Click "Follow" Button below To Follow this Blog

१५/११/२०१७

Article on "Sadaphuli" , a flourished plant in all season

सदाफुली
काल सकाळच्या वेळी घरच्या बागेत सदाफुली कडे लक्ष गेले. तशी तर ती रोजच दिसते. पण आज सदाफुलीकडे पाहिल्यावर सदाफुलीचे साधे सुधे छोटेसे  फुलांनी लदबदलेले झाड सुद्धा मानवास काही ना काही शिकवणारे आहे असा विचार मनात आला. रवींद्रनाथ टागोर “निसर्गाकडे चला” असे म्हणत कारण निसर्ग मानवाला खूप काही शिकवतो. “शांतीनिकेतन” ही निसर्गाच्या सान्निध्यातील शाळा सुरु करण्यामागे त्यांचे निसर्गप्रेम हेच कारण आहे. सदाफुली हे  म्हणायला एक साधे सुधे झुडपी प्रकारात मोडणारे झाड. परंतू सदाहरित. ऋतू कोणता का असोन या झाडाला सदा न कदा पांढरी आणि जांभळी फुले फुललेली. म्हणूनच याचे नांव सदाफुली पडले असावे.गुलाब, कमळ , मदनमस्त, कृष्णकमळ, मधुमालती, रातराणी ,मोगरा , केतकी , चमेली इ. प्रकारच्या सुंदर फुलांच्या मानाने सदाफुली म्हणजे एकदमच सामान्य. सर्वांग सुंदर सुवासिक फुलांमध्ये सदाफुली म्हणजे जणू विविध दागिने व उंची वस्त्र ल्यालेल्या स्त्रियांमध्ये सुती साडी परिधान केलेली व काळी पोत घातलेली परंतू सुहास्यवदना असलेली सामान्य स्त्रीच भासते. समारंभात नटून थटून आलेल्या स्त्रियांमध्ये एखादी रूपवती स्त्री तिच्या साध्या राहणीने चित्तवेधक दिसते तशीच विविध फुलांनी फुललेल्या बागेत ही सदाफुली दिसते. ज्ञानेश्वर माऊलींनी “मोगरा फुलला....” असे म्हटले आणि तद्नंतर अनेकांनी अनेक फुलांवर काव्ये केली. साधी सुधी सदाफुली मात्र उपेक्षितच राहिली. जरी ही सदाफुली साधी सुधी असली तरी ही मानवाला अनेक गोष्टी शिकवणारी अशी आहे. सदाफुली कुठेही लावा ती जगते अगदी अत्यल्प पाणी असले तरी. तिला ना खत ना इतर झाडांना लागतात तसे आणखी  काही सोपस्कार. सदाफुली ऋतू कोणताही असो सतत फुले फुलवून हसतच राहणार .माणूस या झाडाकडून जगण्याचे हेच तंत्र शिकू शकतो. परिस्थिती कशीही असली तरी जीवन जगावे. कुणी सुखाचे पाणी देवो अथवा न देवो ओठी सदाफुली प्रमाणे
हास्य फुलेलेले असावे. अंगावर उन पडो वा पाऊस, थंडी असो वा  इतर कोणतीही परिस्थिती सदाफुलीप्रमाणे जगता येण्याची कला आत्मसात केली पाहिजे. कुणी प्रेमरुपी, विचाररुपी खत टाको अथवा न टाको सदाफुलीच्या मुळांप्रमाणे आपणच आपले हात पाय पसरून आपली क्षमता वाढवून मानसिक, वैचारिक, बौद्धिक वाढ करीतच राहिली पाहिजे. सदाफुलीच्या विविध औषधी गुणांप्रमाणे आपण सुद्धा कुणासाठी उपयुक्त ठरू शकतो. या बाबी सदाफुली कडून मानव निश्चितच शिकू शकतो. आजकालच्या जगतातील चमक-धमक पाहून, इतरांच्या भौतिक सुख सुविधा पाहून त्या आपल्याजवळ सुद्धा असाव्यात अशा मानसिकतेत वाढ होतांना दिसत आहे म्हणूनच मोबाईल चो-या,मोबाईलसाठी खून, एटीएम मशीनच पळवणे अशी कृत्ये घडतांना दिसतात तसेच अधिकारी व लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करून नाना प्रकारच्या भौतिक वस्तूंचा साठा करतांना दिसून येतात. सदाफुली प्रमाणे आहे त्या परिस्थितीमध्ये जगावे असे आता कुणाला वाटत नाही. “ठेविले अनंते तैसेचि राहावे...” तुकोबांच्या या उक्तीप्रमाणे सदाफुली जगते. असे जगणे  कठीण जरी असले तरी माणूस तसा प्रयत्न मात्र हमखास करू शकतो आणि सदाफुली प्रमाणे सर्व परिस्थितीत सदाबहार राहू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा