त्रिखंडात डंका
वाजवणारी उडी
आज 8 जुलै. आज दुपारी माझे जेष्ठ बंधू श्री
अरविंद ताम्हण यांचा मेसेज आला. तो मेसेज होता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ब्रिटीशांच्या
तावडीतून सुटका करण्यासाठी जहाजातून समुद्रात मारलेल्या उडी बाबत. थोर पुरुषांच्या
केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून एक दिवस त्यांना स्मरून आपण पुन्हा आपल्या
व्यापात मग्न होतो. परंतू थोर स्वतंत्रता सेनानी यांच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे
स्मरण करणे किंबहुना ते ठेवणे हे सुद्धा आपले कर्त्यव्य नाही का ? श्री ताम्हण
यांचा संदेश वाचल्यावर मनात हे विचार आले आणि ते कागदावर उतरवू लागलो. सावरकर
यांच्या जीवनातील कित्येक प्रसंग प्रत्येकानी आठवणीत ठेवावे असेच आहेत. आता
लोकांच्या सावरकरच लक्षात नाही तर त्यांच्या जीवनातील प्रसंग कसे माहीत असतील.“मारिया”
या बोटीवरून पोर्ट होल मधून समुद्रात झेपावल्यावर जख्मांसह समुद्रात उडी मारून
मार्सेलिस बेटावर पोहून जाणे हे काही कुण्या ये-या गबाळ्याचे काम नोहे.
विश्वात फक्त आहे विख्यात बहादूर दोन, जे गेले आई
करीता सागरास पालांडून
हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान ||
असे वर्णन लोककवी मन मोहन यांनी केले होते.
जिद्द,
मातृभूमीला परकीयांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी असलेली प्रचंड तळमळ असणाराच हे करू
शकतो. बेटावर पोहचताच आंतर्राष्ट्रीय नियम दावणीला बांधून त्यांना पुन्हा अटक झाली
परंतू ते कितीही संकटे आली तरी निराशेच्या गर्तेत न जाणा-या सावरकरांनी त्याही स्थितीत
“अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला”
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला”
असे काव्य करून मी काही एवढ्या लवकर हार मानणारा नाही असे इंग्रजांना
बजावले. आंतर्राष्ट्रीय न्यायालयात ज्यांच्यावर लवाद चालला ते सावरकर एकमेव. सावरकरांची
या देशात खूप उपेक्षा झाली. त्यांचे तैलचित्र संसदेत लागण्यास 50 वर्षे जावी लागली.साहस
आणि सावरकर हे सामानार्थीच शब्द. लहानपणीच प्लेगच्या साथीचा साहसाने केलेला सामना,
आई वारल्यावर लहानवयात भावंडे आणि वहिनी यांची साहसपूर्वक केलेली देखभाल,तरुणपणी इंग्रजांविरुद्ध
इंग्लंड मध्ये जाऊन साहसाने केलेली स्वातंत्र्य कार्ये, अंदमानात यातनांचा साहसाने केलेला
सामना, रत्नागिरीत साहसाने केलेली अस्पृश्योधाराची कार्ये आणि 107 वर्षांपूर्वी आजच्या
दिनी देशासाठी समुद्र लांघण्यासाठी साहसाने मारलेली उडी. असे साहस अतुलनीय आहे,
त्यासाठी तरुणांनी आणि जनतेने स्वयंस्फूर्तीने
8 जुलै हा “साहस दिन” म्हणून साजरा करणे तसेच तो शाळांमधून साजरा करणे सुरु झाले पाहिजे.
जेणे करून आजच्या विद्यार्थ्यांना साहस, धाडस, तळमळ, जिद्द, देशप्रेम या सर्व बाबी
काय असतात हे माहिती होईल तसेच त्यांना प्रेरणा सुद्धा मिळेल. त्यासाठी सरकार तसे जाहीर
करेल ही वाट पाहण्यात काही अर्थ नाही.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र
अभिवादन.
खरेच शाळांमध्ये असे कार्यक्षम व्हायला हवे
उत्तर द्याहटवा