Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/११/२०१९

All the best to new Allied Government of different ideology in Maharashtra

नवीन सरकारला शुभेच्छा 
काही का होवो ना जनतेला शुभेच्छा देणे क्रमप्राप्तच
आहे ना ! कारण शेवटी सरकारच गाडा हाकीत असते. कुण्या का पक्षाचे असो ना , सरकार यथायोग्य , सुरळीत , स्थिरतेने चालावे व सरकारच्या काळात विकास व्हावा हीच नागरीकांची अपेक्षा असते. महाराष्ट्रात येन केन प्रकारेण शेवटी सरकार तयार झाले. गेल्या महिन्याभरा पासून सत्ताप्राप्तीसाठी होत असलेला तमाशा महाराष्ट्राने व देशाने पहिला. विदेशी बाईचे नेतृत्व नाकारून नवीन पक्ष स्थापन करणा-या जाणत्या राजांनी पुढे राजकीय लाभासाठी पुनश्च त्याच विदेशी बाईचे नेतृत्व असलेल्या पक्षासोबत आघाडी बनवून सत्ता सुद्धा उपभोगली. याच बाईंवर  व त्यांच्या पक्षावर ज्यांनी सभिनय पुरेपूर टीका केली, आपल्या भाषणातून वेळोवेळी त्यांचावर जहरीली टीका केली. त्यांच्या पिढीने सुद्धा आता त्याच बाईंशी राजकीय सलगी केली आहे. कुणी याला राजकीय गरज म्हणेल , कुणी हुशारी म्हणेल , कुणी कमळाचा वारू रोखण्यासाठी केलेली तडजोड म्हणेल. “जाणत्या राजानी” , “हाताच्या पंजाचा” हुशारीने उपयोग करून “वाघाला” बरोबर पकडले आहे. परंतू हे सरकार तयार झाले , कार्यान्वीत झाले की कदाचित वाघाची घुसमट , धुसफूस सुरू होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. कर्ज माफी ,दहा रुपयात जेवण , सरकारी कर्ज , तिजोरीतील गंगाजळी सहकारी पक्षांना सांभाळून घेणे अशा कसरती तसेच काही निर्णयांमुळे वेळेवर उद्भवणा-या अडचणी यांचा सामना या सरकारला करावाच लागणार आहे. समन्वय समिती या सरकार मधे राहील अशी शक्यता आहे. किंबहुना ती ठेवावीच लागेल. गत सरकाच्या योजना, विकास कामे यांबाबत सरकार सकारात्मक राहीले तर या सरकारची विश्वासार्हता अधिक वाढेल. 
 या नवीनच व अनपेक्षित आघाडीमुळे जरी सत्ता मिळाली असली तरी विचारसरणीत प्रचंड तफावत असल्याने तिन्ही पक्षात निश्चितच काही कार्यकर्ते, नेते नाराज सुध्दा असतील. संजय निरूपम सारख्यांनी तसे बोलून सुध्दा दाखवले.  नवीन सरकारची तिहेरी  ही कसरत जनतेचे मनोरंजन करणारी सुध्दा असेल. कुमारस्वामी देवेगौडा यांच्या सारखी प्रचिती नव्या मुख्यमंत्र्यांना न येवो म्हणजे मिळवले. सरकार स्थिर राहो, पुनश्च निवडणूक घेण्याचे काम न पडता विनाकारण सरकारी पैसा खर्च न होवो, कर्मचा-यांवर पुनश्च निवडणूकांचा ताण न येवो, कर्जमाफी द्या परंतू या राज्यातील  सर्व क्षेत्रातील प्रामणिक करदाते व मध्यम वर्गाकडे सुध्दा लक्ष दया यासाठी नवीन सरकारला भव्य शपथविधीच्या अनुषंगाने शुभेच्छा.

२५/११/२०१९

राजकारण गेलं चुलीत, an article about Maharashtra political scenario after state election 2019

राजकारण गेलं चुलीत
     आत्माराम सावंत लिखित उपरोक्त शीर्षकाच्या कथेचे व निळू फुले , राम नगरकर , तद्नंतर कुलदीप पवार अभिनीत नाटकाची विशेषत: शीर्षकाची गत एक महिन्यापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी व शनिवारी सकाळी अचानक झालेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या राउतांच्या भाषेत रात्रीच्या काळोखात तर शेलारांच्या भाषेत रामप्रहरी झालेल्या शपथविधी नंतर प्रकर्षाने आठवण येत आहे. हे नाटक काही पाहण्यात आले नाही किंवा पुस्तक सुद्धा वाचले नाही. परंतू महाराष्ट्रात घडणा-या या राजकीय भूकंप म्हणा किंवा नाट्य म्हणा यामुळे चुलीत गेलं,चुलीत जा असे म्हणायला काही वाव राहिला नाही. कारण चुली तर आता राहिल्या नाहीत उज्वला योजनेमुळे कोट्यावधी महिला आता चुली ऐवजी गॅॅस वापरतात. परंतू तरीही हे राजकारणात जे काही घडते आहे ते सर्व चुलीत जावे असेच महाराष्ट्र वासीयांना वाटते आहे. "दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है" असे राजकीय पक्षांत , आघाड्यांत , युतीत चित्र आहे. शिवसेनेने बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्वाच्या शिवसेनेचे तत्व वळकटीला बांधून अगदी विरुद्ध विचारसरणीच्या पक्षांबरोबर घरोबा केला आहे. महाराष्ट्र वासीयांना शिवसेनेने हा मोठा धक्का दिला आहे. महाशिवआघाडीची महाविकासआघाडी झाली. शिव अर्थात छत्रपती शिवाजी राजांच्या नावाला दुर सारतांना एरवी शिवाजी महाराजांविषयी अपार प्रेम प्रकट करणा-या शिवसेनेला काहीही कसे वाटले नाही ! तसेच काकांना सोडून पुतण्या ज्यांनी काकांचे बोट धरून राजकारणाचे धडे घेतले आहे त्यांच्या छावणीत दाखल झाला आहे. राजकारणात त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणात हे जे काही घडते आहे ते प्रथमच घडते आहे.
सत्तेसाठी आसुसलेलेपण , लाभाच्या, मलाईदार खात्यांसाठी चालेली रस्सीखेच या सर्वांनी राजकारण्यांची प्रतिमा निश्चितच खराब झाली आहे. ज्यात भ्रष्टाचार करता येईल अशी खाती आपल्याकडे असावीत म्हणून मांडलेल्या तमाशाने जनतेसमोर आपले लोकप्रतिनिधी केवळ आणि केवळ स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी उघड- उघड "मलाईदार" म्हणजेच भ्रष्टाचार करता येईल अशा खात्यांंच्या वाटाघाटी करतांना यांना काहीच वाटत कसे नाही? तुम्हाला जनतेची सेवा करायची असे तर घ्या ना कोणतेही खाते. शेतक-यांचा मोठा कळवळा हे दाखवतात परंतू ज्याप्रमाणे वेळेप्रसंगी कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांना देतात तसे आमदार त्यांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांना देतांनाचे अभावानेच दिसते. सध्याच्या राज्यातील सत्तास्थापनेच्या चढाओढीत,आमदार फुटू नये म्हणून त्यांना हॉटेलात ठेवण्यावर करोडोंची उधळण होत आहे. येतो कुठून एवढा पैसा? शेतक-यांना मदतीच्या वेळी का नाही निघत हा पैसा? गेल्या काही दिवसात यांचे राजकारण पाहून जनता विस्मयचकीत, हैराण झाली आहे.एकीकडे  राजकारण गलिच्छ झाले असे म्हणायचे आणि करायचे मात्र तसेच. विरोधात बसू म्हणायचे आणि अभद्र आघाड्या करण्यात पुढाकार घ्यायचा.घोटाळ्यांत दोषींवर कारवाई करू असे म्हणायचे आणि त्या दोषींनाच सत्तेतील वाटेकरी बनवायचे. फाईल नस्ती करायच्या, वाघ म्हणवून घ्यायचे आणि सत्तेसाठी लाचार बनून याच्या, त्याच्या मागे फिरायाचे , जिभ काय सैल सोडायची. शेतक-यांच्या सेवेचा मोठा आव आणून त्यांना भेटी देण्याचा सपाटा लावायचा प्रत्यक्षात मदत मात्र काही नाही द्यायची. यांच्या दौ-यांमुळे शासकीय यंत्रणा किती वेठीस लागते याचा काही विचार नाही. अधिका-यांच्या बदल्यांंत ढवळाढवळ करणे स्वत:च्या खुर्च्या मात्र टिकवून ठेवणे.अशा यांच्या नाना त-हा आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात 24 ऑक्टोबर ला विधानसभा निवडणूक निकालांपासून राजकीय पक्ष,राजकारणी यांच्या सतत बदलणा-या भूमिका, वक्तव्ये , अभद्र आघाड्या, पक्षांना मतदारांनी दिलेल्या जनादेशाची अवहेलना असा राजकारणाचा हा तमाशा पाहून रोजंदारीवर जगणारे , बेरोजगार , सामान्य मतदार जे इमाने इतबारे मतदान करण्यास जातात यांना मात्र राजकारण गेले चुलीत असेच म्हणावेसे वाटत असेल. 

२१/११/२०१९

Meeting with Hon Bhide Guruji of Shiv Pratisthan, Sangali


एक अविस्मरणीय भेट

  मागील आठवडयात एका विवाहाच्या निमित्ताने सांगलीला जाणे झाले. कृष्णा नदीच्या काठी वसलेले पटवर्धनांचे सांगली हे एक जुने ऐतहासिक शहर. चिंतामणराव पटवर्धन हे सांगलीचे संस्थापक राजे. कृष्णा नदीचे घाट , त्यावरील मंदिरे , जुने वाडे , वास्तू हे सर्व सांगलीचे गतवैभव दर्शवितात. सांगलीचे सुप्रसिद्ध गणेश मंदीर व राजवाडा हे पहिल्या चिंतामणराव पटवर्धन यांचेच कार्य. सांगलीच्या ऐतिहासिक गणपती  मंदिरात सांगली व पटवर्धन राजे यांचा इतिहास दर्शवणारा एक फलक वाचनात आला. त्यावर पुढील माहिती नोंदवलेली आहे. इ.स. 1700 मध्ये पटवर्धन घराणे हे मराठा साम्राज्याचे एक आधारस्तंभ असे घराणे होते. हैदरअली व टिपू सुलतानचे यांचे विरुद्द पहिल्या चिंतामणरावांनी लढा दिला होता. परंतू तरीही त्यांनी सर्व धर्मातील लोकांना समान वागणूक दिली होती. नांद्रे येथील उरुसात सुद्धा ते उत्साहाने सहभागी होत असत. उर्दू भाषेचा सुद्धा ते सन्मान करीत. ते राज्यकारभार श्री गजाननाचे नावे करीत असत. ते कुशल प्रशासक होते. १८५५ या वर्षी त्यांनी सांगली येथे विदेशी धरतीचे हॉस्पिटल सुरु केले होते. सांगली पूर्वीही आणि अद्यापही एक मोठी बाजारपेठ आहे. हळद , ऊस हे मुख्य उत्पादन पूर्वीपासून आहे. सांगली संस्थानात १९३५ पासून म्हणजे दुस-या चिंतामणरावांच्या काळात विधानसभा अस्तित्वात होती. म्हणजेच भारताला स्वतंत्रता मिळण्याच्या आधीपासून सांगली संस्थानात लोकशाही
होती. हे वाचून आश्चर्य वाटले.  पटवर्धन घराणे आजही लोकोपयोगी कार्यात अग्रेसर आहे. अशा ऐतिहासिक शहरात प्रवेश करताच सांगली शहरातील एका थोर व ध्येयवेड्या व्यक्ती बद्दल विशेष उत्सुकता लागलेली होती. म्हणून चालकाला त्या व्यक्तीबाबत विचारणा केली. त्याने भेट होईल म्हणून आश्वस्त केले. त्यामुळे निश्चिंत झालो. तरीही एका तरुणाला पुनश्च विचारणा केली कारण इतक्या लांब येऊन त्या व्यक्तीचे दर्शन न घेणे म्हणजे आग्राल्या जाऊन ताजमहाल न पहाणे याप्रमाणेच झाले असते. त्या तरुणाने तुम्हाला ते सकाळी 6 वाजेच्या सुमारास विष्णू घाटावर हमखास भेटतील असे सांगितले. मी सकाळी विष्णू घाटावर गेलो. तरुणांचे सूर्य नमस्कार काढणे सुरु होते. संथ वाहणा-या कृष्णामाईचे दर्शन घेतले. थोड्याच वेळात 80-85 वर्षे वयाचे सदरा, धोतर घातलेले व एक पिशवी घेऊन ते सायकल वर आले. तेथील उपस्थित एकाने लगेच "ते आले भिडे गुरुजी" म्हणून सांगितले. ते जवळ आले त्यांचे दर्शन घेतले. पाठीशी अनादी काळापासून वाहणारी कृष्णा आणि समोर एक तपस्वी या दोहोंच्या आशीर्वादाच्या छत्राखाली असल्यासारखे वाटले. आम्ही ज्या विवाहासाठी गेलो होतो तेथील लोकांनी गुरूजींना विवाहास येण्याची विनंती केली होती.त्यामुळे गुरुजींशी ब-याच वेळ चर्चा झाली. त्यांचा व्यायाम, शिवप्रतिष्ठान, त्यांच्या नित्य बैठकी ,त्यांचे उपक्रम, ३२ मण सोन्याचे शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्या मुर्तीसह असलेले सिंहासन रायगडावर बसवण्याचे ध्येय, मोहिमा यांबाबत त्यांनी माहिती दिली. कदम नामक गुरुजींचा एक कार्यकर्ता भेटला. त्याने आजपावेतो ११ मोहिमांत सहभाग घेतला आहे. एका मोहिमेच्या वेळी गुरूजींना त्यांची बहीण 35 वर्षानंतर भेटली दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परंतू केवळ काही क्षण एकमेकांची विचारपूस केल्यानंतर दोघेही आपआपल्या मार्गांनी चालू लागले. एखादा पक्का ध्येयवादी पुरुषच असा सर्वसंगपरित्याग करू शकतो. मुली या भारतमातेचे प्रतीक आहेत त्यामुळे त्यांनी कपाळावर कुंकू लावले पाहिजे, परदेशात जाणा-या तरुणांनी आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी केले पाहिजे हे गुरुजींनी “जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा” या स्वातंत्रवीर सावरकरांच्या ओळी म्हणून सांगितले. तद्नंतर हळदीचे दूध प्राशन करून लोकासांठी, समाजासाठी झटणारे भिडे गुरुजी या आधुनिक ऋषींनी आमचा निरोप घेतला व एका महान व्यक्तीच्या भेटीच्या तृप्तीने कृतकृत्य होऊन, त्या अविस्मरणीय भेटीच्या आठवणींचा खजिना सोबत घेऊन आम्ही परतलो.

१०/११/२०१९

Article about Lal Krishna Advani openion after Ayodhya Verdict

“कृष्णा”ला रामाचा आशीर्वाद
      9 नोव्हेंबर 2019 भारतीय सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही मजबूत असल्याचे सिद्ध  करणारा  रामजन्मभूमी खटल्याचा ऐतिहासिक असा निकाल दिला. ओवैसी सारखे अपवाद वगळता तमाम भारतवासियांनी सुद्धा त्याचा स्विकार करून भारतातील लोकशाही व जनता ही आता प्रगल्भ असल्याचे उदाहरण जगासमोर प्रकट केले. नरेंद्र मोदी यांनी सर्वांच्या विकासाची ग्वाही वेळोवेळी दिल्याने जनतेचा विश्वास बळावला आहे. आता धार्मिक वा जातीय तणाव निर्माण होईल असे काही करण्यापेक्षा सलोखा कसा राहील शांती कशी राहील याचा जनता किंबहुना तरुणाई करतांना दिसून येत आहे. या निकालानंतर अनेक तरुणांच्या प्रतिक्रिया याच स्वरूपाच्या आहेत. 9 नोव्हेंबर याच दिवशी पूर्व व पश्चिम जर्मनीला वेगळे करणारी भिंत सुद्धा पाडल्या गेली होती याच दिवशी कर्तारपूर कॉरीडॉर सुरु होणे व अयोध्या निकाल लागणे हे निश्चितच आशादायी आहे. रामजन्मभूमी हा भारतीय जनतेच्या आस्थेचा विषय आहे. बाबराने रामाच्या मंदिराच्या ठिकाणी मस्जिद बांधली त्यानंतर हा वाद निर्माण झाला होता व शेकडो वर्षांपासून हा वाद व या वादाची झळ भारतीय नागरीकांनी सोसली. “आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना” या प्रमाणे भारतवासी राम अयोध्येत येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते व तो “सोनियाचा दिनु” काल उगवला. 1528 मध्ये मस्जिद बांधल्यानंतर अनेकदा हिंदू मुस्लिम वाद झाले. तद्नंतर इंग्रजांनी या वादास आणखी खतपाणी घातले.

हा वाद 1990 च्या दशकापर्यंत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली आणि रामजन्मभूमी आंदोलन व्यापक झाले. भाजपाला त्याचा राजकीय फायदा सुद्धा झाला. काल निकाल आल्या नंतर अनेक नेत्यांनी, सेलीब्रेटींनी या निकालाबाबत ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या सुद्धा सुयोग्य, संतुलीत अशा प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी रामजन्मभूमी मुद्द्याचा आता भाजपाला राजकीय फायदा घेता येणार नाही हे म्हटले. तसा त्याचा उपयोग इतरही पक्ष करू शकणार नाही. शाही इमाम बुखारी यांनी सुद्धा “जास्त ताणून धरू नका” असे आवाहन केले. याच सर्व प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया आली ती म्हणजे ज्यांनी रामजन्मभूमी आंदोलनास व्यापक प्रमाणात सुरवात केली त्या लालकृष्ण अडवाणी यांची. अडवाणी यांनी “आज मी निश्चिंत झालो अयोध्या निकाल हा माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणे आहे. स्वातंत्र्य चळवळी नंतरच्या सर्वात मोठ्या जनआंदोलनात माझे नम्र योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. सर्वानी मतभेद , जातीयवाद विसरून शांतता स्वीकारावी” असे म्हटले. लालकृष्ण अडवाणी यांच्या रामजन्मभूमी आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर अनेक घटना घडल्या कारसेवा, 1992 चे आंदोलन , खटले , अलाहाबाद कोर्टाचे निकाल , बाळासाहेबांचे विधान , कल्याणसिंग  नरसिंहराव यांच्या भूमिका या घटना देशाने अनुभवल्या. या प्रकरणी अशोक सिंघल यांचे सुद्धा स्मरण जनतेस झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी केलेले विहिंपचे नेतृत्व सुद्धा अविस्मरणीय राहील. अयोध्या प्रकरणात पुरातत्व विभागाने केलेले संशोधन सुद्धा कामी आले आहे. के के मोहम्मद यांनी केलेले संशोधन या प्रकरणी फायद्याचे ठरले आहे. त्यांनी “आज मी धन्य झालो” अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. या निकालानंतर आलेली लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया ही सर्वात बोलकी अशी प्रतिक्रिया आहे व या निकालाचा सर्वाधिक समाधान ज्या व्यक्तीस होईल अशा कर्मयोग्याची ती प्रतिक्रिया आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखर हा ऐतिहासिक वादग्रस्त जागी राम मंदिर होण्याचा निकाल त्यांच्यासाठी आशीर्वादाप्रमाणेच आहे. त्यामुळे या लाल”कृष्णास” प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळाला असेच वाटते आहे. 

०९/११/२०१९

Article about Lake overflow... Power of Prayer...


जय बाबा बर्फानी ... तालाबमे भर दे पानी 


प्रार्थनेचे नाना प्रकार असतात. आपली मागणी आपल्या पंथानुसार असलेल्या परंपरेप्रमाणे लोक ईश्वराकडे करीत असतात. हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन, शीख, पारसी, बौद्ध , जैन सर्वांचे आप-आपले असे प्रार्थनेचे प्रकार आहेत. क्वचित प्रसंगी या प्रकारात कमी अधिक प्रमाणात आप-आपल्या सोयीनुसार बदल सुद्धा होत असतात. प्रार्थना सुद्धा बदलत असतात किंवा त्यांची नवीन रचना सुद्धा केली जाते , काव्ये केली जातात. ख-या मनाने प्रार्थना करणा-यास सुद्धा एखाद्या प्रसंगी प्रार्थनेच्या स्वरूपात एखादे काव्य , एखादी ओळ स्फुरते आणि मग तीच त्याची दैनंदिन प्रार्थना बनते. प्रार्थना , प्रार्थनेच्या त-हा , प्रार्थनेतील शक्ती , त्यातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा या सर्वाचे स्मरण मनात त्या दिवशी घोळू लागले जेंव्हा मी , माझे मित्रव्दय धनंजय टाले व रितेश काळे जनुना तलावावर पोहायला म्हणून गेलो. मे महिन्यात कोरड्या ठन्न तलावातून निराश मनाने पायी फिरतांना तलाव आता पुन्हा पूर्ण भरेल की नाही ? अशी शंका मनात आली होती. परंतू 31 ऑक्टोबरला जनुना तलावाच्या बागेत प्रेवेश केल्यावर डाव्या बाजू कडून सांडव्यातून पाणी वहातांना पाहिल्यावर अत्यानंद झाला. तलावाच्या भिंतीच्या पाय-यांकडे झपाझप पाऊले पडू लागली. तलावाच्या भिंतीवर गेलो आणि ज्यात आम्ही वर्षभर जल विहार करतो तो तलाव पुनश्च तुडूंब भरलेला पाहून मनी हर्ष दाटला आणि क्षणात आम्ही पोहण्यासाठी झेपावलो. रोटरी क्लबने गाळ काढल्यामुळे साठवण क्षमता वाढलेल्या
तलावातील नितळ , थंड पाण्याने आमचा सारा क्षीण , सारा थकवा घालवला. पाणी कापू लागलो. निम्मा तलाव केंव्हा कापल्या गेला काही समजले सुद्धा नाही. परत काठाकडे फिरलो.  तिथे बाराही महिने पोहणारे पनपालिया , प्रसाद सानंदा , भाटीया , सुभाषभाऊ सदावर्ते इ. आमचे मित्र सुद्धा पोहून पोहोचले होते. त्यांनी प्रार्थनेसाठी म्हणून आवाज दिला. त्यांच्या समवेत सूर्याला अर्घ्य दिले आणि तदनंतर लेखाच्या शीर्षकातील “जय बाबा बर्फानी तालाबमे भरदे पानी” या ओळी म्हटल्या. मला ही प्रार्थना ज्ञात होती. परंतू माझ्या मित्रव्दयांना मात्र त्या ओळी नवीन होत्या त्यामुळे त्यांनी त्या माझ्या कडून पुन्हा जाणून घेतल्या. तद्नंतर आमची प्रार्थना,प्रार्थनेतील शक्ती या विषयावर वर म्हटल्या प्रमाणे चर्चा झाली. ईश्वर, तो आहे किंवा नाही, नास्तिक-आस्तिक, ईश्वराकडे केलेली प्रार्थना सफल होते की नाही ? या बाबत बोलत आम्ही चालत आलो. शेवटी प्रार्थनेत शक्ती असल्याचे आम्हा तिघांचेही एकमत झाले. आपल्या जटेवर गंगेचा भार घेऊन नंतर त्या गंगा मातेच्या धारा धरतीवर सोडणा-या शंकराकडे, अमरनाथ बाबा अर्थात बाबा बर्फानी कडे ...तालाब में भरदे पानी अशी प्रार्थना तलावात वर्षभर पोहणारी आमची मित्र मंडळी करीत असतात. यंदाच्या कडक उन्हाळ्यात आटलेला हा जनुना तलाव पाण्याने तुडूंब भरलेला पाहून तलावातील पाण्याचा व्यक्तीश: आम्हा पोहणा-या मंडळींना पोहण्या व्यतिरिक्त काही फायदा नाही. खामगांवकरांना सुद्धा तलावातील पाण्याचा यत्किंचीतही फायदा होत नाही. तरीही आपले गांव जल समृद्ध असावे यासाठी जनुना तलाव सदैव पाण्याने भरलेला राहावा म्हणून ख-या मनाने ते करीत असलेली प्रार्थना ऐकून कुठेतरी प्रार्थनेत शक्ती असल्याचे आम्हाला वाटले. त्यामुळेच पुनश्च एकदा बाबा बर्फ़ानीचे त्याच प्रार्थनेत “जय बाबा बर्फानी तालाबमे भर दिया पानी“ असा बदल करून आभार मानले. यंदा पाऊस भरपूर झाला परंतू पाऊस होण्यामागे , जलसाठे पूर्ण भरण्यामागे कदाचित सर्वानी केलेली प्रार्थना सुद्धा असेल. व या नित्य प्रार्थनेची शक्तीने तुडूंब भरलेल्या तलावा पाहून त्यात जल विहाराचा आनंद घेऊन आनंदाने तृप्त मनाने आम्ही परतलो.

०७/११/२०१९

Law should be more hard for peacock hunters

मोरांना मारणा-यांची गय नको 
मोर आपला राष्ट्रीय पक्षी , सुंदर , मनमोहक. कुणासही दिसला की बघतच राहावेसे वाटते. याच्या सौंदर्यामुळे अनेक कवींना काव्य स्फुरले. “नाच रे मोरा “ , “बाई,बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला” , “जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा” असे एकापेक्षा एक सरस काव्य कवींना स्फुरले . मोराची मादी अर्थात लांडोर मोराच्या तुलनेत कमीच सुदंर परंतू मोराप्रमाणे तिच्यावर सुद्धा “मोरनी मोरनी मै जंगल की मोरनी” अशी काव्ये रचली गेलीच. मोर हा माझाही आवडता पक्षी . कारण बालपण मोरांच्याच सोबतीत व्यतीत झाले. आजोबा, वडील , काका सर्वांनाच पक्षी, प्राण्यांची आवड. 1990 च्या दशकापूर्वी पशु-पक्षी पाळण्यावर सरकारी निर्बंध नव्हते. त्यामुळे आमच्या घरी अंगणात एक भला मोठा मोरांना त्याच्या पिसा-यासहीत वावरता येईल असा पिंजरा होता व त्यात अगदी बालपणापासून मी मोर , लांडोर पहिले होते. ससे ,हरीण सुद्धा अंगणात बागडत असत. मोर घरी असल्याने त्याचे सौदर्य खूप जवळून पाहिले आहे. त्याचा रंग त्याची पिसे, त्याची गडद निळ्या रंगाची लांब मान, डोळ्यांच्या बाजूला पंढरी कडा, कथिया रंगाचे पंख, तुरा लांब पाय, मोराचे पाय सुंदर मोराला शोभावे असे नसतात. त्यामुळेच साळुंकी पक्षी व मोर यांच्या पाय अदला-बदलाची एक फँटसी सारखी कथा सुद्धा लहानपणी आजी सांगत असे. परंतू सौंदर्याला काही ना काही अभिशाप हा असतोच. मोराची सुंदरता हा त्याचा अभिशाप ठरत आहे. भारतात राजस्थानात मोराला मान आहे, अभय आहे त्यामुळे मोर तेथे मुक्त विहार करतात. परंतू भारतात इतरत्र मात्र मोराच्या शिकारी होतात आणि मोराच्या शिकारीचे प्रमाण सुद्धा वाढतेच आहे. काल बुलडाणा जिल्ह्यात मोहज या गावी मोर मारणा-यांना वन विभागाने पकडले. त्यांनी मोरांची शिकार केली याचे
भक्कम पुरावे वनविभागाला आढळले. मोराचे शिजलेले मांस सुद्धा वन विभागाने जप्त केले. इतका सुंदर पक्षी मारून यांना खावा तरी कसा वाटतो? मोर त्याच्या सुंदर पिसांसाठी सुद्धा मारला जातो. मोराच्या या शिकारी रोखण्यासाठी सरकारने अधिक कठोर कायदे निर्माण केलेच पाहिजे. तसेच राष्ट्रीय पक्षी व राष्ट्रीय प्राणी मारणा-यास तर अधिक कठोर शिक्षा असावी. जेणे करून कुणी शिकार करण्यास धजावणारच नाही. तसेच वनविभागाने जंगला लगतच्या व इतरही शाळांत विद्यार्थ्यांना वन्यजीव व वने ही आपल्याला कशी उपयुक्त असतात याचे प्रोजेक्टर शो आयोजित करावे जेणे करून विद्यार्थ्यांना बाल्यावस्थेपासूनच पशु , पक्षांविषयी लळा निर्माण होईल व तरुणपणी त्यांची पाउले शिकारीकडे वळणार नाहीत. पुण्या जवळील “मोराची चिंचोली” या गावाप्रमाणे प्रत्येक जंगला लगतच्या गावातील नागरीकांनी मोर या आपल्या राष्ट्रीय पक्षाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्विकारणे जरुरी आहे. वन विभागाने सुद्धा अत्यंत दक्ष असणे जरुरी आहे. “वुक्ष वल्ली आम्हा सोयरे , वनचरे पक्षीही आळविती सुस्वरे” संतांनी वन्यजीव , वने ही आपली सोयरे असल्याचे उगीचच का म्हटले आहे. आपल्या देशात वाघासारख्या मोठ्या प्राण्यांच्याच संवर्धनच्या चर्चा होतात. परंतू अनेक लहान पशु पक्षी सुद्धा धोक्यात आहेत. आज रान ससे,तितर,बटर,टोयी (एक प्रकारचा लहान पोपट), यांसारखे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोर सुद्धा त्या यादीत न येवो. म्हणूनच वन्यजीवांच्या शिकारी करणा-यांची मुळीच गय नको.