“तक्रं शक्रस्य दुर्लभम”...किंतु खामगांववासियाणाम सुलभम
शीर्षकाचा अर्थ ताक
हे इंद्राला सुद्धा दुर्लभ आहे परंतू खामगांववासियांना पृथ्वीवरील अमृत असेलेले हे
ताक मिळणे मात्र सुलभ झाले आहे. दुस-याला काहीतरी देण्याची संस्कृती असलेला
भारतामध्ये विविध प्रकारे दान करणारे अनेक दाते आपणास दिसून येतात. पालख्या, जयंती
मिरवणुका यांमध्ये अनेक दाते खाद्यपदार्थ तसेच शीतपेयांचे वितरण करतांना दिसून
येतात. याच दातृत्वाच्या भावनेने 42 वर्षांपूर्वी आपल्या खामगांव शहरात सुद्धा एक
अनोखा असा उपक्रम सुरु झाला जो आजतायागात सुरु आहे. 1970 च्या दशकात खामगावातील सरकी
व ढेपेचे व्यापारी लालचंद दोशी हे काही कार्यानिमित्त इंदोर येथे गेले असता
त्यांना तिथे उन्हाळ्यात “ताकपोई” दिसली. या ठिकाणी नागरिकांना अगदी मोफत ताक
वितरीत होतांना पाहून त्यांच्या मनात सुद्धा दातृत्व भावना दाटून आली, त्यांना ही
संकल्पना खामगांवात राबवण्याची प्रेरणा मिळाली आणि 1976 मध्ये त्यांच्या पत्नीच्या
नावाने “श्रीमती मांनकुंवरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छांछ (ताक) केंद्र” स्थापन केले.विदर्भातील
ऊन म्हटले की अंगाची लाही-लाही होऊन जाते. उन्हामुळे गरम झालेल्या मानवी शरीरास
आल्हाददायक दोन नैसर्गिक तरल पदार्थ म्हणजे ताक आणि ऊसाचा रस.जसे ताकाचे महत्व आहे
तसेच ऊसाच्या रसाचेही. भगवान ऋषभदेव यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशीच ऊसाचा रस पिऊन
उपवास सोडला होता. म्हणून अक्षय तृतीयेला ऊसाच्या रसाचे सुद्धा महत्व असते.
उन्हाळ्यातील ताकाचे महत्व जाणून श्रीमती मांनकुंवरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छांछ
(ताक) केंद्राने 42 वर्षांपासून खामगांवकरांची ताकाची तहान भागवून लाखो लोकांचा उन्हाळा
सुसह्य केला आहे. मार्च महिन्यात हा उपक्रम सुरु होतो व पावसाळा सुरु होईतो रोज
सकाळी 5.30 वाजता ताक वितरीत होत असते. विशेष म्हणजे फक्त भांडे घासण्याचे काम एका
माणसा मार्फत केले जाते बाकी सर्व कामे मंडळाचे सदस्य गण स्वत: करीत असतात. दररोज
20 लिटर दुधाचे ताक बनवून गरीब-श्रीमंतांना, विविध जाती धर्माच्या 800 कार्डधारक व
इतर लोकांना उत्साहाने वितरीत केले जाते. या कामासाठी दररोज सुमारे 4500 रु.
निव्वळ दूधावर खर्च होत असतात तर इतर वेगळा खर्च सुद्धा होत असतो. ताक वितरीत
करण्यासाठी ट्रस्टने एक कार्ड बनवले आहे. प्रथम कार्डधारकांना ताक वितरीत केले
जाते व नंतर ज्यांच्याकडे कार्ड नसेल त्यांना सुद्धा ताक वितरीत केल्या जाते. मोफत
ताक वितरण करणारा विदर्भातील हा एकमेव उपक्रम खामगांवात असल्याचे खामगांवकरांना
भूषण आहे.सद्यस्थितीत या ट्रस्टचे अध्यक्ष श्री महेंद्रभाई शहा हे आहेत. तसेच
ट्रस्ट चे पदाधिकारी श्री हसमुखभाई कमाणी, श्री प्रफुल्ल कमाणी व त्यांचा परिवार ,
श्री नागीनभाई मेहता, श्री सुराणा, श्री खिलोशिया परिवार, व इतर सर्व सदस्य मिळून
हा उपक्रम राबवीत असतात. यंदा या उपक्रमासाठी दोशी परिवार अकोला तसेच चाळीसगावचे
जमनादास मोहता परिवार यांचेकडून मोठे सहाय्य झाल्याचेही श्री महेंद्रभाई शहा
आवर्जून व कृतज्ञतापूर्वक सांगतात.
ताकाचे महात्म्य
सांगण्यास तर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.पृथ्वीवरील अमृत असलेले तक्र अर्थात ताक हे शक्र अर्थात
देवांचा राजा इंद्र याला सुद्धा दुर्लभ असल्याचे सांगणारे “तक्रं शक्रस्य दुर्लभम” हे एक सुभाषित आहे. त्यामुळेच
उन्हाळ्यात ताकाला फार महत्व आहे. हे पृथ्वीवरील अमृतरूपी ताक अगदी मोफत वितरीत करण्याचे
कौतुकास्पद व प्रेरणादायी व खामगांवकरांना भूषणावह असे कार्य खामगांवात “श्रीमती
मांनकुंवरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छांछ (ताक) केंद्र” करीत आहे.म्हणूनच “तक्रं
शक्रस्य दुर्लभम”... किंतु खामगांववासियाणाम सुलभम असे म्हणावेसे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा