बालकांना जाणून
घ्या
मागे एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला होता.कार्यक्रम सुरु
झाला.मी व्यासपीठावर इतर गणमान्यां समवेत बसलो होतो.कार्यक्रम पुढे सरकत होता, भाषणे
होत होती. माझी बोलण्याची वेळ येण्यास वेळ होता. मी आपला श्रवणभक्ती करीत जमिनीवर
बसलेल्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करीत होतो. वर्ग ५ ते १० मधील ते विद्यार्थी
श्रोते म्हणून समोर बसले होते. विद्यार्थी शांततेने कार्यक्रम ऐकत होते आपसात बोलत
नव्हते की चूळ- बुळ करीत नव्हते. परंतू एक लहान विद्यार्थी मला वाटते वर्ग ५ मधील
असावा थोडा अस्वस्थ वाटत होता.कधी मागे तर कधी आजू-बाजूला पहात होता.त्याला
काहीतरी विचारायचे होते परंतू कुणाचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. शेवटी तो स्वत:च
उठला आणि मागे फिरून घाईने जाऊ लागला. तो व्यासपीठापासून जास्त लांब नव्हता
त्यामुळे तो मागे फिरून जातांना त्याची थोडी ओलसर झालेली हाफ पँट माझ्या नजरेतून
सुटली नाही. तो गेला. सर्वांची भाषणे झाली होती.आभार प्रदर्शन सुरु झाले.कार्यक्रम
संपुष्टात येत होता.त्याची जागा अजून रिकामीच होती. माझ्या मनात त्याचाच विचार होता.
कार्यक्रम संपला. मला एक मनुष्य एका मुलाशी काहीतरी बोलत असतांना दिसला. तो त्याच
मुलाशी बोलत होता. बहुधा ते त्याचे शिक्षक असावेत. उत्सुकतेमुळे मी तेथे गेलो. तो
रडत होता. त्याला तेंव्हा लघुशंका अनावर झाल्यामुळे त्याची अवस्था खराब झाली होती.
मी त्वरीत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला गाला वरुन हात फिरवला,तो हिंदी बोलत
होता. त्याला खूप वाईट वाटत होते. मी त्याला म्हटले “अरे बेटा कुछ नही होता,ऐसा तो
बहोत बच्चो के साथ होता है, तू तो बडा प्यारा बच्चा है” त्याला शांत केले त्याच्या
त्या स्थितीवर हसणा-या त्याच्या समवयीन मुलांना सुद्धा समजावले मग त्याला सुद्धा
धीर आला.तो घरी गेला. मग मी सुद्धा घराकडे निघालो ,मनात त्याचेच विचार करीत. मनात
आले तो तर पाचवीतला मुलगा होता. आज काल अगदी लहान वयात मुलांना शाळांत टाकतात. या
लहान मुलांचे कसे होत असेल. नर्सरी सोडा तेथे लहान मुलांच्या शरीर धर्मासाठी
सेविका, आया असतात. के जी 1 पासून तसे नसते. परंतू के जी 1 मध्ये वय तरी असे किती
असते? या वयात तर मुलांना त्यांच्या हाफ पँटची चेन सुद्धा उघडता आणि बंद करता येत
नसते. अशी बालके क्वचित प्रसंगी वर्ग किंवा बेंच सुद्धा खराब करीत असतील. याचवेळी
त्या बालकांना समजून घेणे त्या शिक्षकांची जबाबदारी असते. यासाठी हवे बाल
मानसशास्त्र जाणणारे प्रेमळ शिक्षक. त्या अज्ञान बालकाला सुद्धा मनात त्याने केलेली
चूक समजत असेल परंतू व्यक्त करता येत नाही. घरी पालकांसोबत बोलतांना त्यांना काही
संकोच नसतो परंतू हीच बालके शाळा किंवा इतर ठिकाणी वावरतांना लाजतात, लवकर मोकळी
होत नाहीत अशावेळी शिक्षकांनी त्यांना प्रेमाने, आपुलकीने आपल्या पुत्रवत समजून
घेणे गरजेचे असते. आज-कालच्या या अति “प्रोफेशनल” काळात आत्मीयता जणू हरवत चालली
आहे आहे. अति व्यवसायिकतेमुळे मुलांना आपलेसे केले जात नाही, त्यांच्याशी प्रेमळ
वागणूक आणि आत्मीयता लोप पावत चालली आहे. शाळांची फी, डोनेशन , विविध परीक्षा व
त्यांची फी. शिकवणी फी यासंबधी बोलतांना पालक घरी “सर्व पैश्यासाठी करतात” असे
संवाद व्यक्त करीत असतात. हे संवाद लहान बालके ऐकतात आणि “पैसा म्हणजे सर्वस्व”
अशी भावना त्यांच्या मनात अगदी
लहानपणापासून रुजू लागते. म्हणूनच परीक्षाविधीन कर्मचारी ज्यांना नियुक्ती सुद्धा
मिळाली नसते ते भ्रष्टाचार करतात.जुन्या
काळात गुरु म्हणजे पिता समजला जाई आणि त्याच्याच घरी म्हणजे आश्रमात शाळा असल्याने
गुरुची पत्नी मातेच्या भूमिकेत असे. आता सुद्धा शाळा, शिक्षक, शिक्षिका हे
विद्यार्थ्याला आपले घर, पालक वाटायला हवे. मुलांचे मन समजून घ्यायला हवे, त्यांना
समजून घेतले तर त्या समजून घेणा-या शिक्षकास विद्यार्थी जन्मभर विसरत नाही.
विद्यार्थी अध्यापनाने ज्ञानवंत होतात तर गुरुजनांच्या वागणूकीमुळे,बोलण्यामुळे, आपुलकीमुळे
ते सुसंस्कारीत होत असतात आणि देशाला सुद्धा ज्ञानी व सुसंस्कारीत आधारस्तंभ हवे
आहेत.