“बहुत जनांचा
आधारू” गेला
अगदी आता-आता
पर्यंत काका चालते फिरते होते.नागपूरला व्होकार्ट मध्ये जाण्यापूर्वीच्या
संध्याकाळी आम्ही काकांच्या आनंद मंगल कार्यालयात भेटलो होतो. विशाल प्रिन्टर्स व
जननिनाद वृत्तपत्राचे मालक श्री जयकुमार चांडक, आमचा बंधू दिनेश बोडखे सोबत होते. मी
काकांना शाळेच्या कोर्ट केसेस ची काही कागदपत्रे सुपूर्द केली. काकांना शुभेच्छा दिल्या.
काका काही दिवस दवाखान्यात राहिले आणि नंतर त्यांना चालता येणेच बंद झाले. नेहमी
कार्यमग्न राहणारे काका त्याही परिस्थितीत आमच्या आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे
मानणा-या सहका-यांच्या मदतीने गाडीत बसून बाहेरच काय बाहेरगावी सुद्धा जात. त्याही
परिस्थितीत आम्हाला शाळा, मंगल कार्यालय ई. बाबत सूचना करीत. “मला चालता येत नाही”, “काही करता येत नाही” असा एका शब्दाने कधी त्रागा केला नाही.
फोन धरता येत नव्हता तर त्यांनी स्पीकर ओंन करून संभाषणे केली. ते होतेच कर्मयोगी.
कुटुंबियांसाठी शाळेसाठी देह कष्टविलेले, जीवनात अनेक कठीण प्रसंगांचे शर झेललेले,
बिछान्यावर पडलेले काका हस्तिनापुरसाठी देह कष्टविलेल्या, शर शय्येवर पडलेल्या भिष्म
पितामहाप्रमाणे भासत होते. तीन चार महिन्यातच सर्व चित्र बदलले आणि 8 एप्रिल
ला काका गेले. ते सुद्धा त्यांच्याच शैलीत त्यांच्या सर्व जबाबदा-या पार पाडून.नेत्रदान
करावयाचे म्हणून दोन दिवस आधी डोळे तपासून. देहदान करण्याचे आणि कोणतेही विधी न
करण्याची सूचना देऊन. “वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृतदेह कमी पडतात”
अशी बातमी काही वर्षांपूर्वी त्यांच्या वाचनात आल्याने देहदान करण्याचे त्यांनी
पूर्वीच ठरवले होते. ते गेले आणि डोळ्यासमोर त्यांच्यासह व्यतीत केलेले क्षण, त्यांची
कार्यपद्धती तरळू लागले किंबहुना अजूनही तरळत आहेत.
जलंब ग्रामातील एका
परवानाधारक शिकारी वैद्य नानासाहेब वरणगांवकर यांचा हा मधला मुलगा. आई वडीलांना न
जाणे काय वाटले,मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणे त्यांनी काकांना लहानपणापासून “रावसाहेब”
संबोधन लावले आणि सुरेश दत्तात्रय वरणगांवकरांनी ते नांव सार्थ केले. आपल्या
स्वकर्तुत्वावर अनेक धडाडया घेतल्या, अनेक उपक्रम केले. मग ते डींकाचा व्यवसाय
असो, डाक विभागातील नोकरी असो, 90 च्या दशकात ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण
मिळावे म्हणून केलेली शाळेची स्थापना असो, नगर रचना विभागाची कामे असो, वाघ छाप
दंत मंजन असो की सेवानिवृत्तीनंतर अनेकांना दिलेली आयुर्वेदिक औषधे असोत. आपल्या दुस-याच्या
मदतीस धाऊन जाण्याच्या वृत्तीने त्यांनी मोठा लोकसंग्रह प्राप्त केला. गरीब
परिस्थितीतून उभे राहून त्यांनी स्वत: सोबत दुस-याचाही कसा उत्कर्ष होईल हे पहिले.अनेकांना
नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. गाडीचा विमा, बिले, टॅक्स
भरणे अशी आपली सर्व कामे ते चोख करीत. कपाटातील कोणत्या क्रमांकाच्या फाईल मध्ये काय
आहे हे त्यांच्या पक्के स्मरणात असे.मी चौथ्या पाचव्या वर्गात असेन तेंव्हापासून
काकांची सायकल, खाकी पँट व दोन खिशांचा शर्ट, एकाच प्रकारचा पेन, एकाच स्टाइलचे
घड्याळ, एकाच पॅटर्न ची चप्पल.अशी राहणी पाहत आलो आहे. असे एकाच पद्धतीने राहणे सर्वाना
शक्य नाही. असे साधे आणि निर्मोही राहणे काकांसारख्या शिस्तप्रिय आणि सेवाव्रती
माणसासच शक्य आहे.
विज्ञान शाखेच्या
पदवीधर काकांची संपूर्ण हयात खामगांवातच गेली. महाविद्यालयीन जीवनात ते एन सी सी मध्ये
अंडर ऑफिसर होते.सर्वोत्कृष्ट नेमबाज म्हणून सुद्धा ते गौरविले गेले होते. तत्कालीन
एन सी सी चा ड्रेस स्टार्च करत असत. माझे वडील नेहमी सांगतात काकाचा ड्रेस एकदम
कडक असे. पँट जमिनीवर उभी करता येईल इतकी कडक इस्त्री. डींकाच्या व्यवसायासाठी तरुणपणीच
काकांनी “फोर व्हील ड्राईव्ह स्टेशन वॅगन” घेतली होती. आजोबा शिकारी असल्याने व वन्यप्राणी
पाळण्यास तेंव्हा बंदी नसल्याने घरी मोर,हरीण व अस्वल पाळले होते. काका सुद्धा
अनेकदा जंगलात जाऊन आलेले त्यामुळे अंगात धाडस. याच धाडसाने त्यांनी अनेक कठीण
प्रसंगातून मार्ग काढले. कठीणातील कठीण कामे लीलया पार पाडल्याने अनेक लोक त्यांना
“कार्यसिद्धी” म्हणत. शाळेची कामे, काकूंच्या “ओपन हार्ट सर्जरी” साठी घेतलेले
कष्ट तेच पार पाडू जाणे. स्वत:च्या पत्नी मुलांसह पुतणे,भाचे,नातू,जावाई सर्वांकडे
जातीने लक्ष देत. कुणाच्या अडचणीच्या वेळी त्यांची “ कारे काही आर्थिक मदत पाहिजे का?”
अशी हाक असे. आपले आनंद मंगल कार्यालय भाड्याने देतांना त्यांनी कधी जाती-पातीचा विचार
न करता जो प्रथम येईल त्याला कार्यालय उपलब्ध करून दिले.व्यक्तीची परिस्थिती पाहून
दर आकारले. कित्येकदा अनेकांनी जेवढी रक्कम दिली तेवढी घेतली.त्यांच्या व्यवसायात
अनेकांनी त्यांना फसवले परंतू काकांनी त्यांची लोकांवर संपूर्ण विश्वास टाकून काम
करण्याची पद्धत सोडली नाही. गावातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेऊन काम करीत. अनेकांची
कामे काकांनी चुटकीसरशी केली. सर्वांशी त्यांची सारखी वागणूक,जाती भेदाचा लवलेश
नाही. कुठे जायचे असले की आपल्या अँबेसॅडरच्या चालका सोबत घरी जेवण करून ते
प्रवासाला निघत. काका Panctual, मिताहारी , शिडशिडीत शिवाय रोजचा दिनक्रम एकदम
पक्का त्यामुळे चांगले वयाची नव्वदी गाठतील असे आम्हाला वाटे परंतू आयुष्यभर
इतरांच्या भल्यासाठी जगलेले काका त्यादिवशी स्वत:च “आता माझे कार्य संपले”असे
म्हणाले आणि काळजात एकदम धस्स झाले. “कुणासाठी थांबायचे नाही” हे सुद्धा सांगितले
असल्याने त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सुपूर्द केले. त्यांच्या
निधनाची बातमी अनेकांना उशिरा कळली त्यामुळे अनेक लोक भेटीस येत आहेत. खरोखर काका
तुम्ही “बहुत जनांशी आधारू” होतात. तुमचे कार्यमग्नता, बहुगुणीपणा, लोकसेवा हे गुण
सर्वांमध्ये उतरोत व प्रेरणा देवोत.
खरोखरच काकांचे व्यक्तिम्त्वात खूप चांगले होते.खूप छान लिहिले काकांबद्दल.
उत्तर द्याहटवा🙏
हटवाअप्रतिम लिहलत भाऊजी..ति.काकांच बहुआयामी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभ राहिल..विनम्र श्रद्धांजली
उत्तर द्याहटवा🙏
हटवाजग कहता है तुम रहे नही
उत्तर द्याहटवामन कहेता है तुम गये नही
जग सच्चा है पर मन भी सच्चा
तुम गये सही पर मिटे नही
खूप छान लिहलय विनू !!
🙏
हटवाविनय खुप छान लिहिलं.आठवणींना उजाळा मिळाला
उत्तर द्याहटवा