Click "Follow" Button below To Follow this Blog

१५/१०/२०१९

Article about...NCP Chief Sharad Pawar's objectionable hand movements.

...तेरी जवानी तौबा तौबा...” 



1960 च्या दशकातील पारसमणी चित्रपटातील लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली सर्वच गाणी गाजली होती. याच चित्रपटात “हसता हुआ नुरानी चहेरा ... तेरी जवानी तौबा तौबा ऐ दिलरुबा ” हे एक गीत होते.  हे गाणे परवा आठवले. गाणे आठवण्याचे कारण होते आपले जाणते राजे म्हणवल्या जाणारे शरद पवार. “अभी तो मै जवान हुं” असे काही सभांतून शरद पवार म्हणाले. वय जरी वाढले तरी माणसाने मनाने तरुण असावे हे खरेच आहे . बाळासाहेब ठाकरे सुद्धा तसेच म्हणत. परंतू मनाने तरुण असले, आनंदी उत्साही असले तरी हे तरुणपण व्रात्य तरुणांसारखे नसावे. विविध उच्चपदे, मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद यांसारख्या पदावर राहिलेल्या व्यक्तीने आपले तरुणपण प्रदर्शित करतांना भान ठेवले नाही तर ते विचित्र व हास्यास्पद ठरते.तसेच शरद पवारांचे झाले.बार्शी येथील सभेत “दिलीप सोपल यांनी इतकी वर्षे काय केले?“ असे विचारतांना त्यांनी आक्षेपार्ह असे हातवारे केले. जाहीर सभेत एका जेष्ठ नेत्याचे हे असे करणे सुसंस्कृत महाराष्ट्रवासियांना, सुज्ञ मतदारांना अजिबात रुचणारे नाही. “अभी तो मै जवान हुं” असे म्हणणा-या या जवानास असे करतांना पाहून “ये क्या हुवा है इस बांके जवान को ?” असा प्रश्न जनतेला पडला. ते झाल्यावर अकोला जिल्ह्यातील बाळापूर या मुस्लिम बहुल मतदारसंघात वाडेगांव येथील प्रचारसभेत सय्यद अझहरुद्दिन या तरुण, उच्चविद्याविभुषित कॉंग्रेस
पदाधिका-यास शरद पवार यांनी अभी तो मै जवान हुं या त्यांच्या वक्तव्याप्रमाणे ढोपर मारीत मागे ढकलले. शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्यासह फोटो निघेल म्हणून समोर आलेल्या या नगर परिषदेच्या स्विकृत सदस्यास त्यांनी आपल्या ढोपराने मागे ढकलले. याची चित्रफीत लगेच माध्यमांत पसरली. अजहरुद्दिन हे तरुण आहे. एखाद्या तरुण नेत्यास जेष्ठ नेता अशी वागणूक देतो आहे हे सुद्धा सुज्ञ मतदारांना रुचणारे नाही. याउलट शरद पवारांनी जर अझहरुद्दीन यांना जर पाठीवर हात ठेऊन स्वागताच्या त्या मोठ्या पुष्प्मालेत  घेतले असते तर शरद पवार यांची ती कृती मतदारांना अधिक भावली असती.फडणवीस यांच्या टीकेस उत्तर देताना त्यांनी पुन्हा “कुस्ती पहेलवानांशी होते या अशांशी होत नाही” हे म्हणताना सुद्धा हातवारे केले ते सुद्धा कॅमे-यात कैद झाले. एका कार्यकर्त्यास ढोपराने मागे ढकलणे, आक्षेपार्ह असे हातवारे करणे हे स्वत:ला तरुण म्हणवणा-या शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यास उचित दिसत नाही. लोकसभा निवडणूकीत पार्थ पवार यांनी उभे राहू नये अशी पवारांची मनीषा होती. परंतू ते उभेे राहीले व पडले. सतत सत्ता, सत्तेची फळे उपभोगत आल्यावर आता सत्तेपासून वंचित रहावे लागत आहे. सहकारी पक्ष सोडून गेले आहेत. कौटुंबिक कलह असल्याच्या चर्चा आहे. आगामी निवडणूकीत सुद्धा सत्ताप्राप्तीची चिन्हे दिसत नाही. पक्षात राष्ट्रीय पातळीवरचे ते एकटेच नेते आहे. पी. ए. संगमा निवर्तले ,तारिक अन्वर पुनश्च स्वगृही म्हणजे काँग्रेस मध्ये गेले. पवारांंवर गुन्हे दाखल झालेे, काका-पुतण्या दोघांनाही ईडी च्या नोटीस आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर पवार काहीशे हताश, निराश, हतबल झाले आहे. ख-या जाणत्या राजा सोबत प्राणपणाने , साथ देणारे निष्ठावंत मावळे होते. परंतू या जाणत्या राजा जवळचे निष्ठावंत , पुत्राप्रमाणे असल्याचे म्हणणारे मावळे मात्र राजास सोडून परांगदा झाले आहेत. त्यामुळे मी तरुण आहे म्हणत हा राजा युद्धास सामोरा जात आहे खरा परंतू राजा कडून एखाद्या गद्धे पंचविशीतील तरूणप्रमाणे घडणा-या हातवा-यांसारख्या कृतींमुळे “तेरी जवानी तौबा तौबा” असे कदाचित महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनतेला वाटत असावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा