सावरकरांची अवहेलना करणा-यांनो, तुमच्या कडून कोलू तरी हालेल का?
आज सावरकर जयंती. सावरकरांची उपेक्षा
पारतंत्र्यात तर झालीच झाली परंतू स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा होतच आली,
सावरकरांच्या मृत्यू उपरांत सुद्धा होतच आहे. यात पुनश्च भर पडली ती राजस्थानात सत्ता
बदल झाल्यावर. राजस्थानात वसंधुरा राजे सरकार पडले व नवीन सरकार आले. नवीन सरकार
आल्यावर इतर काही उपाययोजना , विकासात्मक कामे हे हाती घेण्या ऐवजी शिक्षण मंत्रालयाने
पहिले कार्य कोणते केले असेल ? तर ते होते इयत्ता दहावीच्या समाज विज्ञान पुस्तकातील
सावरकर चरित्रातील मजकूर बदलण्याचे. काय तर म्हणे की , “या पाठात स्वातंत्र्यवीर
सावरकर यांचा स्वतंत्रता सेनानी म्हणून जो
उल्लेख केला आहे जो चुकीचा आहे. वर्ष 2017 मध्ये “अंग्रेजी साम्राज्य के प्रतिकार
और संघर्ष“ या पाठाचा समावेश करण्यात आला होता. या पाठात सावरकरांच्या चरित्राचा
सुद्धा समावेश आहे. शिवाय इतरही स्वतंत्र सेनानींचा सुद्धा समावेश या पाठात आहे. यात
सावरकरांचा जो स्वतंत्र सेनानी म्हणून उल्लेख करण्यात आला , त्यांना दोन वेळ
जन्मठेप झाल्याचें सांगितले आहे त्याला काही आधार नाही असे श्री गोविंदसिंह डोटासरा या शिक्षण
मंत्र्यांना वाटते व तसे त्यांनी त्यासाठी गठीत केलेल्या समितीला कळवले आहे. या
समितीने त्याही पुढे जाऊन सावरकरांचा अनादर केला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या
पाठ्यपुस्तकात सावरकरांनी स्वत:चे वर्णन पोर्तुगाल पुत्र असी केल्याचा उल्लेख आहे.
या देशात अद्यापही स्वतंत्र सेनानींचा असा अनादर , असा अपमान होत असेल तर यासारखे
दुर्दैव कोणते. या आजच्या पिढीतील नेत्यांना झाले तरी काय ? विचारसरणी वेगळी
म्हणून हे स्वतंत्रता सेनानींचा अनादर, अपमान करतात, कुणी सावरकरांचा तर कुणी गांधीजींचा.
हे सर्व बंद होणे, प्रसंगी यासाठी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करणे जरुरी आहे. स्वतंत्र
सेनानी मग ते कोणत्याही विचारसरणीचे असो त्यांचा अपमान, अनादर कुणी करूच नये. अभिव्यक्ती
स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून , धूर्त राजकारणी स्वत:ची राजकीय पोळी शेकण्यासाठी
काहीही बरळतात,
शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करतात. हे सर्व थांबले पाहिजे. तमाम स्वतंत्र सेनानीचा आदर देशवासीयांनी, सरकारनी कायम राखणे आवश्यक आहे. राज्यात कुण्या का पक्षाचे सरकार येवो. खरा , प्रेरणादायी इतिहास हा शैक्षणिक अभ्यासक्रमात असलाच पाहिजे, त्यात सर्वच स्वतंत्रता सेनानींचा सामावेश असलाच पाहिजे, त्यांचा सन्मान कायम राखल्याच गेला पाहिजे.महाराष्ट्र सरकारने या बाबत राजस्थान सरकारला पत्र देणे जरुरी आहे. तसेच तमाम सावरकर प्रेमींनी राजस्थान शिक्षण मंत्र्यांना निवेदने पाठवावीत. याच राजस्थान सरकारच्या शिक्षणा खात्याने मागे लोकमान्य टिळकांचा “दहशतवादाचे जनक” असा उल्लेख संदर्भ पुस्तकात केला होता. आता त्याच राजस्थानचे शिक्षण मंत्रालय सावरकरांना स्वतंत्रता सेनानी म्हणून नाकारत आहे. यांच्या कडून असे म्हणवले तरी कसे जाते ? ज्या सावरकरांचा तुम्ही असा अपमान करता तुमचे अध्यक्ष सावरकरांची महानता नाकारतात, तुमचे मणिशंकर अंदमानातील सावरकरांच्या काव्यपंक्ती पुसतात. तुमच्या या असल्या व्देषपूर्ण कृतीच तुम्हाला रसातळाला नेत आहेत. सावरकरांची देशभक्ती,देशप्रेम,इंग्रज विरोधी लढा, हे तुम्ही नाकारता ? सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या यातना तुम्ही नाकारता ? सावरकरांनी अंदमानात काथ्याकुट केली . तुम्हाला सुक्या नारळाच्या शेंड्या तरी काढता येतील का ? सावरकरांनी कोलू फिरवून तेल काढले तुमच्या कडून कोलू हालेल तरी का ? तुम्ही समुद्राच्या तीराशी जरी उभे राहिले तर तुमचे डोळे फिरतील तो समुद्र सावरकर लांघून गेले. सावरकरांची अवहेलना करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्यात निवडून आले त्या राज्याचा विकास कसा होईल ते पहा , तेथील विद्यार्थी शैक्षणिक दुष्ट्या कसे प्रगत होतील त्याकडे लक्ष द्या.केंद्र सरकाने गती दिलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणास प्राधान्य द्या तुम्ही हे सोडून आकस भावनेने अभ्यासक्रमात जो बदल करीत आहात, सावरकरांना स्वतंत्रता सेनानी म्हणून नाकारण्याचे जे धैर्य करीत आहात त्याने आज तुमचे जे काही अस्तित्व या देशात शिल्लक आहे ते सुद्धा नष्ट होईल व ते सुध्दा तुमच्याच या असल्या नतद्रष्ट आकस,व्देष भावनांच्या कृतींमुळे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा