न्याय मिळाला....आता शिक्षेची प्रतिक्षा
20 वर्षांपूर्वीच्या त्या रात्री आम्ही दोघे आमच्याच कनकनी खेड्यातील भगोडा की धानी या आमच्याच हक्काच्या जागेत मौजेत फिरत होतो. आमचा कळप सोबत होताच. आम्ही कुणाच्याही अधे –मध्ये नसतांना अचानक आम्हाला गोळ्या लागल्या. आम्ही गतप्राण झालो. आज आम्हाला जाऊन 20 वर्षे झालीत. 20 वर्षांनतर का होईना आमची शिकार करून भगोड्यातून भगोडा झालेल्या शिकारी सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवले. कोण कुठल्या त्या सलमान खान नावाच्या नटाचे आम्ही काय घोडे मारले होते? आम्ही गेलो परंतू आमचा आत्मा टाहो फोडत आहे. आम्ही प्राणी आमच्या जंगलात आनंदात असतो मानवाशी आमचे काहीही एक वैर नाही. उलट मानवच आमच्या जागेत अतिक्रमण करून राहिला आहे. मोठ मोठे रिसोर्ट आमच्या परिसरात बांधली जात आहे आणि तिथे “सेलिब्रेटी” का काय म्हणतात ते येतात परंतू आम्ही प्राणी मात्र “सेलिब्रेटी” काय आणि सामान्य माणूस काय एकच समजत असतो. आता हेच पहायचे आहे की लोकशाहीचे मोठे बिरूद मिरवणा-या भारतातील न्यायव्यवस्था “सेलिब्रेटी” आणि सामान्य माणूस यांना एकाच दृष्टीने पहाते की नाही? तसे तर पहातच नाही हे अनेकदा सिद्धच झाले आहे. म्हणूनच आम्हाला मारणारा कोण तो सेलिब्रेटी “बीईंग ह्युमन” लिहिलेला टी शर्ट घालून मिरवणारा तो सलमान खान मुंबई शहरातील फुटपाथवर झोपलेल्या गरीब लोकांना चिरडून पसार झाला होता त्या प्रकरणात दोषी असून सुद्धा अजूनही राजरोस फिरत आहे. माणसांना चिरडून टाकणा-या या सलमान खान समोर मग आम्ही काळवीट म्हणजे “किस खेत की मुली?”. पूर्वी राजे महाराजे सुद्धा मृगयेसाठी जात आमच्या जातकुळीतील प्राण्यांची शिकार करीत परंतू सोबतच ते आमचे संगोपन सुद्धा करीत. जंगलांचे जतन करण्याचे आवाहन राजे शिवाजी, शाहू महाराज करीत. हा कोण कुठला साधा व्यवसायिक अभिनेता, थिल्लर भूमिका करणारा आमच्या जीवावर उठला. याने काय केले आहे? आमच्यासाठी , जंगलासाठी , समाजासाठी? आता विविध प्रकरणातून निसटण्यासाठी समाजसेवेचा आव आणतो, नेत्यांशी सलगी करतो ? नावाचीही ह्युमिनीटी नसतांना न्यायव्यवस्था ,कायदा यंत्रणा, जनता यांची दिशाभूल करण्यासाठी “बीईंग ह्युमन” नावाची संस्था काढतांना याला जराही लाज नाही वाटत? आज-काल वन्यप्राण्यांविषयी , पाळीव प्राण्यांविषयी आस्था दाखवणारे अनेक आहेत. आम्हाला देव समजणारी “वैष्णव” जमात आमच्यासाठी का नाही पेटून उठत? आम्ही ऐकले आहे की मनेका गांधी आम्हा प्राण्यासाठी मोठे कार्य करीत असतात. मग आमची हत्या होऊन इतकी वर्षे झाली पण ह्या बाई आमच्या बाजूने अवाक्षरही बोलल्याचे स्मरत नाही. उठसुठ छोट्या मोठ्या प्रकरणावरून जाळपोळ करणारे व प्रसंगी सर्वोच्च न्यायसंस्थेवर सुद्धा प्रभाव टाकू पहाणारे भारतीय मग आमच्यासाठी काहीही का करीत नाही ? आता हेच भारतीय का मूग गिळून गप्प बसले आहेत ? म्हणूनच आज त्या ओळी आठवतात “ एक जानवर की जान आज इंसानोने ली है चूप क्यूं है संसार ?
आज निदान जोधपूर कोर्टाने आमच्या पदरात न्याय टाकला परंतू आमचा तो शिकारी जामिनावर सुटणारच शिवाय पुढे न्यायप्रणालीतील टप्पे आहेतच. जोधपूर न्यायालयाने त्यास दोषी ठरवले आम्हाला मात्र त्याच्या शिक्षेची प्रतीक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा