सिनेमावाल्यांची नौटंकी
दरवर्षी
चित्रपटावरून वाद उपस्थित होत आहेत. काय चाललंय काय आपल्या देशात? ज्या देशात
पूर्वी समाज प्रबोधन, कौटुंबिक, देशभक्तीने ओतप्रोत असे चित्रपट निर्माण होत. त्या
देशात आता स्वत:च्या तुमडया भरण्यासाठी जाणून काहीतरी काल्पनिक मसाला भरून, वाद
निर्माण करून स्वत:चा चित्रपट जास्त चालेल अशा हेतूने चित्रपट निर्मिती होत आहे. समाजात
ऐक्य भावना प्रज्वलीत करणारे चित्रपट निर्माण करण्याऐवजी विविधतेत एकता असणा-या या
देशात, विविध कार्यप्रसंगी जातीभेद विसरून एकत्र येणा-या लोकांमध्ये तेढ निर्माण
होतील असे चित्रपट हे कसेच काय निर्मितात? यांच्या मागे कोण आहे ? यांना असले
चित्रपट काढण्यासाठी कोण फंडिंग करते? मागे “राम तेरी गंगा मैली” या सिनेमातील नटी
मंदाकिनी हिला म्हणे दाउदने नटी म्हणून घेण्यास सांगितले होते. त्यानंतरही आपला लोकांनी
डोक्यावर घेतलेला संजय दत्त उर्फ संजूबाबा याचे व “अंडरवर्ल्ड” चे संबंध उघड झाले
होते. मागे अनिल कपूरचा दाउद सोबतचा फोटो प्रसिद्ध झाला होता. तसेच उठसुठ एकाच
धर्माला किंवा त्या धर्मातील प्रथांना “टारगेट” करणारे चित्रपट का निर्माण होतात?
ज्या धर्माची किंवा जातीची Nusance Value कमी असते अशा जाती आणि धर्मावर आधारीतच हे चित्रपट
निर्मित होतांना दिसत आहेत.आपण कुठे जात आहोत? एकीकडे आपल्या देशातून दुस-या
देशांचे उपग्रह सोडले जातात. परग्रहावर जाण्यासाठी आपले भारतीय मोठ्या संख्येने
तिकीटे आरक्षित करतात. काल आपण ब्राम्होस क्षेपणास्त्राची हवेतून चाचणी घेतली. मोठ
मोठ्या विदेशी कंपन्यांचे CEO हे भारतीय आहेत. तर दुसरीकडे जातीय वाद, सोशल मिडीया
वरुन एकमेकांची जातीवाचक निर्भत्सना हे सतत सुरूच असते शिवाय त्यात भरीस भर म्हणून
हे धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारे चित्रपट. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम होते
त्यामुळे पूर्वी त्यातून सामजिक संदेश मिळत असे, लोक घरी जातांना डोक्यात काही तरी
विचार घेऊन जात. आता हे माध्यम म्हणजे निव्वळ पैसे कमावण्याचे व त्यासाठी
कुठल्याही थराला जाण्याचे साधन झाले आहे. ना कोणता अभ्यास , ना कोणते वाचन ,
ऐतहासिक चित्रपट काढतांना इतिहासकारांचा सल्ला न घेणे व असा काही तरी मसाला
बनवायचा की चित्रपटाने करोडोचा व्यवसाय केला पाहिजे. याला आजही काही अपवाद आहेत
परंतू अगदीच कमी. पूर्वी काही बॅनर असे होते की त्यांचा चित्रपट म्हटला की तो काही
तरी ‘हटके’ असणार म्हणून लोक उत्सुक असायचे आर. के., नवकेतन, बी आर फिल्म्स, बासू चॅटर्जी,श्याम बेनेगल,ऋषिकेश
मुखर्जी यांचे चित्रपट किती सामाजिक जाणीवेचे, किती कौटुंबिक ,किती हलक्या फुलक्या
विनोदाचे असत.परंतू आता हे सर्व कालबाह्य झाले.काहीही दाखवा आणि आपला गल्ला भरा.यांना
कोण ‘फायनांस’ करते?यांच्या कथा,पटकथा लेखकांनी काही अभ्यास केला आहे की नाही?
कशावर काही नियंत्रण नाही. म्हणायला एक ‘सेन्सॉर बोर्ड’ आहे त्याच्याही कात्रीला आता
काही धार राहिली नाही. तसेच ‘सेन्सॉर बोर्ड’ काय कात्री लावेल अशी दृश्ये घरच्या घरीच
जाहिराती,चित्रपट व मालिकांच्या माध्यमातून टीव्हीवर दिसत आहेत.सरकारने या टीव्ही जाहिराती
आणि चित्रपट यांवर कठोर नियमावली करून काही निर्बंध घालणे जरुरी आहे.चित्रपट निर्मिती
व त्यासाठी पैसा कुठून येतो यासाठी विशेष “ऑडिट” खाते सुरु करावे.ऐतिहासिक चित्रपट
असेल तर त्यासाठी कथालेखक व संवाद लेखन करतांना पाच सदस्यीय इतिहासकारांचे मंडळ
असणे जरुरी आहे. यांची नौटंकी जर अशीच सुरु राहील तर पुढील पिढ्या ज्या आताच वाचानापासून
दुरावल्या आहेत त्यांच्या डोक्यात चुकीचा इतिहास जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा