Click "Follow" Button below To Follow this Blog

२०/०७/२०१७

Article related Indo- China tense situation on Doklam border and Made in China products

किती वस्तू बहिष्कृत कराल ?
नुकतेच डोकलाम सिमेवरील  हिंदी चीनी सैनिकांचे हमरी-तुमरी चे व्हिडीओ सर्वत्र पसरले आणि संदेश पाठवणे सुरू झाले की युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे, जनतेनेच “चिनी वस्तूंवर बहिष्कार करा” अशा आशयाचे संदेश पाठवणे सुरु केले. ब्रिटीशांच्या वेळी बहिष्कार चळवळ करणे हे योग्य होते कारण सरकार ब्रिटीशांचे होते.आता सरकार आपलेच आहे आणि आपल्याच  सरकारच्या सोपस्कारानंतर चिनी माल भारतात येतो आहे. 1990 च्या दशकात भारताने मुक्त अर्थ व्यवस्थेचे धोरण स्विकारले आणि परदेशी वस्तू भारतात विकल्या जाऊ लागल्या. तशा आपल्या वस्तू सुद्धा इतर देशात विकल्या जातात परंतू तुलनेने कमी.चिनने हीच मुक्त अर्थ व्यवस्था 1970 च्या दशकात स्वीकारली.भारत व चिन थोड्याफार फरकाने स्वतंत्र झाले भारत 1947 ला तर चिन 1949 मध्ये.म्हणजे दोघांनीही विकासाची पाऊले टाकण्यास सोबतच सुरुवात केली.“हम दोनो एकही फुटपाथसे खडे हुए थे,लेकीन आज तुम कहाँ और मै कहाँ” दिवार मधील या संवादा प्रमाणे आज उत्पादनाच्या बाबतीत चिन कुठेच्या कुठे जाऊन पोहोचला आहे तर भारत मात्र “मेक इन इंडिया” म्हणत अजूनही पाऊले टाकतच आहे.नेमका या बहिष्कार चळवळीच्या कालावधीतच माझा भ्रमणध्वनी फुटला.मी नवीन भ्रमणध्वनी घेण्यासाठी मार्केट मध्ये शोध सुरु केला.काही अपवाद वगळता जो भ्रमणध्वनी पहाल तर तो चिन मध्ये उत्पादित केलेला.काही भारत, जपान व इतर देशांनी बनवलेले भ्रमणध्वनी सुद्धा सापडले परंतू चौकशीअंती त्यातील अंतर्गत पार्टस सुद्धा चिन निर्मित असतात हे कळले. संगणक, वॉशिंग मशीन, गीझर आणि आणखी कितीतरी वस्तूंमध्ये अंतर्गत माल चिनी आहे. कोणत्या-कोणत्या वस्तू बहिष्कृत कराल? माझ्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी निर्माण झाली.भारतात प्रतिवर्षी लाखो इंजिनीयर त्यांच्या कॉलेजरुपी कारखान्यातून बाहेर पडतात.काय करतात हे इंजिनियर?का भारतात उद्योजक बना असे लहानपणापासून शिकवीत नाही? का अजूनही बहुतांश घरातून “तुला शिकून चांगली नोकरी मिळाली पाहिजे बरे” असेच संवाद ऐकू येतांना दिसतात? “तुला शिकून उद्योगपती बनायचे आहे” असे का ऐकू येत नाही? करोडो तरुण असलेला आपला देश उत्पादनात इतका पिछाडीवर का? इथले बुद्धिमान तरुण इतरत्र का जातात? का त्यांच्या बुद्धीची किमंत केली जात नाही? इथले तरुण करतात काय? तर ग्रामीण तरुण मजुरी न करता व्यर्थ वेळ घालवतांना नाहीतर क्रिकेट खेळतांना खेड्यातून दिसतो आणि शहरी तरुण व्हॉटस अॅप, फेसबुक सांभाळून नोकरीच्या प्रतीक्षेत बसलेला असतो. अर्थात यास काही अपवाद जरूर आहेत पण तेही अगदी थोडके.“मेक इन इंडिया” चे यश अपयश जाऊ द्या परंतू निदान त्याने विदेशातील आणि भारतातील युवकांच्या डोक्यात आपल्याच देशात जागतिक दर्जाचे उत्पादन करावे अशी भावना तर निर्माण झाली.आपली देशभक्ती मोठी क्षणिक असते अतिरेक्यांच्या आडून पाकड्यांनी काही दुष्कृत्ये केली की फक्त त्यांचे पुतळे जाळा, त्यांचा धिक्कार करा.चिनने काही केले की टाका त्याच्या मालावर बहिष्कार.अतिरेक्यांचे पुतळे जाळण्याऐवजी काहीतरी ठोस कृती करा आणि चिनच्या मालाला बहिष्कृत करायचे असेल तर आपण एक उद्दिष्ट ठेवून गुणवत्तापूर्ण निर्मितीचा ध्यास घ्या,अभियंत्यांना प्रोत्साहन द्या त्यांना उद्योग सुरु करण्यास उपयुक्त वातावरण द्या जेणेकरून चिन प्रमाणे आपण सुद्धा निदान एखाद्या देशात तरी आपली मोठी बाजारपेठ निर्माण करू शकू. असंख्य उत्पादनात आज चिनी साहित्य आहे. किती वस्तू बहिष्कृत कराल ? आणि करायच्याच असतील तर व्हीजन असलेले नेते आणि सरकार व कष्टाळू जनता हवी. निव्वळ दिखावू देशभक्ती नको. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा