“कृष्णा”ला रामाचा आशीर्वाद
9 नोव्हेंबर 2019 भारतीय सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही मजबूत असल्याचे सिद्ध करणारा रामजन्मभूमी खटल्याचा ऐतिहासिक असा निकाल
दिला. ओवैसी सारखे अपवाद वगळता तमाम भारतवासियांनी सुद्धा त्याचा स्विकार करून
भारतातील लोकशाही व जनता ही आता प्रगल्भ असल्याचे उदाहरण जगासमोर प्रकट केले.
नरेंद्र मोदी यांनी सर्वांच्या विकासाची ग्वाही वेळोवेळी दिल्याने जनतेचा विश्वास
बळावला आहे. आता धार्मिक वा जातीय तणाव निर्माण होईल असे काही करण्यापेक्षा सलोखा
कसा राहील शांती कशी राहील याचा जनता किंबहुना तरुणाई करतांना दिसून येत आहे. या
निकालानंतर अनेक तरुणांच्या प्रतिक्रिया याच स्वरूपाच्या आहेत. 9 नोव्हेंबर याच
दिवशी पूर्व व पश्चिम जर्मनीला वेगळे करणारी भिंत सुद्धा पाडल्या गेली होती याच
दिवशी कर्तारपूर कॉरीडॉर सुरु होणे व अयोध्या निकाल लागणे हे निश्चितच आशादायी
आहे. रामजन्मभूमी हा भारतीय जनतेच्या आस्थेचा विषय आहे. बाबराने रामाच्या
मंदिराच्या ठिकाणी मस्जिद बांधली त्यानंतर हा
वाद निर्माण झाला होता व शेकडो वर्षांपासून हा वाद व या वादाची झळ भारतीय
नागरीकांनी सोसली. “आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना” या प्रमाणे भारतवासी
राम अयोध्येत येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते व तो “सोनियाचा दिनु” काल
उगवला. 1528 मध्ये मस्जिद बांधल्यानंतर अनेकदा हिंदू मुस्लिम वाद झाले. तद्नंतर
इंग्रजांनी या वादास आणखी खतपाणी घातले.
हा वाद 1990 च्या दशकापर्यंत
आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी
सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली आणि रामजन्मभूमी आंदोलन व्यापक झाले. भाजपाला
त्याचा राजकीय फायदा सुद्धा झाला. काल निकाल आल्या नंतर अनेक नेत्यांनी,
सेलीब्रेटींनी या निकालाबाबत ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या सुद्धा सुयोग्य,
संतुलीत अशा प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी रामजन्मभूमी
मुद्द्याचा आता भाजपाला राजकीय फायदा घेता येणार नाही हे म्हटले. तसा त्याचा उपयोग
इतरही पक्ष करू शकणार नाही. शाही इमाम बुखारी यांनी सुद्धा “जास्त ताणून धरू नका”
असे आवाहन केले. याच सर्व प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया आली ती म्हणजे ज्यांनी
रामजन्मभूमी आंदोलनास व्यापक प्रमाणात सुरवात केली त्या लालकृष्ण अडवाणी यांची.
अडवाणी यांनी “आज मी निश्चिंत झालो अयोध्या निकाल हा माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणे
आहे. स्वातंत्र्य चळवळी नंतरच्या सर्वात मोठ्या जनआंदोलनात माझे नम्र योगदान
देण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. सर्वानी मतभेद , जातीयवाद विसरून
शांतता स्वीकारावी” असे म्हटले. लालकृष्ण अडवाणी यांच्या रामजन्मभूमी आंदोलनाला
मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर अनेक घटना घडल्या कारसेवा, 1992 चे
आंदोलन , खटले , अलाहाबाद कोर्टाचे निकाल , बाळासाहेबांचे विधान , कल्याणसिंग नरसिंहराव यांच्या भूमिका या घटना देशाने
अनुभवल्या. या प्रकरणी अशोक सिंघल यांचे सुद्धा स्मरण जनतेस झाल्याशिवाय राहणार
नाही त्यांनी केलेले विहिंपचे नेतृत्व सुद्धा अविस्मरणीय राहील. अयोध्या प्रकरणात पुरातत्व
विभागाने केलेले संशोधन सुद्धा कामी आले आहे. के के मोहम्मद यांनी केलेले संशोधन या
प्रकरणी फायद्याचे ठरले आहे. त्यांनी “आज मी धन्य झालो” अशी बोलकी प्रतिक्रिया दिली.
या निकालानंतर आलेली लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया ही सर्वात बोलकी अशी
प्रतिक्रिया आहे व या निकालाचा सर्वाधिक समाधान ज्या व्यक्तीस होईल अशा
कर्मयोग्याची ती प्रतिक्रिया आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखर हा ऐतिहासिक
वादग्रस्त जागी राम मंदिर होण्याचा निकाल त्यांच्यासाठी आशीर्वादाप्रमाणेच आहे. त्यामुळे
या लाल”कृष्णास” प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळाला असेच वाटते आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा