Click "Follow" Button below To Follow this Blog

२५/०९/२०१९

Amitabh Bachchan wins Dadasaheb Phalke Award 2019 , on this occasion republishing article "Amitabhayan"


अमिताभायण
काल अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले जाणार आहे असे वृत्त झळकले. देशविदेशात करोडो अबालवृद्धांच्या या आवडत्या अभिनेत्याला हा पुरस्कार मिळणे ही सर्वांची मनोमन इच्छा होतीच. कारण या पुरस्कारासाठी तो Deserving आहेच. भारतीय जनमानसाच्या ह्र्द्यसिंहासनावर अमिताभ गेली कित्येक वर्षे अनभिषिक्त सम्राटा प्रमाणे राज्य करीत आहे. त्याच्या उतरत्या वयातही त्याची क्रेझ आहे. वाल्मिकीचे रामायण, गदिमांचे गीत रामायण आणि भविष्यात अमिताभायणसुद्धा लिहिले जाऊ शकते. का नाही लिहिले जाऊ शकणार ? कारण त्याचे गारुडत्याची मोहिनी अबाल वृद्धांमध्ये गेल्या 47 वर्षांपासून कायम आहे.  “ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही” म्हणत जंजीर मध्ये आपला राग प्रकट करणारा , सतत कार्यशील राहणारा अमिताभ देवी और सज्जनोअसे आजही केबीसीमध्ये म्हणत आपला कारेश्मा राखून आहे. काल त्याला दादासाहेब फाळके सन्मान प्राप्त होणार ही बातमी आली. माध्यमांवर संदेशांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात झाली झाली.  म्हणूनच अमिताभ विषयी पुनश्च काहीतरी लिहिण्याची इच्छा झाली. अमिताभायण या शीर्षकानुसार म्हटले तर अमिताभवर एक भलामोठा ग्रंथच लिहावा लागेल. तूर्तास नाही अमिताभायण ग्रंथ तर निदान एक लेख तरी लिहावासा वाटला. कामयाबी की सिडीपटापट चढत लोकप्रियतेचे सर्व उच्चांक अमिताभने मोडले. त्याच्याशी तुलना करू पाहणारे सर्व किंग” ,”बादशाहआजही त्याच्या मागेच आहेत कारण हम जहॉं खडे होते है लाईन वहीं से शुरू होती हैअशी संवादफेक त्याने कित्येक वर्ष आधी केली आहे. आणि खरच आजही लाईनमध्ये प्रथमस्थानी तोच आहे, सुपरस्टार आहे. सुरुवातीला अपयश मग सलीम-जावेद, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, यश चोप्रा इ सहका-या समवेत अनेक हिट सिनेमे अमिताभने दिले. त्याच्यासाठी गायलेली किशोर कुमारच्या आवाजातील गाणी आजही लोक तितक्याच आवडीने ऐकतात. डॉन सिनेमा आजही तितकाच ताजा वाटतो. नेहमी म्हटले जाते की सर्वात मुख्य काम असते दिग्दर्शनाचे परंतू डॉन चा दिग्दर्शक चंद्रा बारोट होता किती जणांना माहीत आहे? चंद्रा बारोट ने पुढे किती हिट सिनेमे दिले त्यासाठी शोध मोहीम हाती घ्यावी लागेल. सबकुछ अमिताभअशी स्थिती होती. उंच आहे म्हणून आमच्या कॅमेरात बसणार नाही, आवाज चांगला नाही असे म्हणून प्रथम हिणवल्या गेल्यावरही त्याने त्याच्या त्याच बाजू जमेच्या म्हणून सिद्ध केल्या, ”पीटर तुम मुझे बाहर ढूंड रहे थे और मै तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा थाहा संवाद कुणा इतर अभिनेत्याच्या आवाजात ऐकण्याची कल्पनाच करवत नाही. केबीसीमध्ये सहभागी
लोकांशी अत्यंत आपुलकी व आदराने वागणा-या अमिताभने त्याचे नांव रेखा सोबत जोडल्या गेल्यावर आजतायागत या बाबतीत किती संयमाने वर्तणूक केली आहे. हिंदी भाषेवर त्याचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे व प्रशंसनीय आहे. नाहीतर आजकाल किती इंग्रजाळलेले हिंदी व मराठी बोलतात. तो सलग एकच भाषा वापरून किती अस्खलीत बोलतो. पुढे राजकारणातील अपयश  आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक असे त्याचे सिनेमे आपटले. ए बी सी एलचे दिवाळे निघाले. असे अपयशाचे हलाहल पचवून त्याने पुन्हा उभारी घेतली. अंग्री यंग मॅनया त्याच्या काळात आमचा जन्म झाला होता परंतू त्याची जादू आजही कायम असल्याने त्याचे सिनेमे, गाणी यांची कितीतरी पारायणे आमच्या पिढीतील अनेकांनी केली आहे. तो जेंव्हा मुकादम मै तुम्हारे इन भाईयों तट्टूओंको एक हाथ से मसलकर फेंक सकता हुंअसे म्हणायचा तेंव्हा पिटातील प्रेक्षकाला आपणच अन्याया विरुद्ध पेटून उठलो आहे असे वाटायचे. मेरे पास ना बाप दादा की दौलत है ना फुटी कवडी लेकीन मै तुमको पांच दिन के अंदर पाच लाख रुपये दुंगाअसे तो संजीव कुमारला त्रिशूल मध्ये म्हणाला तेंव्हा त्याच्यातील आत्मविश्वास तरुणांना प्रेरित करून गेला. याच सिनेमात तो गुंडांना मारतांना गुंडांचा पराजय होईलच या आत्मविश्वासाने  तो रुग्णवाहिका घेऊन जातो. या सिनेमात त्याने प्रथम गरीब आणि नंतर एकदम कॉन्फीडंटव प्रोफेशनल युवा बिल्डरची भूमिका किती सुरेख वठवली आहे. त्याच्या प्रेमापोटी एक नजर, आलाप, बन्सी बिरजू , गंगा की सौगंध, रस्ते का पत्थर असे त्याचे अपयशी चित्रपट सुद्धा पहिले आहेत. त्याच्या भरवश्यावर कितीतरी मिमिक्री कलाकारांनी आपली उपजीविका साधली आहे. राजू श्रीवास्तव त्याची कबुली देतो.परंतू अशा या जादूगरअमिताभच्या जेंव्हा अनिवासी भारतीय असल्याच्या बातम्या आल्या, बोफोर्स घोटाळ्यात नांव जोडल्या गेले, नुकतेच पनामा पेपर्स मध्ये नांव असल्याचा संशय व्यक्त केल्या गेला तेंव्हा त्याच्या चाहत्यांना दु:ख झाले परंतू त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. व.पु.काळे यांनी एका कथेत लेखकाची पत्नी व मुलगी कशा अमिताभसाठी  वेड्या  असतात आणि त्याचा लेखकाला कसा वीट येतो यावर फार सुंदर कथा लिहिली आहे. अमिताभवर लिहायचे म्हणजे ते अमिताभायणच होईल आणि त्यासाठी एक लेख पुरेसा ठरणार नाही.

१९/०९/२०१९

Episode of KBC encountered an emotional moment when Amitabh Bachchan came across to console Rani Patel, a contestant who lost her husband to swine-flu. She said that she will do her best for her in-laws if she win healthy amount from KBC.

आशेचा किरण ” 

परवा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात रानी पटेल नामक एक शिक्षिका सहभागी झाली होती. “हॉट सिट” वर येणा-या प्रत्येक सहभागी व्यक्तीस सन्मानाची, आदराची वागणूक देणा-या , सहभागी व्यक्ती जर स्त्री असेल तर स्त्री दाक्षिण्य दाखवत अमिताभ बच्चन त्यांचे स्वागत करतात. खेळ सुरु करण्याच्या पूर्वी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधतात , त्यांना बोलते करतात. राणी पटेल यांना सुद्धा त्यांनी बोलते केल्यावर राणी यांनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली. एका साध्या कुटुंबातून आलेल्या या स्त्रीच्या पतीचे स्वाईन फ्लू आजाराने निधन झाले. पतीचे निधन झाल्यावर आपल्या सासू सास-यांसह त्या राहू लागल्या. सध्या नोकरीच्या निमित्ताने त्या सासु-सास-यांपासून दूर राहतात. अमिताभ यांनी त्यांना खेळात भरपूर पैसे जिंकल्या तर काय कराल ? असे विचारले असता आजच्या काळात क्वचितच ऐकायला मिळेल असे त्यांचे उत्तर ऐकून अमिताभ यांच्यासह सर्वच प्रेक्षकांच्या हृदयात आनंद निर्माण झाला. अमिताभ यांच्या डोळ्यात तो दिसला सुद्धा. राणी पटेल उत्तरल्या होत्या की , रक्कम जिंकली तर मी माझ्या वृद्ध सासू सास-यांची काळजी घेईल व सास-यांनी जे ऋण घेतले आहे ते फेडेल. आपल्या पतीच्या पश्चात सासू सास-यांच्या प्रती असलेली आत्मीयता पाहून सर्वांनाच राणी पटेल यांच्याप्रती आदर निर्माण झाला. म्हणूनच या स्त्री बद्दल लिहावेसे वाटले.  आज-काल आपण पहातच आहोत. अनेक शहरे ही सेवानिवृत्तांची शहरे झाली आहेत. मुलगा , सून दोन्ही एमएनसी मध्ये , कधी विदेशात दोघेही प्रचंड
व्यस्त , मुले त्यांच्या शाळा , अभ्यासात व्यस्त. त्यामुळे जेष्ठ नागरीकांकडे मोठे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे आजार , त्यांना मानसिक आधार , नातवंडांची माया त्यांना मायेने केलेला स्पर्श या सर्वांपासून ते वंचित झाले आहेत. अनेक घटनांतून हे समोर आले आहे की, सासू सासरे नसले तर उत्तम. असे अनेक सुशिक्षित(?) नवतरुणींचे मत असते. अर्थात याला अपवाद आहेतच. मेट्रो सिटी मध्ये वास्तव्य करावयास गेले म्हणजे नवदाम्पत्याची आपल्या गावाशी असलेली नाळ तुटते. व्यस्तता आणि विक एंडचा एन्जॉय यातून वृद्ध माता-पिता , सासू-सासरे यांच्यासाठी एखादा दिवस काढणे सुद्धा दुरापास्त होते. म्हणूनच मग कधी आईच्या अस्ती टपालाने पाठवा असे उत्तर मुलीकडून येते. तर कधी मुलगा घरी आल्यावर त्याला आईचा सांगाडाच दिसतो अशी तीव्र वेदनादायी वृत्ते आपल्या वाचनात येतात. वृद्धाश्रमे वाढतच आहेत. एकाकी राहणा-या वृद्धांच्या संपत्ती , घर लाटण्यासाठी हत्या होतच आहेत. बालपणीपासून श्रावण बाळाची कथा ऐकणा-यांच्या देशात ही अशी बिकट परिस्थिती असतांना मध्य प्रदेशातील राणी पटेल यांचे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जर मोठी रक्कम जिंकली तर ती रक्कम सासू सास-यांना देईल हे उत्तर मोठे आशादायी आहे, तरुण-तरुणीं पुढे आदर्श प्रस्थापित करणारे आहे. सर्वच तरुण , तरुणी यांनी राणी पटेल यांचा तो एपिसोड आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ काढून यु ट्युब वर अवश्य पहावा. कष्टात दिवस काढून आपल्या मुलांना मोठे करून , त्यांना शिकवून , त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे वृद्ध नागरिक एकाकी पडलेले दिसून येत आहेत. त्यांचे चेहरे दु:खी कष्टी दिसत आहेत. या अशा काळात राणी पटेल ही स्त्री म्हणजे एक आशेचा किरणच आहे.

१२/०९/२०१९

Sahir Ludhianvi’s writings — nazms, letters, photographs — were recently found at a junk shop amid a dump of magazines and newspapers in Mumbai’s Juhu. Story about this

हर एक पल का शायर



        












ल आयेंगे नगमो की खिलती   
           कलियां चुननेवाले
        मुझसे बेहतर कहनेवाले तुमसे
           बेहतर सुननेवाले
         कल कोई मुझको याद करे,
         क्युं कोई मुझको याद करे ?
          मसरुफ जमाना मेरे लिये
        क्युं वक्त अपना बरबाद करे |
      साहिर लुधियानवी या गीतकाराच्या या ओळी परवा आठवल्या जेंव्हा वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. बातमी संगीत आणि साहित्य रसिकांचे हृदय हेलावून टाकणारी होती. जुहूच्या एका भंगार विक्रेत्याने जुनी वर्तमानपत्रे , मासिके विक्रीस काढली. फिल्म हेरीटेज फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने हे सर्व जुने साहित्य विकत घेतले. अवघ्या तीन हजार रुपयात. त्यांच्या या खरेदीत मात्र त्यांना केवळ तीन हजाराच्या मोबदल्यात अमुल्य असा ठेवा प्राप्त झाला. कारण या जुन्या वर्तमानपत्र आणि मासिकांत त्यांना अब्दुल हयी अर्थात प्रख्यात गीतकार साहिर लुधियानवी यांच्या स्वहस्तलिखित कविता,शायरी,रोजनिशी इ. सापडले. काही छायाचित्रे सुद्धा सापडली. रोजनिशीत कधी व कुठे रेकॉर्डिंग आहे , दैनंदीन कार्यक्रम आहे याच्या नोंदी आहेत. संगीतकार रवी आणि कवी हरबन्स यांना लिहिलेली पत्रे सुद्धा या साहित्यात आहे. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा” ,”अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम” , “अभी ना जाओ छोडकर”, “साथी हात बढाना” , “ऐ मेरी जोहराजबी “, दाग चित्रपटातील गीते , “मै पल दो पल का शायर हूं” अशी एकापेक्षा एक सरस गीते रसिकांना देणा-या साहिरचे साहित्य अशाप्रकारे धुळखात, भंगारात सापडणे ही कलाविश्वासाठी,रसिकांसाठी धक्कादायक तसेच शोकप्रद घटना आहे. डाक विभागाने 2013 या वर्षी ज्याच्या स्मरणार्थ तिकिट प्रकाशित केले होते,ज्याला विविध पुरस्कारांसह पद्मश्री ने गौरवले गेले होते, ज्याची गीते आजही रसिकांना रीझवतात त्याच्या हस्तलिखित कविता इतक्या दुर्लक्षित?लाहोरला
आपल्या  कारकीर्दची सुरुवात करणा-या साहीरवर डाव्या विचारसरणीच्या प्रसाराचा  आरोप केला गेला व पाकीस्तान सरकारने साहिरच्या अटकेचे आदेश जारी केले.त्या नंतर साहिर भारतात आला व मुंबईला दाखल झाला.थोर साहित्यिक अमृता प्रीतम व साहिर यांच्यात हळुवार,संवेदनशील असे मैत्रीपूर्ण संबंध होते.आपल्या चित्रपटसृष्टीला सुद्धा उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची रीत आहे. एकदा का एखादा कलाकार मागे पडला,दिवंगत झाला तर चित्रपट सुष्टीला त्या कलावंताचे त्वरीत विस्मरण होते. साहिरचे हस्तलिखित अशाप्रकारे भंगारात सापडणे याने आपलाच वारसा न जपण्यात चित्रपटसृष्टी किती निष्काळजी आहे हे स्पष्ट दिसून येते. म्हणूनच साहिर म्हणाला होता “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है ? परंतू साहिरने जरी “मै पल दो पल का शायर हूं” या गीतात “क्युं कोई मुझको याद करे” असे म्हटले असले तरी या मसरुफ अर्थात आपल्याच कार्यात व्यस्त असणा-या जगात फिल्म हेरीटेज फाऊंडेशन या संस्थेने साहिरचे साहित्य प्राप्त करून ते जतन करण्याचे,त्याचे प्रदर्शन भरवण्याचे योजून “मै हर एक पल का शायर हूं” असे सुद्धा म्हणणा-या साहिरला तो खरोखर “हर एक पल का शायर” असल्याचे सिद्ध केले आहे.

०५/०९/२०१९

Article about Water Pollution in festival


निर्मळ पाण्यात निर्माल्य नकोच 
सणासुदीचे दिवस आहेत. रस्त्याने दूर्वा , फुले , आंब्याची पाने , केळीची पाने इ. मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दिसत आहेत. हे सर्व देवाला अर्पण होणार. ही सर्व दुकाने पहात असतांना या सर्वांचे काही दिवसांनी होणारे निर्माल्य डोळ्यासमोर दिसू लागले. मनात भय उत्पन्न झाले की आता पुन्हा विहीरी , नद्या , तलाव , धरणे इ. जलाशये या निर्माल्याने पुन्हा भरणार. गत उन्हाळ्यात जनता भीषण पाणी टंचाईला सामोरी गेली. जात आहे. भविष्यही तसेच असणार आहे. तरीही विहीरीमध्ये पूजेचे विसर्जन, निर्माल्य टाकतांना कुणाला काही वाटत कसे नाही? उन्हाळ्यात प्रशासनाने , सामाजिक संघटनांनी विहीरी , तलाव यांची सफाई केली. जनतेने सुद्धा आपल्या ऐपतीनुसार आर्थिक मदत केली. परंतू तरीही निर्माल्य विसर्जन हे चांगल्या निर्मळ पाण्यात होतांना दिसत आहे. खामगांवचेच दाखले द्यायचे झाल्यास जिजामाता मार्ग, कोर्टा जवळील विहीर तरुणांनी साफ केली. त्याच विहीरीत हरतालिकेच्या दुस-या दिवशीच निर्माल्य, केळीचे खांब तरंगताना दिसून आले. याला काय म्हणावे ? सिव्हील लाईन्स मधील मोठी विहीर नगर परीषदेने साफ केली. त्यातही कचरा टाकणे सुरू झाले. विशेष म्हणजे या दोन्ही विहीरी चांगल्या सुशिक्षित लोकांच्या परीसरात आहे. पूर्वी प्रत्येक परीसरात एखादा कडक स्वभावाचा व्यक्ती असायचा त्याने आवाज दिला की कुणीही असे कचरा निर्माल्य टाकण्यास, झाडांची फुले तोडण्यास धजावत नसे. त्यामुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागत असे. आता तसे व्यक्तीही राहीले नाही. असले तरी ते बोलत नाही कारण कुणी कुणाला जुमानत नाही. म्हणूनच चांगले पानवठे निव्वळ कचरा कुंड्या बनत आहेत. जनुना तलावाचे रोटरी क्लबने साफसफाई व गाळ काढणे हे मोठे कार्य तडीस नेले. परंतू त्याठिकाणी गेलो असता अनेक ठिकाणी कचरा ,निर्माल्य , देवतांचे जुने फोटो टाकलेले दिसले. ज्या विहीरींनी, ज्या तलावांनी वर्षानुवर्षे 
जनतेची, प्राणीमात्रांची तहान भागवली आहे. तीच जलाशये प्रदूषित करतांना जनाची नाही तर निदान मनाची तरी शरम वाटायला नको का ? परंतू कितीही लिहा , कितीही अभियाने राबवा जल प्रदूषण करणे थांबता थांबत नाही. म्हणायला सुशिक्षितांची संख्या तेवढी वाढते आहे. परंतू यास काही लोक हे सकारात्मक अपवाद सुद्धा आहेत की जे पर्यावरण रक्षण करण्यास हातभार लावत आहे परंतू ते अगदीच तुटपुंजे. ज्याप्रमाणे दाट अंधारात एका काजव्याचा प्रकाश सुद्धा दिलासा देणारा वाटतो त्यापमाणे या लोकांचे कार्य दिलासा देणारे आहे. जलप्रदूषण , इतर प्रदूषण रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ती पारच पाडावीच लागणार आहे. अन्यथा आपल्या भावी पिढ्यांचे अतोनात हाल होणार हे निश्चित. शाप, हाय, कोप वगैरे असते की नाही ठावूक नाही , ती अंधश्रद्धाही असेल परंतू जनता जोपर्यंत चांगले पानवठे खराब करीत राहील , त्यांचे रक्षण करणार नाही तो पर्यंत जनतेला निसर्गाच्या कोपाचा सामना व पाणी टंचाईचा शाप हे भोगावेच लागणार. म्हणूनच सर्वांना हे सांगावेसे वाटते की याच नव्हे तर आगामी सर्वच सणासुदीला व इतर वेळीही निर्मळ पाण्यात निर्माल्य टाकणे नकोच.