है प्रीत जहाँकी रीत सदा....
“है प्रीत जहाँकी रीत सदा” अशी रीत सदैव पाळत आलेल्या अर्थात प्रेम देणे , सर्वांप्रती प्रेम बाळगणे हे जाणून असलेल्या भारतीयांना
निदान प्रेमाबाबत तरी कुणाकडून काही शिकण्याची गरज नाही. कित्येक युगांपासून
भारतात प्रेमाच्या महतीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. रामायणातील प्रभू रामावरील प्रेमापोटी त्यांना उष्टी बोरे देणारी शबरी आणि तिचे प्रेम पाहून ती उष्टी बोरे
खाणारे श्रीराम , जेष्ठ बंधू रामावरील बंधूप्रेमापोटी त्याच्यासह वनवास पत्करणारा
लक्ष्मण आणि तो येईपर्यंत अयोध्या नगरी बाहेर राहणारा भरत , महाभारतात
पित्यावरील प्रेमासाठी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेऊन नंतर भीष्म
म्हणून ओळखल्या गेलेला ‘पितृप्रेमी देवव्रत’. मित्रप्रेमापोटी मित्र चुकीचा आहे हे माहीत
असूनही त्याला साथ देणारा कर्ण, भगिनी प्रेमासाठी तिच्या मदतीसाठी धावून जाणारा आणि
गरीब मित्राने आणलेले पुरचुंडीतील पोहे आवडीने खाणारा व्दारकाधीश भगवान श्रीकृष्ण, प्रेम आणि शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध,भगवान
महावीर,
“पोथी पढ पढ जग मुआं पंडीत
भया न कोय ढाई अखर प्रेम का पढे जो पंडीत होय”
असा संदेश देणारा संत कबीर,
कृष्णप्रेमामुळे आनंदाने विषप्राशन करणारी संत मिराबाई, पतीप्रेमासाठी डोळ्यावर
पट्टी बांधून घेणारी गांधारी, पतीला मृत्यूच्या दाढेतून परत आणणारी सावित्री, मातृभूमी
वरील प्रेमासाठी रडत-रडत “ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला” असे
काव्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच हसत-हसत फासावर जाणारे अनेक क्रांतिकारक.
एवढेच काय तर मालकावरील प्रेमापोटी त्याला सुरक्षित ठिकाणी पोहचवल्यावर प्राण
सोडणारा महाराणा प्रताप यांचा चेतक हा घोडा. अशी भारतातील प्रेमावरील हजारो
उदाहरणे देता येतील. त्याच भारतात आज मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी एका दिवसाचा अर्थात
“व्हॅलेन्टाईन डे”चा आधार घेतला जातो आहे. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे या दिवसानंतर काही दिवसांनी म्हणे “ब्रेकअप डे” सुद्धा साजरा केला जातो. म्हणजे आज प्रेम
आणि उद्या पुन्हा वेगळे. निरंतर प्रेमाची महती सांगणा-या, देहाशी नव्हे तर
आत्म्याशी प्रेम करा ही शिकवण जगाला देणा-या आपल्या भारतात आता प्रेम हे असे काही
दिवसांपुरते क्षणिक झाले आहे. कोणते दिवस साज्र्रे करायचे आणि कोणते नाही हा
ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी मग पोशाख आणि संस्कृती यांबाबतच का पाश्चात्त्यांचे
अंधानुकरण का केले जाते ? त्यांची शिस्त, देशप्रेम, वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकाटी, अभ्यासू
वृत्ती , बुद्धिमत्तेचा आदर करणे व आरक्षण नव्हे तर बुद्धिमत्तेच्या जोरावर नोकरी
मिळवणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेस इजा न पोहचवणे व
इतर अनेक चांगल्या अशा गोष्टींचे अनुकरण का होतांना नाही दिसत ? आपल्याकडे तर
चांगली सुशिक्षित माणसे रस्त्यांवर थुंकतात, जरा कुठे काही खट वाजले की वाहने
पेटवतात, दगडफेक करतात , सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. निव्वळ पाश्चात्त्यांच्या चंगळवादाचे अनुकरण सुरु आहे त्यांच्या चांगल्या बाबींचे अनुकरण मात्र होतांना दिसत
नाही. तरुण पिढीने हे स्विकारणे जरुरी नाही का? त्यांना तसे पटवून द्यायला नको का ?
तरुणांनो तुम्ही खुशाल पाश्चात्त्यांसारखे “व्हॅलेन्टाईन डे” सारखे दिवस “सेलिब्रेट”
करा परंतू त्यासोबतच पाश्चात्त्यांचे वर
उल्लेखलेले गुण सुद्धा अंगीकारण्याचा थोडा का होईना प्रयत्न करा. “है प्रीत जहाँकी रीत सदा” अशी प्रेमाची परंपरा असलेल्या आपल्या देशात आपल्या भावी पती किंवा पत्नी समोर प्रेम
भावना व्यक्त करतांनाच आपले माता-पिता, बंधू-भगिनी, मित्र परिवार, आपला देश तसेच समस्त देशवासी यांच्याबाबत सुद्धा प्रेम बाळगण्याचे ध्यानात असू द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा