नेताजी आम्हाला माफ करा
लेख. तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात
खामगांवात येऊन गेलात आणि टिळक
मैदानावर भाषण
देऊन खामगांवकरांना प्रेरित केले होते. असे म्हणतात की, ते तुमचे शेवटचे जाहीर
भाषण होते. 70 वर्षांपूर्वीचा तो काळ. आताच्या पिढीपर्यंत तर तुमच्या अनेक
गोष्टीही पोहोचलेल्या नाहीत. तुम्ही आमच्या गावात येऊन गेला होता हे सुद्धा अनेकांना
आता ठाऊक नसेल.तुमच्या त्या खामगावातील भाषणाची आठवण म्हणून तुम्ही खामगांवकरांना
स्वातंत्र्याची प्रेरणा दिली होती त्याच टिळक मैदानावर तुमचा पुतळा बसवण्याचा खामगांव
न.प. ने कधीकाळी ठराव पारीत केला होता. आज त्या ठिकाणी मैदान नावासही दिसत नाही.आमचा देश दुस-याच्या हद्दीत घुसत नाही. देशांतर्गत मात्र सुशिक्षित,
अशिक्षित सर्वच अतिक्रमण करीत असतात, दुस-याच्या हद्दीत घुसत असतात. शेताच्या धु-यांवरून
तर खून पडतात. तसेच खामगांव न.प.ची तुम्ही भाषण दिलेली जागा सुद्धा आता मोकळी नाही. या जागेवर तुमचा पुतळा बसवण्याचा तो ठराव कधी थंड बस्त्यात गेला हे सुद्धा
आता खामगांवकरांना आठवत नाही. त्यानंतर ब-याच वर्षांनी तुमचा पूर्णाकृती पुतळा
सुद्धा तयार करण्यात आला व टिळक मैदानावर चबुतरा सुद्धा बांधण्यात आला. त्यावेळी तुमच्या
नावाशी साधर्म्य असलेले सुभाषराव देशपांडे हे नगराध्यक्ष होते. परंतू पुनश्च
काही
अडचण म्हणा वा राजकिय अपरिहार्यता म्हणा तुमचा तो पूर्णाकृती पुतळा नगर परिषद
कार्यालयात ठेवण्यात आला. तुमच्या पुतळ्याबाबत सतत पाठपुरावा,उपोषण करणारे तुम्हीच
स्थापन केलेल्या पक्षाचे पुष्करमल गुप्ता हे एकमेव व्यक्ती आहे. ते सुद्धा ही
मागणी रेटून रेटून आता थकले. काल शिवसेनेचे भिकुलाल जैन यांनी डफडे बजाव आंदोलन
केले. परंतू तुमचा पुतळा बसवण्याचे काही मनावर घेतले जात नाही. तुमच्या मुळे आम्ही
स्वतंत्र झालो, त्या स्वतंत्रतेची फळे चाखून राहिलो,स्वच्छंद झालो,स्वैराचारी झालो
परंतू तुमचाच पुतळा बसवण्याची तळमळ, धमक आमच्यात नाही. शेजारच्या मलकापूर शहरात सुद्धा
तीच गत.तुम्ही भाषण केलेली मलकापूरातील जागा घाणीने वेढली आहे. आता तर नवीन पुतळे धोरण
आले आहे यात पुतळा बसवण्यासाठी अल्पसंख्य समाजाचे नाहरकत असावे लागते असा एक मुद्दा
आहे. म्हणजे तर कठीणच आहे. नेताजी तुम्ही काय इंग्रजांशी लढताना फक्त बहुसंख्यांकरीता
लढले होते का? याला काय म्हणावे? जे खरेच देशासाठी निस्वार्थ भावनेने लढले तेच
उपेक्षित राहिले. जनता असो वा राजकारणी सर्वानी पक्षभेद, धर्मभेद, जातीभेद, मतभेद
सर्व दूर सारून एकत्र येऊन तुमचा पुतळा लवकरात लवकर बसवण्याचे कार्य हाती घ्यायला नको
का? तमाम भारतीयांना हिंदू, मुस्लीम व इतर सर्वांनाच स्वतंत्रता मिळावी म्हणूनच तुम्ही
लढलात ना ! आय.सी.एस गुणवत्तेने पास होणे , वेषांतर करून इंग्रजांच्या ताब्यातून
निसटणे, इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी आझाद हिंद फौज संघटीत करणे, विदेशांचा पाठिंबा
मिळवणे, विदेशातून भारतीयांना रेडीओ वरुन संबोधीत करणे हे तुम्ही कुणासाठी केले ? सर्वांसाठीच
ना ! तरी तुमच्या पुतळ्यासाठी सर्व एकत्र येत नाही.तुम्ही इंग्रजांना घाबरले नाही
आणि आणि आम्ही तुमचा पुतळा उभारण्यासाठी कुणाला घाबरत आहोत?दाउदच्या इमारती
पाडणारे गो.रा.खैरनार सारखे अधिकारी आपल्याच
देशात होऊन गेले ना ? इंदिरा गांधींची कार ‘टो’ करण्याची धमक किरण बेदी यांनी
दाखवलीच होती ना? खामगांवकर नागरिक,राजकारणी आणि न.प. मुख्याधिकारी, स्थानिक
प्रशासन हे सर्व तशी धमक दाखवून तुमच्या पुतळ्यासाठी जागा रिकामी नाही करू शकत? वेळ
पडल्यास प्रशासनाने जनमत घ्यावे, पुतळ्यासाठी खामगांवकर जनतेच्या सह्यांची मोहीम
राबवावी. नेताजी आम्ही भारतीयांनी स्वातंत्र्यपूर्व आणि पश्चातही तुमची उपेक्षाच केली,तुमचा
पुतळा बसवण्यास आम्ही खामगांवकर दिरंगाई करीत आहोत तसेच केंद्र सरकार तुमच्या
मृत्यूचे कारण इतक्या वर्षानंतरही सांगू शकत नाही यासाठी नेताजी खरेच आम्हाला माफ
करा.
22/1/2021 ची टिप -
1मलकापूर शहरातील पुतळा परिसरात आता बदल झाला आहे.
2 आता शासनाचे पुतळ्या बाबतचे धोरण बदललेले आहे.