हे
सुद्धा एक व्यंगच
महाराष्ट्रात सध्या हे काय सुरु आहे ? कंगना राणावतच्या व्टीट वरून मुंबई मनपाने तीच्या घराची तोडफोड केली. शरद पवारांनी घरचा आहेर दिल्यावर नेहमीच तो-याच्या आविर्भावात बोलणारे संजय राऊत
यांना उपरती सुचली व आता कंगना प्रकरण संपले आहे असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा
एकेरी उल्लेख केल्याने सुद्धा सेनेत संतापाची भावना होती. कंगना प्रकरण होत नाही
तोच शिवसैनिकांनी कांदिवली येथील माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली. मदन
शर्मा यांचा गुन्हा काय होता ? तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र समाज माध्यमांवर
प्रसारीत केले. झाले शिवसैनिकांना कळताच त्यांनी मदन शर्मा यांना मारहाण केली. हि
घटना निंदनीय आहे. शिवाय आश्चर्यचकीत करणारी सुद्धा आहे. ज्या शिवसेनेचा पाया हा
व्यंगचित्र आहे त्याच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या व्यंगचित्राने शिवसैनिकांना
एवढा राग येतो ! बाळासाहेब ठाकरे हे प्रख्यात व्यंगचित्रकार होते. तत्कालीन सरकार,
राजकारणी यांच्यावर आपल्या व्यंगचित्राव्दारे बाळासाहेबांनी प्रचंड टीका केली. मार्मिक
मधून व्यंगचित्रांव्दारे त्यांनी अनेकांचा समाचार घेतला. या नेत्यात शरद पवार
सुद्धा होते. बाळासाहेब राजकारणी तर होतेच शिवाय कलाप्रेमी,खेळप्रेमी होते.
कलावंतांचा त्यांनी नेहमीच सन्मान केला. त्यांनी केलेली टीका व त्यांच्यावरील टीकेचा
सहज स्विकार होत असे किंवा त्या टीकेला प्रत्युत्तर सुद्धा एखाद्या चांगल्या कोटीने होत असे. जुन्या पिढीतील नेत्यांकडून नवीन नेते व कार्यकर्त्यानी हे शिकणे
आवश्यक आहे. कुण्या नेत्यावर व्यंगचित्र , लेख याव्दारे टीका होत असेल तर कार्यकर्त्यानी क्रोधाला आवर घालणे
आवश्यक आहे. कोणताही पक्ष हा संवैधानिक मार्गाने निवडून आलेला असतो तेंव्हा सत्तेत
आल्यावर त्या पक्षाने व त्या अनुषंगाने संविधानाचा आदर ठेवत , सनदशीर मार्गाने
आंदोलन , निषेध व्यक्त करणे ही जनतेची अपेक्षा असते. परंतू अनेक पक्षाच्या
कार्यकर्त्यानी मारहाण , तोडफोड करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. “शार्ली
हेब्दो“ मधून व्यंगचित्र काढल्याने फ्रान्स मध्ये अतिरेकी हल्ला सुद्धा झाला होता.
कांदिवली येथील निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी केवळ व्यंगचित्र फॉरवर्ड
केल्याने त्यांना अशाप्रकारे मारहाण करणे हे सत्तेत असणा-या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून
अपेक्षित नाही. टिकेतून शिकायचे असते . अनेक पूर्वीचे नेते हे टीकेतून शिकत असत . काही सांप्रतकालीन नेते हे टीकेतून शिकत असतात, सकारात्मकता पाहत असतात. कुणी टीका केली
की फोड त्याचे घर , कुणी व्यंगचित्र काढले का दे त्याला दणके . असे होत असेल तर ते
अत्यंत निंदनीय आहे व सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभेसे नाही. विरोधी पक्षनेते यांनी
समाज माध्यमांवर त्यांच्यावर व त्यांच्या सुविद्य पत्नीवर झालेल्या मोठ्या टीकेला पचवले व पचवत आहे दुर्लक्ष
करीत आहे. परंतू हे सर्वांना जमणे शक्य नसते तरीही संयम ठेवणे अत्यंत जरुरी आहे.
शर्मा यांनी काढलेले व्यंगचित्र एवढे आक्षेपार्ह आहे का ? असले तरी त्याला मारहाण
हे उत्तर आहे का ? सरकारची कुणी निंदा , सरकारवर कुणी टीका करीत असेल तर त्यातून
बोध घेणे आवश्यक आहे. ज्या संतांचे , थोरपुरुषांचे जी शिवसेना सतत गोडवे गात असते ,
त्यांच्याप्रती सन्मान प्रकट करीत असते त्याच संतांची “निंदकाचे घर असावे शेजारी “
ही संतोक्ती शिवसेना का विसरते ? मुख्यमंत्री उद्धवजी आहेत तो-यात मात्र दुसरेच वावरत असतात. कित्येक वर्षे विरोधी पक्षात असणा-या शिवसेनेचे मनोहर जोशी , नारायण राणे यांच्या नंतर आता खुद्द ठाकरे परिवारातील मुख्यमंत्री आहे तेंव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी तोडफोड , मारहाण याऐवजी संयम दाखवणे ,विकास करून दाखवणे हे अत्यावश्यक आहे, तसे न करता दुस-याचे अनधिकृत बांधकाम पाडणारी परंतू स्वत:च्याच लोकांचे अनधिकृत बांधकामे असणारी, हिंदुत्वाला न सोडणारी परंतू सत्तेसाठी सोयीस्कररित्या ते बाजूला सारणा-या शिवसेनेची वागणूक हे सुद्धा एक व्यंगच नाही का
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा