्याचे राज्यमंत्री असूनही एखाद्या विशिष्ट जातीबद्दल आकस ठेवणे किंवा त्या जातीची निर्भत्सना करणे हे तुम्हालाच जमू शकते एखाद्या ब्राह्मणास नव्हे हे या देशातील कुणीही सांगेल.या देशात शिव्या देण्यास,निर्भत्सना करण्यास एकच जात आहे ती म्हणजे ब्राह्मण याचे कारण ब्राह्मण सर्वाना घाबरतात हे नसून ब्राह्मण सद्सद्विवेकबुद्धिने वागतात.ब्राह्मण शिकवण अनुसरतात “सदा बोलणे नीच सोशीत जावे” हे सांगणा-या रामदास स्वामींची.ब्राह्मण तुमच्या सारखे काहीही बोलतच नाही, अनिष्ट शब्द उच्चारत नाहीत कारण त्यांना “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” हा संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा मन्त्र शिरोधार्ह आहे.“ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोये औरन को शीतल करे आपहु शीतल होय“ यांसारखे कबीराचे दोहे ब्राह्मणास मुखोद्गत असतात.ब्राह्मण संतवचन सदैव स्मरणात ठेवतात आणि म्हणून शांत असतात. ते शांत असतात म्हणून ते घाबरतात असे नव्हे.मा.कांबळे साहेब तुम्ही थोडे इतिहासात डोकावले तर तुम्हाला नीडर ब्राह्मण चिडले तर काय होते हे कळेल.नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही आणि तसे करुन अन्यायी नंदाचा नाश करणारा ब्राह्मण तुम्हाला कळेल,पावनखिंड लढ़वणारा बाजीप्रभु देशपांडे तुम्हाला समजेल,पुरंदर साठी लढ़णारा मुरारबाजी देशपांडे,अटकेपार झेंडे लावणारे रघुनाथराव आठवतील,पहीला बाजीराव कसा शूर होता हे समजेल.लो. टिळक कळतील,सावरकर कळतील,गांधीजींचे गुरु गोखले कळतील,एवढेच काय तर चवदार तळ्याच्या लढ्यात आंबेडकरांना सहकार्य करणारे ब्राह्मण गोडबोले होते हे समजेल. कदाचित तुम्हाला हे सर्व माहीत असेल परंतू तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की ब्रह्मणांविरुद्ध बोलल्याने काहीही होत नाही कारण ब्राह्मण हा विवेकशील आहे आणि शिवाय त्याच्या पाठीशी कायद्याचा काही आधार नाही मग घ्या तोंडसुख.आजही पूर्वी होता तसाच देशप्रेमी ब्राह्मण आहे, आजही तो घाबरत नाही परंतू आज तो शांत आहे कारण त्याला आताचा कायदा त्या कायद्याचे रक्षक, आताची परिस्थिती हे सर्व चांगलेच ज्ञात आहे. मा. कांबळे साहेब तुम्ही कोणत्या पदावर आहात निदान हे तरी ध्यानात घ्या,तुम्ही मंत्री पदाची शपथ घेतांना काय म्हटले होते ते आठवा.सामाजिक खात्याचा राज्यमंत्री जेंव्हा “मुस्काटात दिली असती” असे म्हणतो एखाद्या जातीचा अनादर करतो ही तर सरळ-सरळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या व घटनेतील समान हक्कांची पायमल्ली आहे.अशी पायमल्ली एखादा मंत्री करतो तर मग त्याचे अनुसरण कार्यकर्ते,नागरीक करतील कारण “यथा राजा तथा प्रजा” तुम्ही आजच्या काळातील राजेच. परंतू राजा हा भूपती किंवा भूपेन्द्र म्हणून ओळखला जातो. पृथ्वी ही त्याची पत्नी आणि प्रजाजन हे त्याची लेकरे समजली जातात आणि पित्याला सर्व लेकरे सारखी असतात.मा.कांबळे साहेब भारतातील उपेक्षित,पिडीत,दुर्बळ घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जातीभेद दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटले परंतू तेच उपेक्षित,पिडीत,दुर्बळ आता असे एखाद्या जातीबद्दल अनादराने बोलत आहेत.मा. कांबळे साहेब आज जर बाबासाहेब आंबेडकर असते तर तुमची अशी वाणी ऐकून ते सुद्धा व्यथीत झाले असते.जेंव्हा जेंव्हा देशावर संकट आले तेंव्हा आईच्या गर्भात झुन्झाराची रीत  उमगलेला ब्राह्मण “देशापायी विसरुनी सारी माया ममता नाती” असा आम्हाला काय कुणाची भीती ? म्हणत पुढे सरसावला आहे आणि भविष्यात सुद्धा तसाच राहील लोक काहीही बरळले तरी.

1 टिप्पणी: