पंतप्रधानांचा अनादर अतिरेकी
मात्र आदरणीय
आपल्या देशातील नेते काय बोलतील
याचा काही नेम नसतो. यात सर्वच पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. राहुल गांधी व त्यांच्या
पक्षातील नेते सुद्धा कधी काय बोलतील सांगता येत नाही. शेकडो वेळा त्यांच्या काही-बाही
बोलण्याची प्रचीती जनतेला आलेलीच आहे. त्यांच्या या अशा वक्तव्यातून त्यांची व पर्यायाने
त्यांच्या पक्षाची विचारसरणी, मानसिकता तसेच देशहिताची त्यांना कितपत काळजी आहे हे
दर्शवते. अशीच एक प्रचीती काल पुनश्च एकदा आली.काल काँग्रेस अध्यक्ष दिल्ली येथे
बूथ कार्यकर्त्याच्या सभेत बोलत होते. यावेळी अझहर मसूद हा कसा सुटला होता या बाबत
ते केंद्रातील तत्कालीन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडत होते. याबाबत भाष्य करतांना
त्यांनी पुलवामा हल्ल्यामागचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या
म्होरक्याचा “मसूद अझहरजी” असा नामोल्लेख केला. काश्मीर मध्ये ज्या दहशतवादी संघटनेने
कित्येक हल्ले करून आपले जवान, नागरिक यांचे बळी घेतले आहे अशा भेकड,भ्याड,नतद्रष्ट,बुद्धीभ्रष्ट
अतिरेक्यांच्या म्होरक्याला आदरार्थी “जी” हे प्रत्यय लावून राहुल गांधीनी पुलवामा
हल्ल्यात शहीद झालेले जवान,त्यांचे कुटुंबीय यांसोबतच सध्या दहशतवादी हल्ल्याने
संतापलेल्या देशातील करोडो नागरीकांचा सुद्धा अपमान केला आहे. काँग्रेस पक्षात असे
वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिग्विजयसिंग या महाशयानी
ओसामा बिन लादेन याचा “ओसामाजी” व हाफिज सईद चा “हाफिज सईद सहाब“ असा उल्लेख केला
होता व जनतेच्या ते स्मरणात आहे. क्रूरकर्मा अतिरक्यांना हे असे आदरार्थी संबोधन का?
राहुलजी तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हणता आणि अतिरेक्यांना आदररार्थी संबोधता.
तुमच्या या असे वक्तव्ये करण्याच्या त-हेने तुम्ही स्वत:चेच हसे करून घेत असता. मागे
एकदा तुम्ही मोठ्या त्वेषाच्या आविर्भावात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग सरकारने काढलेला
अध्यादेश टरा-टरा फाडला होता. हे सुद्धा जनतेच्या लक्षात आहे. तुमच्या या अशा वागणुकीमुळे,
तुमच्या व तुमच्या शिलेदारांच्या वक्तव्यांमुळे, तुम्ही कदाचित काँग्रेस पक्षाला अधिकच
खोल गर्तेत घेऊन जाणारे अध्यक्ष ठराल असे आता जनतेलाच नव्हे तर तुमच्याच पक्षातील
लोकांना सुद्धा हमखास वाटत असेल. लोकसभा निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. राहुलजी
तुमच्या पक्षातर्फे एकदा तुम्ही स्वत:च पंतप्रधान पदाचा उमेदवार असल्याची घोषणा केली होती. परंतू भारताचा पंतप्रधान कसा असला
पाहिजे हे भारतीयांच्या लक्षात आलेले दिसते. किंबहुना जनतेने ते ध्यानात घ्यावे. खंबीर
नेतृत्व करणारा , जागतिक स्तरावर एक शक्तीशाली देश म्हणून भारतास पुढे आणणारा, देशाची
अर्थव्यवस्था भक्कम करणारा , समस्त भारतीयांना समदृष्टीने पाहणारा , अतिरेक्यांचा व
राष्ट्रविरोधी शक्तींचा नि:पात करणारा असा पंतप्रधान या देशाला हवा आहे. आपल्या जवानांचे
बळी घेणा-या, निष्पाप नागरिकांना मारणा-या अतिरेक्यांना “जी” “सहाब” असे आदरार्थी संबोधणारा
नव्हे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा