पोंछ कर अश्क अपनी आंखोसे ….
परवा विश्व हिंदू
परीषदेचे नेते डॉ प्रविण तोगडीया हे प्रथम बेपत्ता झाल्याची बातमी आली. पोलिसांनी म्हणाले
की बेपत्ता नव्हते.नंतर ते बेशुध्दावस्थेत
सापडले अशी बातमी आली. झेड सुरक्षा असूनहीं तोगडीयाजींवर अशी वेळ कशी काय आली?
याचा उहापोह सुरु झाला. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणा-या तोगडीयाजींवर
त्यांच्या कट्टरपणामुळेच तर ही वेळ आली नाही ना ? असाही कयास विरोधी पक्षांतील
मंडळींकडून केला जात आहे. एक अज्ञात व्यक्ती तोगडीयाजींना “तुम्हाला एनकाऊंटर
करणार आहेत“ असे सांगितल्यावर तोगडीयाजीं इस्पितळात काय येतात, नंतर पत्रकार परीषद
काय घेतात आणि त्यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्याच्या डोळ्यातून अश्रू
वहावेत अशी वेळ काय येते. अतिशय घाईने त्यांना भेटायला गेलेले कॉंग्रेस नेते
अर्जुन मोरवाडीया व काही विरोधी गटातील मंडळी जातात काय. हे सर्व हिंदुत्ववादी आणि
विरोधी पक्षीयांना तसेच तमाम देशवासियांना आश्चर्यचकीत करणारे ठरले.”माझे एनकाऊंटर
करणार होते” असे त्यांनी सांगीतले तसेच राजकारणी बॉसने क्राईम ब्रँचला माझ्या
विरोधात केलेला इशारा असे शब्दप्रयोग करून तोगडीयांनी कोणाकडे रोख केला हे
कुणालाही कळेल. कट्टर हिंदुत्ववाद भाजपाला सध्या दूर ठेवायचा आहे काय ? की तो सध्या
परवडणारा नाही ? विहिंप संघ परिवारपेक्षा थोडी वेगळी अशी साधू संत, महंत यांची
मोठी संघटना आहे व अशा विहिंपला तोगडीया यांचे ऐवजी कुणी दुसरे नेते वरीष्ठ पदावर
नियुक्त करावयाचे असल्याचीही चर्चा आहे. तोगडीया व मा.मोदी यांच्यामध्ये चांगले
सख्य होते परंतू मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे सख्य कमी झाले. आता तर
केंद्र आणि अनेक राज्य यांमध्ये सत्ता आहे ही सत्ता हातात राहावी म्हणून अनेक
आश्वासने जी लोकसभा 2014 निवडणूकीपूर्वी दिलेली होती किंवा जी सतत भाजपाच्या
अजेंडयावर असतात ती आश्वासने घटनात्मक व कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करावयाची
आहेत. मंदीर,शेतकरी,गोहत्या,
हे सर्व मुद्दे व्यवस्थित हाताळायचे आहेत. या मुद्द्यांवर कुणी बोलतांना उगाच घोळ
न व्हावा तसेच सध्या कट्टरता थोड़ी बाजूला ठेवली पाहीजे असाही वरिष्ठ नेतृत्वाचा
प्रयत्न असावा. तोगडीया यांचेवर पूर्वीचे गुन्हे सुद्धा गुजरात व राजस्थान या
राज्यात दाखल आहे. काही केसेस बंद सुद्धा झाल्या आहेत. त्यांनी जरी एनकाऊंटर शब्द
वापरून कुणाकडे रोख केला असला तरी विहिंप या संघटनेतील अंतर्गत बाबींची सुद्धा
किनार असू शकते. खरे-खोटे कालपरत्वे समोर येईलच. तोगडीया यांच्या हतबलतेचे,
डोळ्यातून अश्रू येण्याचे कारण काहीही असो परंतू या कट्टर नेत्याच्या डोळ्यातून
घळा-घळा अश्रू वाहतांना पाहून सामान्य कार्यकर्त्यास वरच्या स्तरावर सारे काही
आलबेल नसल्याचा संदेश मात्र गेला आहे. डॉ प्रविण तोगडीया यांना असे रडवेले झालेले पाहून
संघटनेचे कार्यकर्ते मात्र आपले कट्टर नेते तोगडीया यांनी पोंछ कर अश्क अपनी आंखोसे
करत आपल्या डोळ्यातील पूर्वीचे निखारे
दाखवले पाहिजे आशा करीत असणार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा