मोरांना मारणा-यांची गय नको
मोर आपला राष्ट्रीय पक्षी , सुंदर , मनमोहक. कुणासही दिसला की
बघतच राहावेसे वाटते. याच्या सौंदर्यामुळे अनेक कवींना काव्य स्फुरले. “नाच रे मोरा “
, “बाई,बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला” , “जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा” असे एकापेक्षा
एक सरस काव्य कवींना स्फुरले . मोराची मादी अर्थात लांडोर मोराच्या तुलनेत कमीच सुदंर
परंतू मोराप्रमाणे तिच्यावर सुद्धा “मोरनी मोरनी मै जंगल की मोरनी” अशी काव्ये रचली
गेलीच. मोर हा माझाही आवडता पक्षी . कारण बालपण मोरांच्याच सोबतीत व्यतीत झाले.
आजोबा, वडील , काका सर्वांनाच पक्षी, प्राण्यांची आवड. 1990 च्या दशकापूर्वी पशु-पक्षी
पाळण्यावर सरकारी निर्बंध नव्हते. त्यामुळे आमच्या घरी अंगणात एक भला मोठा मोरांना
त्याच्या पिसा-यासहीत वावरता येईल असा पिंजरा होता व त्यात अगदी बालपणापासून मी मोर
, लांडोर पहिले होते. ससे ,हरीण सुद्धा अंगणात बागडत असत. मोर घरी असल्याने त्याचे
सौदर्य खूप जवळून पाहिले आहे. त्याचा रंग त्याची पिसे, त्याची गडद निळ्या रंगाची लांब
मान, डोळ्यांच्या बाजूला पंढरी कडा, कथिया रंगाचे पंख, तुरा लांब पाय, मोराचे पाय सुंदर मोराला शोभावे असे नसतात.
त्यामुळेच साळुंकी पक्षी व मोर यांच्या पाय अदला-बदलाची एक फँटसी सारखी कथा सुद्धा
लहानपणी आजी सांगत असे. परंतू सौंदर्याला काही ना काही अभिशाप हा असतोच. मोराची सुंदरता
हा त्याचा अभिशाप ठरत आहे. भारतात राजस्थानात मोराला मान आहे, अभय आहे त्यामुळे मोर तेथे
मुक्त विहार करतात. परंतू भारतात इतरत्र मात्र मोराच्या शिकारी होतात आणि मोराच्या शिकारीचे प्रमाण सुद्धा वाढतेच आहे. काल बुलडाणा जिल्ह्यात मोहज या गावी मोर मारणा-यांना
वन विभागाने पकडले. त्यांनी मोरांची शिकार केली याचे
भक्कम पुरावे वनविभागाला आढळले. मोराचे शिजलेले मांस सुद्धा
वन विभागाने जप्त केले. इतका सुंदर पक्षी मारून यांना खावा तरी कसा वाटतो? मोर त्याच्या
सुंदर पिसांसाठी सुद्धा मारला जातो. मोराच्या या शिकारी रोखण्यासाठी सरकारने अधिक कठोर
कायदे निर्माण केलेच पाहिजे. तसेच राष्ट्रीय पक्षी व राष्ट्रीय प्राणी मारणा-यास तर
अधिक कठोर शिक्षा असावी. जेणे करून कुणी शिकार करण्यास धजावणारच नाही. तसेच वनविभागाने
जंगला लगतच्या व इतरही शाळांत विद्यार्थ्यांना वन्यजीव व वने ही आपल्याला कशी उपयुक्त
असतात याचे प्रोजेक्टर शो आयोजित करावे जेणे करून विद्यार्थ्यांना बाल्यावस्थेपासूनच
पशु , पक्षांविषयी लळा निर्माण होईल व तरुणपणी त्यांची पाउले शिकारीकडे वळणार नाहीत. पुण्या जवळील “मोराची चिंचोली” या गावाप्रमाणे प्रत्येक
जंगला लगतच्या गावातील नागरीकांनी मोर या आपल्या राष्ट्रीय पक्षाचे रक्षण करण्याची
जबाबदारी स्विकारणे जरुरी आहे. वन विभागाने सुद्धा अत्यंत दक्ष असणे जरुरी आहे. “वुक्ष
वल्ली आम्हा सोयरे , वनचरे पक्षीही आळविती सुस्वरे” संतांनी वन्यजीव , वने ही आपली
सोयरे असल्याचे उगीचच का म्हटले आहे. आपल्या देशात वाघासारख्या मोठ्या
प्राण्यांच्याच संवर्धनच्या चर्चा होतात. परंतू अनेक लहान
पशु पक्षी सुद्धा धोक्यात आहेत. आज रान ससे,तितर,बटर,टोयी (एक प्रकारचा लहान पोपट),
यांसारखे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोर सुद्धा त्या यादीत न येवो. म्हणूनच
वन्यजीवांच्या शिकारी करणा-यांची मुळीच गय नको.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा