हम आपसमे लड बैठे
तो......
अनेक जाती,धर्म,पंथ
असलेल्या आपल्या देशात आपण “विविधतेत एकता” असे म्हणून मोठा अभिमान बाळगतो, परंतू
खरेच आता अभिमान बाळगण्या इतपत एकता आपल्यात
शिल्लक आहे काय ? असा प्रश्न सध्या सुज्ञांना नक्कीच भेडसावत असेल. जुन्या
ऐतिहासिक घटनांना आता जातीची लेबले लावून साजरे करतांना व त्यामुळे वातावरण
तणापूर्ण होतांना बरेचवेळा दिसून आले आहे. जमाव गोळा काय होतो , राजकीय पोळी
शेकणारे उमर खालीद सारखे तथाकथित तरुण नेते एकत्रित काय येतात तणाव, जातीभेद वाढेल
अशी वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करतात. तरुण अशी भाषा बोलतात तेंव्हा खूप दु:ख
होते. “जाती न पुछो साधुकी पुछ लीजिये ज्ञान” असे कबीरने तर कित्येक वर्षे आधी
सांगून ठेवले आहे. तरीही हे नतद्रष्ट भरसभेत विखारी भाषा बोलतात .यांची भाषा ऐकल्यावर
जमाव आपला ताबा गमावतो. कोणताही जमाव असो
या जमावाची सद्सद्विवेकबुद्धी कार्य करणे बंद करते कुणी एकाने दगड फेकला की आपसूक
दुसरा तसे करतो आणि मग सार्वजनिक संपत्तीचा सर्रास नाश होतो. कित्येक गाड्या जळतात
, इमारतींना नुकसान पोहोचते , दुकाने लुटली जातात , बळी जातात. काल एक तरुण पायदळी
तुडवला गेला. जेंव्हा जीव जातो तो काही जात विचारून नाही जात. ज्या माउलीने तिचा
पुत्र गमावला आज तिची काय दशा असेल ? त्यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती असेल.सरकारनी
केलेल्या मदतीमुळे त्यांची क्षती भरून निघणार आहे का ? विषाची ही बीजे पसरविणा-यांची
नांगी आता आपण सर्वांनी मिळून तेथेच ठेचायला हवी.आपण आता रोबोटच्या युगात प्रवेश करीत
आहोत.सौदी अरेबियाची नागरिक महिला रोबोट सोफिया नुकतीच आपल्या देशात येऊन गेली आणि
आपण आपल्या मुलांना हा ब्राह्मण,तो दलित,तो मराठा असे शिकवणार आहोत काय? आपल्या मुलांना
नवीन तंत्रज्ञान आपणास द्यायचे आहे की तीच जुनी जातीय व्यवस्था आणि भेदाभेदाची शिकवण?
शिवाय जगात कुठेही नसेल अशी आरक्षणाची व्यवस्था मागे राहिलेल्या जनतेसाठी आपल्या देशाने
दिली आहे त्याचा लाभ आपण आपल्या मुलांना करवून देऊन त्याचा उपयोग देशाला पुढे नेण्यासाठी
करायला नको का? राजकीय पक्ष कालच्या घटनेचे खापर एकमेकांवर फोडत आहेत. आज अनेक बिन
चिपळ्याचे नारदमुनी त्यांच्या राजकीय लाभासाठी आपल्यामध्ये जातीय तणाव निर्माण करतात.
हे आपणास कळायला हवे.
“हम आपसमे लड बैठे
तो देश को कौन संभालेगा?
कोई बाहरवाला अपने
घरसे हमे निकालेगा |
आणि हो खरेच बाहरवाले
चिन आणि पाकिस्तान टपलेलेच आहे. त्यांना हेच हवे आहे.पूर्वी आपल्यात इंग्रजांनी “फोडा
आणि झोडा” या नीतीने फूट पडली आणि आज आप-आपली वोट बँक सांभाळण्यासाठी हीच नीती आपलेच
लोक, आपलेच प्रतिनिधी वापरत आहे.काल-परवा किती नुकसान झाले.कुणाचे झाले? आपलेच झाले
ना ! राज्य महामंडळाची बस आपल्याच पैस्यातून खरेदी केलेली असते हे काही सांगायची गोष्ट
नाही.पै-पै जमा करून लोक चारचाकी घेतात,गाडी साठी कर्ज घेतात,आपल्या देशातील श्रद्धाळू
लोक त्या गाडीला देव समजून तिची पूजा करतात,रोज गाडीत दिवा बत्ती करतात.त्यांच्या गाडया
जळतांना पाहून त्यांना किती यातना झाल्या असतील. त्यांनाच काय देशातील अनेक संवेदनशील
मनाला सुद्धा यातना झाल्या असतील.घाटकोपर आणि विक्रोळी येथे तर रस्त्यालगतच्या सर्व
गाड्या दगडफेकीने क्षतिग्रस्त आणि आगीत भस्मसात झालेल्या दिसून आल्या.आपला महाराष्ट्र
असा नाही याला जसे होते तसेच राहू द्या. आपण सर्वानीच ठरवून जातीभेदाला या देशातून
नष्ट करणे जरुरी आहे ,राजकारणी काही तसे करणार नाही कारण आपल्याला “रामकी इस धरतीको,
गौतमकी भूमीको सपनोंसेभी प्यारा हिंदुस्तान” बनवायचे आहे. नाही का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा