Click "Follow" Button below To Follow this Blog

२१/११/२०१९

Meeting with Hon Bhide Guruji of Shiv Pratisthan, Sangali


एक अविस्मरणीय भेट

  मागील आठवडयात एका विवाहाच्या निमित्ताने सांगलीला जाणे झाले. कृष्णा नदीच्या काठी वसलेले पटवर्धनांचे सांगली हे एक जुने ऐतहासिक शहर. चिंतामणराव पटवर्धन हे सांगलीचे संस्थापक राजे. कृष्णा नदीचे घाट , त्यावरील मंदिरे , जुने वाडे , वास्तू हे सर्व सांगलीचे गतवैभव दर्शवितात. सांगलीचे सुप्रसिद्ध गणेश मंदीर व राजवाडा हे पहिल्या चिंतामणराव पटवर्धन यांचेच कार्य. सांगलीच्या ऐतिहासिक गणपती  मंदिरात सांगली व पटवर्धन राजे यांचा इतिहास दर्शवणारा एक फलक वाचनात आला. त्यावर पुढील माहिती नोंदवलेली आहे. इ.स. 1700 मध्ये पटवर्धन घराणे हे मराठा साम्राज्याचे एक आधारस्तंभ असे घराणे होते. हैदरअली व टिपू सुलतानचे यांचे विरुद्द पहिल्या चिंतामणरावांनी लढा दिला होता. परंतू तरीही त्यांनी सर्व धर्मातील लोकांना समान वागणूक दिली होती. नांद्रे येथील उरुसात सुद्धा ते उत्साहाने सहभागी होत असत. उर्दू भाषेचा सुद्धा ते सन्मान करीत. ते राज्यकारभार श्री गजाननाचे नावे करीत असत. ते कुशल प्रशासक होते. १८५५ या वर्षी त्यांनी सांगली येथे विदेशी धरतीचे हॉस्पिटल सुरु केले होते. सांगली पूर्वीही आणि अद्यापही एक मोठी बाजारपेठ आहे. हळद , ऊस हे मुख्य उत्पादन पूर्वीपासून आहे. सांगली संस्थानात १९३५ पासून म्हणजे दुस-या चिंतामणरावांच्या काळात विधानसभा अस्तित्वात होती. म्हणजेच भारताला स्वतंत्रता मिळण्याच्या आधीपासून सांगली संस्थानात लोकशाही
होती. हे वाचून आश्चर्य वाटले.  पटवर्धन घराणे आजही लोकोपयोगी कार्यात अग्रेसर आहे. अशा ऐतिहासिक शहरात प्रवेश करताच सांगली शहरातील एका थोर व ध्येयवेड्या व्यक्ती बद्दल विशेष उत्सुकता लागलेली होती. म्हणून चालकाला त्या व्यक्तीबाबत विचारणा केली. त्याने भेट होईल म्हणून आश्वस्त केले. त्यामुळे निश्चिंत झालो. तरीही एका तरुणाला पुनश्च विचारणा केली कारण इतक्या लांब येऊन त्या व्यक्तीचे दर्शन न घेणे म्हणजे आग्राल्या जाऊन ताजमहाल न पहाणे याप्रमाणेच झाले असते. त्या तरुणाने तुम्हाला ते सकाळी 6 वाजेच्या सुमारास विष्णू घाटावर हमखास भेटतील असे सांगितले. मी सकाळी विष्णू घाटावर गेलो. तरुणांचे सूर्य नमस्कार काढणे सुरु होते. संथ वाहणा-या कृष्णामाईचे दर्शन घेतले. थोड्याच वेळात 80-85 वर्षे वयाचे सदरा, धोतर घातलेले व एक पिशवी घेऊन ते सायकल वर आले. तेथील उपस्थित एकाने लगेच "ते आले भिडे गुरुजी" म्हणून सांगितले. ते जवळ आले त्यांचे दर्शन घेतले. पाठीशी अनादी काळापासून वाहणारी कृष्णा आणि समोर एक तपस्वी या दोहोंच्या आशीर्वादाच्या छत्राखाली असल्यासारखे वाटले. आम्ही ज्या विवाहासाठी गेलो होतो तेथील लोकांनी गुरूजींना विवाहास येण्याची विनंती केली होती.त्यामुळे गुरुजींशी ब-याच वेळ चर्चा झाली. त्यांचा व्यायाम, शिवप्रतिष्ठान, त्यांच्या नित्य बैठकी ,त्यांचे उपक्रम, ३२ मण सोन्याचे शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्या मुर्तीसह असलेले सिंहासन रायगडावर बसवण्याचे ध्येय, मोहिमा यांबाबत त्यांनी माहिती दिली. कदम नामक गुरुजींचा एक कार्यकर्ता भेटला. त्याने आजपावेतो ११ मोहिमांत सहभाग घेतला आहे. एका मोहिमेच्या वेळी गुरूजींना त्यांची बहीण 35 वर्षानंतर भेटली दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परंतू केवळ काही क्षण एकमेकांची विचारपूस केल्यानंतर दोघेही आपआपल्या मार्गांनी चालू लागले. एखादा पक्का ध्येयवादी पुरुषच असा सर्वसंगपरित्याग करू शकतो. मुली या भारतमातेचे प्रतीक आहेत त्यामुळे त्यांनी कपाळावर कुंकू लावले पाहिजे, परदेशात जाणा-या तरुणांनी आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी केले पाहिजे हे गुरुजींनी “जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा” या स्वातंत्रवीर सावरकरांच्या ओळी म्हणून सांगितले. तद्नंतर हळदीचे दूध प्राशन करून लोकासांठी, समाजासाठी झटणारे भिडे गुरुजी या आधुनिक ऋषींनी आमचा निरोप घेतला व एका महान व्यक्तीच्या भेटीच्या तृप्तीने कृतकृत्य होऊन, त्या अविस्मरणीय भेटीच्या आठवणींचा खजिना सोबत घेऊन आम्ही परतलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा