त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्
मंगळवारी दुपारी तीनच्या
सुमारास फोन खणाणला, नवीन नंबर होता. फोन घेतला तर राजूभाऊ राजपूत होते. त्यांनी बापूसाहेब
करंदीकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. बापूसाहेब
करंदीकर म्हणजे श्री यशवंत वसंतराव करंदीकर, सर्वांच्या आदरस्थानी असलेले व बापू या नावाने सर्वपरिचित. निमंत्रण
मिळाले व काल फेसबुकवर दि 6 जुन 2019 रोजी बापूसाहेब करंदीकर यांच्या अमृत महोत्सवाची
विश्व हिंदू परिषद तर्फे टाकण्यात आलेली एक पोष्ट दिसली. बापूंच्या अमृत महोत्सवात
पदार्पणाचा कार्यक्रम सार्वजनिक पद्धतीने, समाज साजरा करीत आहे हे पाहून अत्यानंद झाला.
एखाद्या कुटुंबाची वागणूक, कुटुंबातील सदस्यांची
वागणूक यांवरून ते कुटुंब कसे आहे याची कल्पना सर्वांना येत असते. त्याचप्रमाणे
एखाद्या नगराची मानसिकता, नगरातील पौरजन यांचा स्वभाव, त्यांची मानसिकता, सभ्य-असभ्यता, संस्कृती हे सर्व त्या नगरात घडणा-या घडामोडी, घटना, सन्मान, पुरस्कार, स्पर्धा
यांवरून कळत असते. ज्या देशात, नगरात निस्वार्थी समाज
सेवकांचा, विद्वानांचा सन्मान होत असेल त्या देशाची, त्या
नगराची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याची खात्री पटते. बापू ही त्यातलेच. समाजासाठी
जन्म घेतलेले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मन गतकाळात गेले. मी वर्ग सातवीत असतांना
वर्गात एक नवीन मुलगा दाखल झाला होता श्रीकांत करंदीकर, बापूंचा मुलगा. त्याच्याशी
परिचय झाला. त्याच्या घरी येणे- जाणे सुरु झाले. पुरवार गल्लीतील ते छोटे भाड्याचे
घर. यात बापू आपल्या तीन मुली,एक मुलगा व पत्नी यांचेसह राहात होते.कित्येकदा त्या
घरी गेलो. गुरुजी, डॉक्टर, शिवाजी महाराज, राणाप्रताप यांचे फोटो
लावलेले, साधेसुधे परंतू
नीटनेटके घर. बापू नेहमी प्रेमाने बोलत, चौकशी करत. ते कधी चिडल्याचे, रागावल्याचे
दिसले नाही. नंतर बापू भगतसिंग चौकात राहायला आले. श्रीकांत शिकण्यासाठी बाहेरगावी
गेला तरी बापू व करंदीकर कुटुंबाशी संबंध टिकून राहीले. योगायोग असा की बापूंच्या
मुली व माझ्या बहिणीही एकाच वर्गात होत्या. त्यामुळे कौटुंबिक घनिष्टता वाढली. मी तेंव्हा
त्यांना काका म्हणत असे. लहानपणापासून बापूंचा सहवास मिळाल्यामुळे बरेच काही शिकायला
मिळाले. त्यांच्या घरी नेहमी कुणी ना कुणी आलेले असायचे. काकू नेहमी हसतमुखाने
सर्वांचे स्वागत करायच्या. समाजासाठी बापूंनी वाहून घेतले असले तरी काकूंची काही
तक्रार कधी ऐकली नाही की त्यांच्या चेह-यावर दिसली नाही. बापूंचा समाजसेवेचा शिरस्ता
आजही कायम आहे. ITI मधून सेवानिवृत्त झालेले बापू नेहमी सायकल
वापरीत. आता बापू
स्कुटी चालवतात परंतू सायकलची साथ अजूनही कायम आहे. बापूंना नेहमी साध्या वेशातच
पाहिले आहे. कुठे काही शान-शौक नाही का चैन नाही. आजतागायत बापू संघ, विश्व हिंदू
परिषद, बजरंग दल, वाचनालय, व्यायाम शाळा, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी निस्वार्थपणे
झोकून देऊन कार्य करीत आहे,समाजसेवेचे व्रत पार पाडीत आहे. बापूं त्यांच्या सचोटीमुळे,
निस्वार्थी वृत्तीमुळे, पंचक्रोशीत लोकप्रिय झाले. त्यांनी प्रसिद्धी पासून दूर
राहून जे मिळाले ते कार्य पार पाडले. कुठली जबाबदारी कधी काढली तर निराश न होता
दुसरी जबाबदारी ते पार पाडत राहिले व पार पाडतच आहेत कारण त्याना माहित आहे की ते “त्वदीयाय
कार्याय बद्धा कटीयम्“ आहे अर्थात मातृभूमीच्या
कार्यासाठी ते कटीबद्ध आहेत.
बापू तुमची समर्पित समाजसेवा सर्वांना सदैव प्रेरणादायी आहे. तुम्हाला
निरामय आरोग्य उदंड आयुष्याच्या शुभेच्छा.