नीरव, पीएनबी घोटाळा
आणि सौ शास्त्रींचा प्रामाणिकपणा
सध्या भारतात एका पाठोपाठ
एक घोटाळे उघडीकीस येण्याचे प्रकार घडत आहेत. पूर्वीच्या सरकारच्या काळात
भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली तर सद्यस्थितीत बँक कर्मचारी आणि अधिकारी
यांचेशी साटेलोटे करून कर्ज घेऊन ते बुडवून विदेशात पसार होण्याची प्रकरणे घडत
आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पळून गेलेला विजय मल्ल्या आणि आता खोटे
द्स्ताऐवज करून व्यापार करणारा आणि करोडो रुपयांचा अपहार करणारा नीरव मोदी. केवळ बँकांनाच
नव्हे तर आपल्या “सेलिब्रेटी” ग्राहकांना सुद्धा या नीरवने काही हजार किंमत
असेलेले हिरे लाखो रुपयांत विकले आणि
फसवले. नीरवचा हा घोटाळा गेल्या अनेक वर्षात घडत आलेला आहे . सामान्य ग्राहक रीतसर
पद्धतीने कर्ज घेण्यास गेला असता बँक अधिकारी त्यास जणू स्वत:च्या खिशातून पैसे देत
आहे अशा आविर्भावात त्याला भिक मागायला आलेला भिकारी समजतात आणि अक्षरश: हाकलून
लावतात.आणि गब्बर लोकांच्या पुढे काही हजाराच्या तुकड्यांसाठी लोटांगणे घालतात. हे
गब्बर लोक आधी कर्ज मंजूर करवून घेतात आणि नंतर हे भ्रष्ट बँक अधिकारी
त्यांच्यामागे कागदपत्रांसाठी फिरतात. कित्येक बँकांत तर मेंटनन्स,स्टेशनरी इ.साठी
अव्वाच्या सव्वा बिले लावली जातात. नीरव, मल्ल्या आणि इतर अनेक कर्ज बुडवे या
देशात आहे. एवढे मोठे घोटाळे हे करतात आणि कुणालाच काही कळत कसे नाही ! आणि कळते
तेंव्हा घोटाळेबाज विदेशात पोहोचलेला
असतो. आणि आपले लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत राहतात. काही
कर्मचारी आणि अधिकारी बडतर्फ केले जातात तर काहींची बदली होते. निव्वळ बँक कर्मचा-यांना
बडतर्फ करून किंवा बदल्या करून फायदा नाही तर रिजर्व बँक, ऑडीट करणारी यंत्रणा ,
गुप्तचर यंत्रणा या कर्मचा-यांवर सुद्धा कायद्याचा बडगा उगारायला हवा. हे सर्व घडत
असतांना ते काय करीत असतात ? असा प्रश्न पडतो. परंतू तसे काही होतांना दिसत नाही “ज्याच्यावर
कर्ज तोच खरा मर्द” असे बिरूद मिरवतात आणि कर्ज बुडवून देश आणि गरीबांना लुटतात. स्टेट
बँकने म्हणे मिनीमम बॅलन्स दंड आकारून दोनशे करोड रुपये कमावले आहे. “कबीर युं धन संचीये जो आगे को
होय” अशा वृतीने पै-पै जोडणा-या ज्या गरिबांजवळ पैसे नाही त्यांच्याच खात्यात कमी
रक्कम होते म्हणून त्यावर बँक दंड आकारते म्हणजे बँक आणि हे कर्ज बुडवे दोघेही
गरीब आणि मध्यम वर्गीयांना लुटत आहेत. याचा पार्श्वभूमीवर तरुण भारत मध्ये भारताचे
माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पत्नी सौ लालितादेवी शास्त्री यांची
बातमी वाचनात आली. पंतप्रधान झाल्यावर शास्त्रीजींकडे कार नव्हती तेंव्हा त्यांनी
12 हजार रुपयांची फियाट कार घेतली 7 हजार रुपये त्यांचाकडे होते पाच हजाराचे कर्ज
त्यांनी पी एन बी कडून घेतले होते. पुढे या कर्जाची परतफेड सौ शास्त्री यांनी
त्यांच्या पेन्शन खात्यातून केली होती अशी आठवण त्यांचे पुत्र श्री अनिल शास्री
यांनी सांगतली. पूर्वी कर्ज असले की ते फेडायचे अशी भावना असे. आता मात्र तसे नाही
राहिले. मोठे व गब्बर लोक करोडो रुपयांची कर्ज घेऊन लुटारुंप्रमाणे बँकां लुटत
आहेत. सौ ललितादेवी शास्त्री यांच्यासारख्या प्रमाणिक व्यक्तींची जमात लुप्तप्राय होत चालली आहे. बँकांनी आणि सरकारनी
कर्ज फेडणा-या प्रामाणिक कर्जदारांचा सत्कार करणे किंवा त्यांना बक्षीस देणे
सुद्धा सुरु केले पाहिजे जेणे करून त्यांना सुद्धा आनंद होईल व सकारत्मक भावना तसेच
कर्ज फेडण्याची वृत्ती निर्माण होण्यास पाठबळ मिळेल. देशाची अर्थव्यवस्था मजबूत
करण्यासाठी कर्जासंबंधीचे नियम अधिक योग्य करण्याची आणि भ्रष्ट कर्मचा-यांना
कठोरात कठोर शिक्षेची तरतूद करणे अत्यंत जरुरी झाले आहे अन्यथा हे लुटारू असेच देश
पोखरत राहणार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा