बत्ती गुल
त्या दिवशी दैनंदिन कामकाज आटपून
घरी आलो. घरी येतांनाच रस्त्यातच दिवे गेल्याचे दिसले.रस्ते ओले होतील इतका पाऊस
झाला होता. नाल्यांतून पाणी सुद्धा वाहिले नव्हते, “वादल वारं सुटलो गो, वा-यानं तुफान उठलो गो” अशीही
परिस्थिती नव्हती आणि तरीही "बत्ती गुल" झाली होती. पूर्वी गॅस बत्त्या असत त्या विझल्या की "बत्ती गुल" झाली असे म्हणण्याची प्रथा कदाचित असावी. आजही विदयुत पुरवठा खंडीत झाला की अनेकजण बत्ती गुल झाली असे म्हणत असतात. घरी री गेलो तर सौ. चे
महावितरणच्या न लागणा-या फोनवर फोन लावणे सुरू होते. मुलांचा “बाबा लाईन कधी येते ?”
असा ससेमिरा सुरु झाला. ते सुद्धा गरमी आणि डासांमुळे त्रस्त झाले होते. मी ‘फ्रेश’
झालो आणि भगीरथ प्रयत्नांती लागणारा महावितरणचा तो दूरध्वनी लावण्याचा प्रयत्न आता
मी करू लागलो.शेवटी एकदाचा तिकडून फोन उचलला. मनातील रागावर मोठ्या प्रयत्नाने
ताबा मिळवत मी पलीकडच्या माणसाला “लाईन कधी येईल साहेब?” असा नम्रपणे प्रश्न
विचारला “येईल अर्ध्या तासात माणसे गेली आहेत” हे नेहमीचे उत्तर मिळाले. तत्क्षणी
मला जपान मध्ये फारच क्वचित लाईन जाते असे कुठेतरी वाचल्याचे स्मरण झाले. मी त्या पलीकडच्या
माणसाला त्याबाबत सांगितले तो आश्चर्यचकीत होऊन “हो का ! बापरे !” असे म्हणाला. त्याला
“आपल्याकडे असे कधी होणार? आपण कधी सुधारणार?” असे विचारल्यावर तो निरूत्तर झाला मी
पण दूरध्वनी बंद केला.पहिलाच पाऊस तोही अत्यल्प, वारा नाही, वादळ नाही तरी वीज
गेली होती. आश्चर्य वाटते की यांचे विदयुत वितरण खंडितच कसे काय होते ? एरवी एखाद-
दुसरे विदयुत देयक ग्राहका कडून अदा न झाल्यास हे ग्राहकाच्या घरी त्वरीत येऊन
धडकतात. वीज पुरवठा बंद केल्या जाईल अशी तंबी देतात आणि यांची वीज जेंव्हा वारंवार
बंद होते, विदयुत दाब कमी होतो तेंव्हा मात्र यांना कुणाचीही तंबी नाही का काही
कारवाई नाही. मान्य आहे की रात्री-अपरात्री कर्मचारी बंद पडलेला वीज पुरवठा पुन्हा
सुरळीत करून खंडीत झालेला वीज पुरवठा
पुन्हा सुरु करतात. परंतू वीज पुरवठा थोड्याश्या कारणाने खंडितच न व्हावा अशा उपाय
योजना हे का करीत नाहीत? आता काही दिवसांपूर्वी केंद्रीय उर्जामंत्री यांचे मोठे
पान भरून विजे बाबत अमुक करू, ढमुक करू ,प्रत्येक खेड्यात वीज पोहचवू असे मोठे रकानेच्या
रकाने छापून आले होते. अहो प्रथम जेवढे आहे ते सुव्यवस्थितरित्या चालवा ना ! ठीक
आहे तुम्ही प्रयत्न करीत आहात मान्य आहे ,योग्य आहे परंतू असे न होवो की खेड्यांना
स्वयंपूर्ण बनवता-बनवता शहरांची “बत्ती गुल” व्हावी, शहरांचा विदयुत दाब कमी व्हावा. आधीच खेड्या-पाड्याने
जातांना आकोडे टाकलेले दिसतच असतात. तुम्ही प्रथम वीज चोरी संपुष्टात आणा, मोठ मोठ्या
रकमांची थकबाकी कुणाची आहे ते जाहीर करा, ती थकबाकी वसूल करा, शासकीय कार्यालयातून
होणा-या वीज अपव्यया बाबत काही योजना करा. मान्य आहे की सर्वाना वीज मिळाली पाहिजे
परंतू ज्यांना-ज्यांना तुम्ही वीज देणार त्यांच्याकडून वीज देयके त्वरीत वसूल
सुद्धा करा नाहीतर उद्या त्यांच्या वीज बिलाच्या माफीची मागणी होईल, मोर्चे
निघतील. मग पुन्हा कोट्यवधींची बिले माफ कराल आणि मध्यमवर्गीयांच्या खिशाला ताण
देणार, देश आणखी कर्जात बुडवणार. आम्ही तुमचे ग्राहक आहोत सर्व प्रामाणिक ग्राहकांचे
तुम्हाला आवाहन आहे की, ते तुमची वीज वापरण्याचे पैसे देतात, प्रामाणिकपणे दर
महिन्याला देयके भरतात, ठेव जमा करतात आणि वारंवार वीज जाण्याने क्लेश सुद्धा तेच सहन
करतात तेंव्हा तुम्ही “प्रोफेशनल” बना. प्रमाणिक
ग्राहक काही आकोडे टाकून वीज घेत नाही तेंव्हा तुम्ही सुद्धा वारंवार बत्ती गुल
होण्याला आळा घाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा