“आशेचा किरण ”
परवा
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात रानी पटेल नामक एक शिक्षिका सहभागी झाली होती.
“हॉट सिट” वर येणा-या प्रत्येक सहभागी व्यक्तीस सन्मानाची, आदराची वागणूक देणा-या , सहभागी व्यक्ती
जर स्त्री असेल तर स्त्री दाक्षिण्य दाखवत अमिताभ बच्चन त्यांचे स्वागत करतात. खेळ
सुरु करण्याच्या पूर्वी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधतात , त्यांना बोलते
करतात. राणी पटेल यांना सुद्धा त्यांनी बोलते केल्यावर राणी यांनी आपली कौटुंबिक
पार्श्वभूमी सांगितली. एका साध्या कुटुंबातून आलेल्या या स्त्रीच्या पतीचे स्वाईन
फ्लू आजाराने निधन झाले. पतीचे निधन झाल्यावर आपल्या सासू सास-यांसह त्या राहू
लागल्या. सध्या नोकरीच्या निमित्ताने त्या सासु-सास-यांपासून दूर राहतात. अमिताभ
यांनी त्यांना खेळात भरपूर पैसे जिंकल्या तर काय कराल ? असे विचारले असता आजच्या
काळात क्वचितच ऐकायला मिळेल असे त्यांचे उत्तर ऐकून अमिताभ यांच्यासह सर्वच
प्रेक्षकांच्या हृदयात आनंद निर्माण झाला. अमिताभ यांच्या डोळ्यात तो दिसला
सुद्धा. राणी पटेल उत्तरल्या होत्या की , रक्कम जिंकली तर मी माझ्या वृद्ध
सासू सास-यांची काळजी घेईल व सास-यांनी जे ऋण घेतले आहे ते फेडेल. आपल्या पतीच्या
पश्चात सासू सास-यांच्या प्रती असलेली आत्मीयता पाहून सर्वांनाच राणी पटेल
यांच्याप्रती आदर निर्माण झाला. म्हणूनच या स्त्री बद्दल लिहावेसे वाटले. आज-काल आपण पहातच आहोत. अनेक शहरे ही सेवानिवृत्तांची
शहरे झाली आहेत. मुलगा , सून दोन्ही एमएनसी मध्ये , कधी विदेशात दोघेही प्रचंड
व्यस्त , मुले त्यांच्या शाळा , अभ्यासात व्यस्त. त्यामुळे जेष्ठ नागरीकांकडे
मोठे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे आजार , त्यांना मानसिक आधार , नातवंडांची माया
त्यांना मायेने केलेला स्पर्श या सर्वांपासून ते वंचित झाले आहेत. अनेक घटनांतून
हे समोर आले आहे की, सासू सासरे नसले तर उत्तम. असे अनेक सुशिक्षित(?) नवतरुणींचे मत
असते. अर्थात याला अपवाद आहेतच. मेट्रो सिटी मध्ये वास्तव्य करावयास गेले म्हणजे नवदाम्पत्याची
आपल्या गावाशी असलेली नाळ तुटते. व्यस्तता आणि विक एंडचा एन्जॉय यातून वृद्ध माता-पिता
, सासू-सासरे यांच्यासाठी एखादा दिवस काढणे सुद्धा दुरापास्त होते. म्हणूनच मग कधी
आईच्या अस्ती टपालाने पाठवा असे उत्तर मुलीकडून येते. तर कधी मुलगा घरी आल्यावर त्याला
आईचा सांगाडाच दिसतो अशी तीव्र वेदनादायी वृत्ते आपल्या वाचनात येतात. वृद्धाश्रमे
वाढतच आहेत. एकाकी राहणा-या वृद्धांच्या संपत्ती , घर लाटण्यासाठी हत्या होतच आहेत.
बालपणीपासून श्रावण बाळाची कथा ऐकणा-यांच्या देशात ही अशी बिकट परिस्थिती असतांना
मध्य प्रदेशातील राणी पटेल यांचे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जर मोठी रक्कम जिंकली
तर ती रक्कम सासू सास-यांना देईल हे उत्तर मोठे आशादायी आहे, तरुण-तरुणीं पुढे आदर्श प्रस्थापित करणारे आहे. सर्वच तरुण , तरुणी यांनी राणी पटेल यांचा तो एपिसोड आपल्या व्यस्त कार्यक्रमातून
थोडा वेळ काढून यु ट्युब वर अवश्य पहावा. कष्टात दिवस काढून आपल्या मुलांना मोठे करून
, त्यांना शिकवून , त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे वृद्ध नागरिक एकाकी पडलेले
दिसून येत आहेत. त्यांचे चेहरे दु:खी कष्टी दिसत आहेत. या अशा काळात राणी पटेल ही स्त्री
म्हणजे एक आशेचा किरणच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा