निर्मळ
पाण्यात निर्माल्य नकोच
सणासुदीचे दिवस आहेत.
रस्त्याने दूर्वा , फुले , आंब्याची पाने , केळीची पाने इ. मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दिसत आहेत. हे सर्व देवाला
अर्पण होणार. ही सर्व दुकाने पहात असतांना या सर्वांचे काही दिवसांनी होणारे
निर्माल्य डोळ्यासमोर दिसू लागले. मनात भय उत्पन्न झाले की आता पुन्हा विहीरी , नद्या , तलाव , धरणे इ. जलाशये
या निर्माल्याने पुन्हा भरणार. गत उन्हाळ्यात जनता भीषण पाणी टंचाईला सामोरी गेली.
जात आहे. भविष्यही तसेच असणार आहे. तरीही विहीरीमध्ये पूजेचे विसर्जन, निर्माल्य टाकतांना कुणाला काही वाटत कसे नाही?
उन्हाळ्यात प्रशासनाने , सामाजिक संघटनांनी विहीरी , तलाव यांची सफाई केली. जनतेने सुद्धा आपल्या ऐपतीनुसार आर्थिक मदत केली.
परंतू तरीही निर्माल्य विसर्जन हे चांगल्या निर्मळ पाण्यात होतांना दिसत आहे.
खामगांवचेच दाखले द्यायचे झाल्यास जिजामाता मार्ग, कोर्टा
जवळील विहीर तरुणांनी साफ केली. त्याच विहीरीत हरतालिकेच्या दुस-या दिवशीच निर्माल्य, केळीचे खांब तरंगताना दिसून आले. याला काय म्हणावे ? सिव्हील लाईन्स मधील मोठी विहीर नगर परीषदेने साफ केली. त्यातही कचरा
टाकणे सुरू झाले. विशेष म्हणजे या दोन्ही विहीरी चांगल्या सुशिक्षित लोकांच्या
परीसरात आहे. पूर्वी प्रत्येक परीसरात एखादा कडक स्वभावाचा व्यक्ती असायचा त्याने
आवाज दिला की कुणीही असे कचरा निर्माल्य टाकण्यास, झाडांची
फुले तोडण्यास धजावत नसे. त्यामुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागत असे. आता तसे
व्यक्तीही राहीले नाही. असले तरी ते बोलत नाही कारण कुणी कुणाला जुमानत नाही.
म्हणूनच चांगले पानवठे निव्वळ कचरा कुंड्या बनत आहेत. जनुना तलावाचे रोटरी क्लबने
साफसफाई व गाळ काढणे हे मोठे कार्य तडीस नेले. परंतू त्याठिकाणी गेलो असता अनेक ठिकाणी
कचरा ,निर्माल्य , देवतांचे जुने फोटो टाकलेले दिसले. ज्या विहीरींनी, ज्या तलावांनी वर्षानुवर्षे
जनतेची, प्राणीमात्रांची तहान भागवली आहे. तीच जलाशये
प्रदूषित करतांना जनाची नाही तर निदान मनाची तरी शरम वाटायला नको का ? परंतू कितीही लिहा , कितीही अभियाने राबवा जल
प्रदूषण करणे थांबता थांबत नाही. म्हणायला सुशिक्षितांची संख्या तेवढी वाढते आहे.
परंतू यास काही लोक हे सकारात्मक अपवाद सुद्धा आहेत की जे पर्यावरण रक्षण करण्यास
हातभार लावत आहे परंतू ते अगदीच तुटपुंजे. ज्याप्रमाणे दाट अंधारात एका काजव्याचा प्रकाश
सुद्धा दिलासा देणारा वाटतो त्यापमाणे या लोकांचे कार्य दिलासा देणारे आहे. जलप्रदूषण
, इतर प्रदूषण रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ती
पारच पाडावीच लागणार आहे. अन्यथा आपल्या भावी पिढ्यांचे अतोनात हाल होणार हे निश्चित.
शाप, हाय, कोप वगैरे असते की नाही ठावूक
नाही , ती अंधश्रद्धाही असेल परंतू जनता जोपर्यंत चांगले
पानवठे खराब करीत राहील , त्यांचे रक्षण करणार नाही तो
पर्यंत जनतेला निसर्गाच्या कोपाचा सामना व पाणी टंचाईचा शाप हे भोगावेच लागणार. म्हणूनच
सर्वांना हे सांगावेसे वाटते की याच नव्हे तर आगामी सर्वच सणासुदीला व इतर वेळीही निर्मळ
पाण्यात निर्माल्य टाकणे नकोच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा