Click "Follow" Button below To Follow this Blog

२९/११/२०१७

Condition of Teachers Training organised by School Education Department of Maharashtra

शिक्षक प्रशिक्षणांचे नियोजन
महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभाग हा शिक्षणातील नवीन बदल, अभ्यासक्रम, तंत्रज्ञान, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, शालेय बाबतीतीलच स्काउट सारखे अन्य विषय या बाबतीतचे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत असतो. अशी प्रशिक्षणे आयोजित करणे जरूरीच आहे. निश्चितच अशा प्रशिक्षणांमुळे अनेक सकारात्मक बदल हमखास होतात. परंतू अशी प्रशिक्षणे आयोजित करतांना अनेक बाबी दुर्लक्षित केल्या जातात. महाराष्ट्रात अनेक लहान शाळा आहेत या शाळांत विभागाकडून मंजूर शिक्षकांची संख्या कमी असते. कारण ते तुकडी व विद्यार्थी संख्येवर आधारीत आहे. प्रशिक्षणे आयोजित करतांना हा महत्वाचा पहिला मुद्दा लक्षातच घेतला जात नाही. कमी शिक्षक संख्या असलेल्या शाळेतून एक किंवा दोन शिक्षकांना प्रशिक्षणा करीता बोलावणे येते नेमके त्याचवेळी उर्वरीत शिक्षकापैकी कुणावर काही आपातकालीन परीस्थिती म्हणा किंवा काही प्रकृती संबंधीत परीस्थिती किंवा तत्सम असे काही उदभवले व त्याला शाळेतून सुटी घेण्याचे काम पडले तर शाळा आणि विद्यार्थ्याचे कसे होणार ? कमी शिक्षक असलेल्या शाळांना प्रशिक्षण असले की विद्यादानाचे कार्य करण्यात नेहमी व्यत्यय येतो. दूसरा मुद्दा असा आहे की कित्येक वेळा असेही होते की एका प्रशिक्षणाच्या वेळेसच नेमके दुसरेही प्रशिक्षण आयोजित होते. म्हणजे मग काही शिक्षक एकीकडे तर काही दुसरीकडे प्रशिक्षणास. शाळेचे नियोजन शाळेवाले पहात बसतील. तिसरा मुद्दा म्हणजे या प्रशिक्षणावेळी प्रशिक्षकाचे प्रशिक्षण देते वेळचे कंट्रोल. प्रशिक्षणावेळी प्रशिक्षणार्थी हे समवयस्क असल्याने म्हणावे तसे नियंत्रण नसते. तसेच इतरही अनेक मुद्दे आहेत संबंधितांच्या लक्षात आलेच असतील. लेखात पूर्वी म्हटल्याप्रमाणे प्रशिक्षणे ही जरुर असावीत परंतू त्यात योजनाबद्धता असावी. तारखा Overlap होणे टाळले पाहीजे. त्यासाठी प्रशिक्षणे आयोजित करणा-यांच्या विभागांमध्ये ताळमेळ असावा. प्रशिक्षणे झाल्यावर त्या प्रशिक्षणाबाबत एखादी प्रश्नावली किंवा प्रश्नमंजूषा ठराविक कालावधी नंतर घ्यावी जेणे करून आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा प्रषिक्षणार्थ्याना फायदा झाला की नाही किंवा प्रशिक्षणातील मुद्दे  त्यांच्या स्मरणात आहेत की नाही हे सुद्धा कळू शकेल. अन्यथा निव्वळ प्रशिक्षणे आयोजित होत राहतात व त्याचा फायदा किंवा यशस्वीतता ज्ञात होत नाही.तसेच आजच्या तंत्रसमृद्ध जगतात जी प्रशिक्षणे इंटरनेटच्या माध्यमातून घेता येऊ शकत असतील ती त्याप्रकारे आयोजित करावी. अनेक खाजगी संस्था Video Conferencing, Webcast या माध्यमातून त्यांच्या शाखा अथवा कर्मचा-यांशी संपर्क करीत असतात. शिवाय याच माध्यमातून घेतलेल्या त्यांच्या प्रशिक्षणांचा फायदा सुद्धा त्यांना होत आहे आणि त्यांच्या काही योजनांची अंमलबजावणी सुद्धा यशस्वीरित्या होत आहे. मग तंत्रज्ञानाचा असा वापर शिक्षण विभागात नाही का केला जाऊ शकत? अनेक शिक्षक आज तंत्रस्नेही आहेत त्यांना सुद्धा यात सहभागी करावे. आता या सर्व उपरोक्त बाबी “सरकारी काम अन तीन महीने थांब” अशी म्हण ज्याच्या साठी वापरली जाते त्या सरकारी खात्याद्वारे होईल की नाही शंकाच आहे. झालेच तर कधी होईल याची काही शाश्वती नाही परंतू कुण्या कर्तबगार अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीच्या वाचनात जर हा लेख आला तर या प्रशिक्षण ऊहापोहावर काही विचार होईल अशी भाबडी आशा व त्यासाठीच हे विचार व हा लेखन प्रपंच.

२७/११/२०१७

Article on the MP of Samajwadi Party, Azam Khan's statement on Padmavati

...देखी तेरी दिलदारी
 परवा पद्मावती चित्रपटाबाबत बोलतांना समाजवादी पक्षाचे खासदार आजमखान बरळले की ,”मुस्लिम समाज दिलदार अर्थात मोठ्या मनाचा आहे त्यांनी कधीकाळी आलेल्या व हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन चित्रपट असलेल्या ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटात दाखवलेल्या युवराज सलीमची प्रेयसी अनारकली या नार्तिकेबाबत विरोध केला नाही”. आजमखान यांचे असे म्हणणे की अनारकली आणि सलिम यांची प्रेमकथा हे दंतकथा होती.तरीही त्याकाळी चित्रपट बनला, प्रदर्शित झाला व सलीम अनारकली यांची प्रेमकथा दर्शकांनी पाहिली. हे सर्व मुस्लिम समाज हा दिलदार असल्यामुळे झाले.असा त्यांचा युक्तीवाद. या चित्रपटाबाबतचे किस्से, घटना तो बहुचर्चित प्रणय प्रसंग या गप्पा आजही चवीने चघळल्या जातात. आजमखान म्हणतात की मोठ्या मनाने मुस्लिम समाजाने सलिम-अनारकली यांच्या काल्पनिक प्रेमकथेवर आधारीत सिनेमा स्विकारला. त्यास विरोध केला नाही. आता विरोध न होण्यास महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाचा नायक ‘निशान-ए-पाकिस्तान’ युसुफखान अर्थात दिलीपकुमार,नायिका मुमताज देहलवी अर्थात रूपमती मधुबाला तसेच,दिग्दर्शक के आसिफ.व इतर अनेक कलावंत याच दिलदार मनाच्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे होते. मग प्रखर विरोध कसा होणार? पद्मावतीचे सिनेमाचे तसे नाही एका हिंदू महाराणीचे मोगल आक्रमकासोबत स्वप्न्दृश्याचा आधार घेऊन चित्रित केलेले प्रेमप्रसंग हे जे की कधी घडलेच नाही नेमके त्याच्या अगदी विरोधात भंसालीने चित्रपटात दाखवले त्यामुळे हा प्रखर विरोध होत आहे आणि तो योग्यच आहे. अनारकली काय ती तर नर्तकीच ती ही काल्पनिक आणि अशा कित्येक नर्तिका मोगल शासक नाचवीतच असत हा इतिहास सर्वाना ठाऊकच आहे. आजमखान यांच्याप्रमाणे खरेच समाज दिलदार असेल आणि त्यांनी त्याकाळी ‘मुगल-ए-आजम’ ला विरोध केला नसेल तर त्यांची ती दिलदार वृत्ती आजही कायम असावयास हवी ना ! आणि त्यांच्या दिलदारी या स्वभाव वैशिष्ट्यास जागून मग ते आजही अनेक बाबतीत त्यांची दिलदारी दाखवू शकतात. या समाजाचे मन खरेच मोठे असेल तर मग पाकव्याप्त काश्मीर वरचा दावा दिलदार मनाच्या असलेल्या मुस्लीम समाजाच्या पाकिस्तानने सोडून द्यावा. काश्मीर फुटीरतावाद्यांनी सुद्धा दिलदारी दाखवून वेगळ्या काश्मीरचा हट्ट सोडावा. दिलदार मनाने काश्मिरी पंडीतांना पुनश्च काश्मीरमध्ये येण्यास सहकार्य करावे. राम मंदिराबाबत मोठेपणा दाखवावा. समान नागरी कायद्यास मोठ्या मनाने स्वीकारावे. दिलदार मन असलेल्या समाजाच्या फारुख अब्दुल्ला यांना म्हणावे तुमची सैल सुटलेली जिव्हा ताब्यात घ्यावी. या वरील सर्व बाबी दिलदार मनाने स्वीकारा असे म्हटले तर मग आजमखान त्यास मंजूरी देतील काय ? याचे उत्तर नकारार्थीच असेल हे मिसरूड न फुटलेला मुलगाही सांगू शकेल. आजमखान हे वायफळ आणि वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी वृथा वल्गना करू नये. खिलजी हा परकीय आक्रमक होता. त्याला येन केन प्रकारेण पद्मावती हवी होती. परंतू असे होऊ नये म्हणून गोरा, बादल हे काका पुतणे जीवाच्या शर्थीने लढले. पद्मावतीने अल्लाउद्दिनच्या तावडीत सापडू नये म्हणून अनेक स्त्रियांसह ‘जोहार’ केला. हा इतिहास असल्याने पद्मावतीला विरोध होत आहे. आजमखान महोदय पद्मावती राणी होती आणि अनारकली ही काल्पनिक नर्तिका. दिलदार तर होता राणा रतनसिंह की ज्याने अल्लाउद्दीनला प्रथम पाहुण्याची वागणूक दिली परंतू अल्लाउद्दीनने त्याला दगा दिला. आपण केवळ दिलदार असल्याचे सांगू नका खरेच सर्वच बाबतीत दिलदार बनून दाखवा आणि आपला आदर्श प्रस्थापित करा.

२३/११/२०१७

Article describes about current Bollywood Cinema

सिनेमावाल्यांची नौटंकी        
     दरवर्षी चित्रपटावरून वाद उपस्थित होत आहेत. काय चाललंय काय आपल्या देशात? ज्या देशात पूर्वी समाज प्रबोधन, कौटुंबिक, देशभक्तीने ओतप्रोत असे चित्रपट निर्माण होत. त्या देशात आता स्वत:च्या तुमडया भरण्यासाठी जाणून काहीतरी काल्पनिक मसाला भरून, वाद निर्माण करून स्वत:चा चित्रपट जास्त चालेल अशा हेतूने चित्रपट निर्मिती होत आहे. समाजात ऐक्य भावना प्रज्वलीत करणारे चित्रपट निर्माण करण्याऐवजी विविधतेत एकता असणा-या या देशात, विविध कार्यप्रसंगी जातीभेद विसरून एकत्र येणा-या लोकांमध्ये तेढ निर्माण होतील असे चित्रपट हे कसेच काय निर्मितात? यांच्या मागे कोण आहे ? यांना असले चित्रपट काढण्यासाठी कोण फंडिंग करते? मागे “राम तेरी गंगा मैली” या सिनेमातील नटी मंदाकिनी हिला म्हणे दाउदने नटी म्हणून घेण्यास सांगितले होते. त्यानंतरही आपला लोकांनी डोक्यावर घेतलेला संजय दत्त उर्फ संजूबाबा याचे व “अंडरवर्ल्ड” चे संबंध उघड झाले होते. मागे अनिल कपूरचा दाउद सोबतचा फोटो प्रसिद्ध झाला होता. तसेच उठसुठ एकाच धर्माला किंवा त्या धर्मातील प्रथांना “टारगेट” करणारे चित्रपट का निर्माण होतात? ज्या धर्माची किंवा जातीची Nusance Value कमी असते अशा जाती आणि धर्मावर आधारीतच हे चित्रपट निर्मित होतांना दिसत आहेत.आपण कुठे जात आहोत? एकीकडे आपल्या देशातून दुस-या देशांचे उपग्रह सोडले जातात. परग्रहावर जाण्यासाठी आपले भारतीय मोठ्या संख्येने तिकीटे आरक्षित करतात. काल आपण ब्राम्होस क्षेपणास्त्राची हवेतून चाचणी घेतली. मोठ मोठ्या विदेशी कंपन्यांचे CEO हे भारतीय आहेत. तर दुसरीकडे जातीय वाद, सोशल मिडीया वरुन एकमेकांची जातीवाचक निर्भत्सना हे सतत सुरूच असते शिवाय त्यात भरीस भर म्हणून हे धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारे चित्रपट. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम होते त्यामुळे पूर्वी त्यातून सामजिक संदेश मिळत असे, लोक घरी जातांना डोक्यात काही तरी विचार घेऊन जात. आता हे माध्यम म्हणजे निव्वळ पैसे कमावण्याचे व त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याचे साधन झाले आहे. ना कोणता अभ्यास , ना कोणते वाचन , ऐतहासिक चित्रपट काढतांना इतिहासकारांचा सल्ला न घेणे व असा काही तरी मसाला बनवायचा की चित्रपटाने करोडोचा व्यवसाय केला पाहिजे. याला आजही काही अपवाद आहेत परंतू अगदीच कमी. पूर्वी काही बॅनर असे होते की त्यांचा चित्रपट म्हटला की तो काही तरी ‘हटके’ असणार म्हणून लोक उत्सुक असायचे आर. के., नवकेतन,  बी आर फिल्म्स, बासू चॅटर्जी,श्याम बेनेगल,ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट किती सामाजिक जाणीवेचे, किती कौटुंबिक ,किती हलक्या फुलक्या विनोदाचे असत.परंतू आता हे सर्व कालबाह्य झाले.काहीही दाखवा आणि आपला गल्ला भरा.यांना कोण ‘फायनांस’ करते?यांच्या कथा,पटकथा लेखकांनी काही अभ्यास केला आहे की नाही? कशावर काही नियंत्रण नाही. म्हणायला एक ‘सेन्सॉर बोर्ड’ आहे त्याच्याही कात्रीला आता काही धार राहिली नाही. तसेच ‘सेन्सॉर बोर्ड’ काय कात्री लावेल अशी दृश्ये घरच्या घरीच जाहिराती,चित्रपट व मालिकांच्या माध्यमातून टीव्हीवर दिसत आहेत.सरकारने या टीव्ही जाहिराती आणि चित्रपट यांवर कठोर नियमावली करून काही निर्बंध घालणे जरुरी आहे.चित्रपट निर्मिती व त्यासाठी पैसा कुठून येतो यासाठी विशेष “ऑडिट” खाते सुरु करावे.ऐतिहासिक चित्रपट असेल तर त्यासाठी कथालेखक व संवाद लेखन करतांना पाच सदस्यीय इतिहासकारांचे मंडळ असणे जरुरी आहे. यांची नौटंकी जर अशीच सुरु राहील तर पुढील पिढ्या ज्या आताच वाचानापासून दुरावल्या आहेत त्यांच्या डोक्यात चुकीचा इतिहास जाईल.

१५/११/२०१७

Article on "Sadaphuli" , a flourished plant in all season

सदाफुली
काल सकाळच्या वेळी घरच्या बागेत सदाफुली कडे लक्ष गेले. तशी तर ती रोजच दिसते. पण आज सदाफुलीकडे पाहिल्यावर सदाफुलीचे साधे सुधे छोटेसे  फुलांनी लदबदलेले झाड सुद्धा मानवास काही ना काही शिकवणारे आहे असा विचार मनात आला. रवींद्रनाथ टागोर “निसर्गाकडे चला” असे म्हणत कारण निसर्ग मानवाला खूप काही शिकवतो. “शांतीनिकेतन” ही निसर्गाच्या सान्निध्यातील शाळा सुरु करण्यामागे त्यांचे निसर्गप्रेम हेच कारण आहे. सदाफुली हे  म्हणायला एक साधे सुधे झुडपी प्रकारात मोडणारे झाड. परंतू सदाहरित. ऋतू कोणता का असोन या झाडाला सदा न कदा पांढरी आणि जांभळी फुले फुललेली. म्हणूनच याचे नांव सदाफुली पडले असावे.गुलाब, कमळ , मदनमस्त, कृष्णकमळ, मधुमालती, रातराणी ,मोगरा , केतकी , चमेली इ. प्रकारच्या सुंदर फुलांच्या मानाने सदाफुली म्हणजे एकदमच सामान्य. सर्वांग सुंदर सुवासिक फुलांमध्ये सदाफुली म्हणजे जणू विविध दागिने व उंची वस्त्र ल्यालेल्या स्त्रियांमध्ये सुती साडी परिधान केलेली व काळी पोत घातलेली परंतू सुहास्यवदना असलेली सामान्य स्त्रीच भासते. समारंभात नटून थटून आलेल्या स्त्रियांमध्ये एखादी रूपवती स्त्री तिच्या साध्या राहणीने चित्तवेधक दिसते तशीच विविध फुलांनी फुललेल्या बागेत ही सदाफुली दिसते. ज्ञानेश्वर माऊलींनी “मोगरा फुलला....” असे म्हटले आणि तद्नंतर अनेकांनी अनेक फुलांवर काव्ये केली. साधी सुधी सदाफुली मात्र उपेक्षितच राहिली. जरी ही सदाफुली साधी सुधी असली तरी ही मानवाला अनेक गोष्टी शिकवणारी अशी आहे. सदाफुली कुठेही लावा ती जगते अगदी अत्यल्प पाणी असले तरी. तिला ना खत ना इतर झाडांना लागतात तसे आणखी  काही सोपस्कार. सदाफुली ऋतू कोणताही असो सतत फुले फुलवून हसतच राहणार .माणूस या झाडाकडून जगण्याचे हेच तंत्र शिकू शकतो. परिस्थिती कशीही असली तरी जीवन जगावे. कुणी सुखाचे पाणी देवो अथवा न देवो ओठी सदाफुली प्रमाणे
हास्य फुलेलेले असावे. अंगावर उन पडो वा पाऊस, थंडी असो वा  इतर कोणतीही परिस्थिती सदाफुलीप्रमाणे जगता येण्याची कला आत्मसात केली पाहिजे. कुणी प्रेमरुपी, विचाररुपी खत टाको अथवा न टाको सदाफुलीच्या मुळांप्रमाणे आपणच आपले हात पाय पसरून आपली क्षमता वाढवून मानसिक, वैचारिक, बौद्धिक वाढ करीतच राहिली पाहिजे. सदाफुलीच्या विविध औषधी गुणांप्रमाणे आपण सुद्धा कुणासाठी उपयुक्त ठरू शकतो. या बाबी सदाफुली कडून मानव निश्चितच शिकू शकतो. आजकालच्या जगतातील चमक-धमक पाहून, इतरांच्या भौतिक सुख सुविधा पाहून त्या आपल्याजवळ सुद्धा असाव्यात अशा मानसिकतेत वाढ होतांना दिसत आहे म्हणूनच मोबाईल चो-या,मोबाईलसाठी खून, एटीएम मशीनच पळवणे अशी कृत्ये घडतांना दिसतात तसेच अधिकारी व लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करून नाना प्रकारच्या भौतिक वस्तूंचा साठा करतांना दिसून येतात. सदाफुली प्रमाणे आहे त्या परिस्थितीमध्ये जगावे असे आता कुणाला वाटत नाही. “ठेविले अनंते तैसेचि राहावे...” तुकोबांच्या या उक्तीप्रमाणे सदाफुली जगते. असे जगणे  कठीण जरी असले तरी माणूस तसा प्रयत्न मात्र हमखास करू शकतो आणि सदाफुली प्रमाणे सर्व परिस्थितीत सदाबहार राहू शकतो.

०९/११/२०१७

Article on the occasion of 1 year completion to demonetization declared by Mr Narendra Modi PM India on 08/11/2016

सत्तेसाठी रोष टाळला.....देशासाठी रोष पत्करला 
     गतवर्षी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता “आज रात 12 बजे के बाद 500 और 1000 के नोट लीगल टेंडर नही रहेंगे” या पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या घोषणेला काल एक वर्ष पूर्ण झाले. खरे तर नोटबंदी ऐवजी नोट बदली म्हणायला पाहिजे. तसा हा विषय मोठा गहन आहे. विविध अर्थशास्त्रीनी यावर भिन्न भिन्न मते प्रकट केली आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग या निर्णयाचे वर्णन “संघटीत लूट” करतात. तर या निर्णयाचे समर्थक या निर्णयास देश बदलविणारा, काळ्या पैस्यास अवरोध करणारा निर्णय मानतात. नोटबंदीमुळे काय साध्य झाले काय नाही याचा उहापोह करायचा म्हटले तर या विषयावर एक वर्षापासून विविध मते प्रकट होत आलेली आहेतच. “नोटबंदी फसली” असे सुद्धा म्हटले गेले. ती फसो अथवा ना फसो हा निर्णय घेण्यात मा. पंतप्रधानांचा हेतू मात्र देशहित, दहशतवादास पायबंद, नकली नोटांचा सुळसुळाट रोखणे ,काळ्या पैस्यास अटकाव करणे हाच होता. जनता उतावळी असते. जनतेला ताबडतोब बदल अपेक्षित असतो. एखादा निर्णय घेतला की त्याचे चांगले परिणाम लगेच हवे असतात. नोटबंदी नंतर झालेला चलन तुटवडा , एटीएम वरील रांगा , दिवसागणिक बदलणारे निर्णय, बँकांनी केलेली हेरफेर यामुळे सामान्य जनता भरडली गेली, त्रस्त झाली आणि विरोधकांच्या हाती कोलीत मिळाले. तसे आर्थिक  व्यवहार  पूर्वपदावर येऊनही आता बरेच दिवस झाले आहेत. या निर्णयात काहीच त्रुटी नव्हत्याच असेही नाही परंतू देशाच्या हितासाठी घेतलेला हा निर्णयच चुकीचा कसा होता हे पटवणे अजूनही सुरुच आहे. काल हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला गेला. नोटबंदीमुळे काहीही साध्य झाले नाही असे म्हणणा-यांना विविध खात्यात पैसा आला हे दिसत नाही, करबुडवण्याची सवय लागलेल्या चांगल्या चांगल्या बेगडी देशप्रेमी धनवानांना कर भरावा लागला. कोट्यवधी रुपयांच्या रकमा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विक्रमी स्वरूपात कर रूपाने सरकारी तिजोरीत जमा झाल्या. ज्या देशातील नागरिक “कॅशलेस व्यवहार” करण्यास कचरत होते ते “टेक्नोसॅव्ही” प्रमाणे “कॅशलेस व्यवहार” करू लागले. “कॅशलेस व्यवहार” करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. विविध व्यापारी प्रतिष्ठानांमधून “पीओएस” मशीन वापरण्यामध्ये सुद्धा लक्षणीय अशी वाढ झाली. अजूनही चांगले परिणाम आगामी काळात दृष्टीक्षेपात येतीलच परंतू त्यासाठी धीर धरावा लागणार आहे. काही ठिकाणी “कॅशलेस व्यवहार” कमी सुद्धा झालेले दिसतात परंतू त्यास चलन उपलब्धी हे कारण आहे. असे असतांना उगीच “कॅशलेस व्यवहार” कमी झाल्याचा देखावा निर्माण केल्या जात आहे. “कॅशलेस व्यवहार” वाढल्याचा दावा खुद्द “कॅशलेस व्यवहार” सुविधा पुरवणा-या कंपन्यानी केला आहे व तसे जाहीर केले आहे. चाणक्य म्हणतात देशाच्या कर उत्पन्नात जर वाढ होत असेल तर तो देश प्रगती पथावर आहे असे समजावे. नोटबंदी नंतर कर उत्पन्न वाढले आहे. आगामी काळात ते असेच वाढलेले असेल असे सरकारने घेतलेल्या काही आर्थिक निर्णयांमुळे वाटत आहे. आपल्या देशात स्वत:चा काही व्यक्तीगत फायदा होत असेल तर ते सरकार चांगले. देशाचे काही चांगले होत असेल त्यासाठी स्वत:ला काही त्रास होत असल्यास सरकार वाईट. असा समज चांगलाच रुढ झाला आहे. असा समज ठेवणे हे देशासाठी निश्चितच चांगले नाही. नोटाबंदीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला परंतू तो निर्णय देशाच्या हितासाठीच घेतला गेला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांना यशवंतराव चव्हाण व एका समितीने नोटा बंदी करण्याचा सल्ला दिला होता परंतू सत्ता टिकवण्यासाठी, अंतर्गत विरोध होऊ नये म्हणून देशहित बाजूला सारले व इंदिरा गांधींनी जनरोष टाळला तर मोदी यांनी देशहितासाठी जनरोष पत्करला.

०२/११/२०१७

Article on Raseela Vadher, the forest officer of Gujarat’s Forests and Environment Department, who has rescued many wild animals

रसिला....एक ‘शेरदिल’ महिला
शीर्षक वाचून थोडे Confuse झाल्यासारखे वाटेल. तसे वाटणे स्वाभाविकच आहे. कारण शीर्षकातील हिंदी शब्द. “रसिला” या शब्दाचा अर्थ म्हणाल तर एखादा चविष्ट पदार्थ. त्यानंतर शेरदिल आणि महिला असे शब्द सुद्धा आहे आता रसिला आणि शेरदिल महिला अर्थात धाडसी स्त्री यांचे काय Combinition, काय संयोग असेल असा प्रश्न कुणालाही पडेलच. त्या दिवशी घरी एकटाच होतो , टी. व्ही. लावला Animal Planet वाहिनी लावली त्यावर उजव्या बाजूस Geer Forest Gujrath असे शीर्षक दिसले तसे आता एकाच वहिनीवर विसावणे कुणालाही सहसा जमत नाही परंतू मी त्याच वाहिनीवर विसावलो. रिमोट वरचा कंट्रोल काढून टाकला आणि गुजराथ मधील सिंहांच्या राष्ट्रीय उद्यानातील “रसिला वाधेर” नामक सिंहीणी सारख्या महिलेची माहिती पाहू लागलो. आपल्या देशात अनेक महिलांनी अलौकिक अशी कामगिरी बजावलेली आहे. गार्गी, मैत्रेयी यांच्या पासून ही परंपरा आहे. आता गार्गी मैत्रेयी यांची नांवे घेतली तर कुणी “राहू द्या ती पुराणातील वानगी पुराणातच” असेही म्हणेल पण ते जाऊ द्या. आजच्या भारतीय स्त्रिया पायलट, ट्रक चालक. रिक्षा चालक, बस वाहक, प्रशासन सर्वच क्षेत्रात गरुड झेप घेत आहे. त्याच यादीत आता रसिला सुद्धा समविष्ट झालेली आहे. 2007 मध्ये गीर जंगलात वनरक्षक म्हणून रुजू झाली. भारतातील कदाचित पहिल्याच अशा वनरक्षक महिलांच्या पथकात तिचा समावेश झाला होता. तिला कार्यालयीन किंवा वनरक्षक म्हणून कार्य करण्यापेक्षा वन विभागातच परंतू काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती आणि त्यातही त्यासाठी तिने बचाव पथकात समावेश होण्यासाठी तयारी सुरु केली. आणि तिची इच्छा पूर्ण झाली. सिंहांच्या बचाव पथकात ती काम काज करू लागली. सिंहांसोबतच बिबट्या, मगर असेही प्राणी ती उपचारासाठी म्हणून सहज हाताळू लागली. प्राण्यांना जेंव्हा जखमा होतात त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना बेशुद्ध करण्यासाठी बंदुकीद्वारे जी इंजक्शने दिली जातात ती देण्यात सुद्धा ती वाकबगार झाली. हे सर्व करता करता आजरोजी पावेतो तिने 300 पेक्षा जास्त सिंह आणि 515 बिबटे तसेच इतरही प्राण्यांचा बचाव किंवा सुटकेचे कार्य केले आहे. “ही 24 तासांची ड्युटी आहे , यात काहीही Schedule नाही कधीही काही काम पडले तर वेळ जायला नको” असा तिचा दृष्टीकोण आहे. कधी एखादे बचाव कार्य 15 मिनिटात आटोपते तर कधी तासं तास  लागतात. प्रत्येक प्राण्याची
Raseela Vadher
स्वभाव वैशिष्ट्ये वेगळी असतात आणि ती समजून घ्यावी लागतात. सिंह हल्ला करण्याच्या आधी शेपूट हलवून किंवा गर्जना करून इशारा देतो तर बिबट्या मात्र अचानक हल्ला करतो. प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कार्य यात खुप तफावत असते कारण प्रत्यक्ष बचाव कार्य करतांना बचाव पथकाला त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो असे रसिला सांगते. या हिंस्त्र श्वापदांचा गीर मधील गावक-यांना सुद्धा त्रास होतो. त्यांची जनावरे कधी कधी या प्राण्यांची भक्ष्य बनतात. तेंव्हा गावक-यांना सुद्धा विश्वासात घ्याये लागते.आता गावकरी बरेच सरावले आहेत त्यांना वन्यजीवांचे महत्व सुद्धा कळले आहे, त्यांना आता या प्राण्यांसोबत जगण्याची सवय झाली आहे. गावक-यांना ते समजावण्याचे कार्य सुद्धा रसिला पार पाडते. महाराष्ट्रातील अधिका-यांना सुद्धा रसिलाने बचाव कार्याचे ‘प्रेझेन्टेशन’ दिलेले आहे. हे सर्व करण्यास कौटुंबिक आधाराची सुद्धा गरज असते विवाह होऊन जास्त दिवस झालेले नसले तरीही ती गीरच्या जंगलात एकटी राहते. तिचा पती वेरावल  नावाच्या  60 किमी अंतरावरच्या गावात राहतो. एक दिवसाआड तिला भेटतो कधी कधी ते ही शक्य होत नाही. शहरी “बीजी वर्किंग कपल” प्रमाणे त्यांच्या मध्ये चांगली “अंडरस्टँडिंग” आहे. ती सर्व जबाबदारी पार पाडते अगदी शहरी “वर्किंग वूमन” प्रमाणे. तिचे भांदुरी नावाचे गांव 42 किमी अंतरावर आहे परंतू ती वनविभागाच्या निवासस्थानातच राहते. सिंह कळपाने राहतो, त्याच्या कुटुंबाची देखरेख, पालन पोषण सिंहीण करीत असते. त्याचप्रमाणे रसिला ही वनविभागाच्या बचाव पथकाची प्रमुख सुद्धा एखाद्या सिंहिणी प्रमाणे तिच्या दोन कुटुंबाचा सांभाळ करीत आहे. एक 
तिचे खरे कुटुंब आणि दुसरे ज्यांना ती आपले कुटुंब मानते ते वन्यजीवांचे कुटुंब. गीरच्या जंगलातील बचाव पथकात मोठी जबाबदारी पार पाडत असलेल्या रसिला या शेरदिल महिलेची दखल माध्यमांनी मात्र  म्हणावी तशी घेतली नाही. तिची ही “स्टोरी” आपल्या भागातील तरुणींना निश्चितच प्रेरणादायी ठरेल.