लेक वाचवा लेक शिकवा, तसेच
कुटुंबव्यवस्था सुद्धा टिकवा
सध्या लेक वाचवा आणि लेक शिकवा हे अभियान राबवणे
जोरात सुरु आहे. या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित होत आहे. हे निश्चितच
अभिनंदनीय आहे. जग आता फार पुढे चालले आहे. लेक म्हणजेच महिलांना आता कायद्याच्या
अनुषंगाने मोठा आधार आणि बळ प्राप्त झाले आहे. मुलींना आज शिक्षण मिळत आहे, त्या
स्वत:च्या पायावर उभ्या रहात आहेत, सक्षम आहेत, सबळ आहेत. यात सावित्रीबाई फुले यांचा
महत्वाचा वाटा आहे तसेच कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, रमाबाई यांचा सुद्धा
वाटा दुर्लक्षित करून चालणार नाही.आज जगात अनेक नवीन दालने करीअरच्या नवीन वाटा
निर्माण होत आहे यासाठी शिक्षण संस्थानी करीअर काऊन्सिलिंगचा एक स्वतंत्र विभाग
शाळा व महाविद्यालयात सुरु केला पाहेजे. कारण अनेक विद्यार्थ्यांना करीअर
करण्यासाठी अनेक नवीन क्षेत्रांची जाण नसते. तसेच मुले असोत वा मुली यांनी आपल्या
आरोग्याकडे सुद्धा लक्ष देण्याची नितांत गरज आहे. किशोरावस्थेतच काही सवयी किंवा
व्यसन जडण्यास सुरुवात होत असते त्याच्या दुष्परीणामांची जाण त्यांना नसते. कुण्या
मित्र मैत्रिणीचे प्रलोभन, आग्रह यास बळी पडून ही सुरुवात होत असते. आज-काल सुशिक्षित
लेकींमध्ये सुद्धा धुम्रपान व मद्यपान यांच्या सवयी जडल्याची अनेक उदाहरणे आहेत.
महिला असो वा पुरुष दोघांच्याही शरीरावर या व्यसनांचा मोठा परिणाम होतो. महिलांच्या
बाबतीत होणा-या बाळाला सुद्धा त्यांच्या आईच्या व्यसनाचा परिणाम भोगावा लागतो.
आजकाल या सर्व बाबी शिक्षणातून हद्दपारच होत आहे. पूर्वी शैक्षणिक अभ्यासक्रम तर
पूर्ण व्हायचाच सोबत शिक्षक इतर अवांतर अनेक गोष्टी सांगत असत. आता शिक्षक व
विद्यार्थ्यातील तो संवादच हरवलाय. तसे पाहिले तर आताच्या काळात मुलींना शिक्षणासाठी
विशेष प्रोत्साहन देण्याचे किंवा प्रेरित करण्याचे विशेष काम नाही. त्यांना शिक्षणाचे
महत्व चांगलेच समजले आहे तसेच ते पालकांना सुधा चांगले पटले आहे. मुलींचा जन्मदर सुद्धा
वाढत आहे. कायदा सुद्धा आता मुली व महिला यांच्या
बाजूने अधिक सक्षम झाला आहे. परंतू त्या बाबत अधिक निर्माण करणे जरुरी आहे. साधी मुली
, महिला यांना पाहून शेरेबाजी किंवा त्यांना उद्देशून एखादे फिल्मी गाणे जरी म्हटले
तरी पोलीस कारवाई करू शकतात परंतू हे मुलींना, महिलांना माहीतच नसते. त्यासाठी बहुतांश
पोलीस ठाण्यांनी एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्याचे वितरण सुद्धा झाले आहे.
परंतू म्हणावे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. यासाठी विविध महिला मंडळे, क्लब यांनी
पोलीस विभागाच्या सहाय्याने ती महिलांच्या संरक्षण बाबतच्या कायद्याची पुस्तिका प्राप्त
करून त्याचे वितरण विद्यार्थीनीना करायला हवे. लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाने निश्चितच
महिलांबाबत सकारात्मक चळवळ निर्माण झाली आहे. नारी आदर हा तर भारतात अनादी काळापासून
आहे. परंतू आपण आपल्याला आपल्या अनेक चांगल्या बाबींचे विस्मरण होत चालले आहे.
दुर्दैवाने आज लेक शिकली आहे, नोकरी करते आहे परंतू कुटुंब मात्र तुटत चालली आहेत.
आजच्या लेकीला फक्त राजा-राणीचा संसार हवा आहे. काही अपवाद आजही आहेत. कुटंब तुटण्यात
फक्त लेकच दोषी असते असाही अर्थ कुणी काढू नये. तसेच लेक आता वाचवली जात आहे ,शिकवली
जात आहे. लेकीने जरूर शिकावे, पुढे जावे त्यासोबतच कुटुंबव्यवस्था जी आता मोडकळीस आली
आहे ती सुद्धा आपल्या नोकरी व कामच्या व्यापातून सांभाळण्याचा थोडा का होईना प्रयत्न
करावा आपल्या मात्यापित्या प्रमाणेच पतीचे सुद्धा माता पिता असतात हे ध्यानात घ्यावे,एकत्र
राहणे जरी शक्य नसेल तरी कार्य प्रसंगी एकत्र यावे प्रेम,आपुलकीचे शब्द बोलावे जेष्ठ
नागरिकांना ते सुद्धा खूप असते.
शब्द बराबर धन नहीं, जो कोई जाने बोल |. हीरा तो दामो मिले, शब्द मोल न तोल ||
लेक वाचवा,तिला शिकवा
तसेच वसुधैव कुटुंबकम अशी शिकवण देणा-या आपल्या भारतात आपले स्वत:चे कुटुंब सुद्धा
टिकवावे अशी शिकवण सुद्धा सर्व पालकांनी आपल्या लेकीस द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा