महाराष्ट्रातील जनतेला आता स्वत:च सावधान होण्याची वेळ
आहे. महाराष्ट्रातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 38 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
जो इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. कोविड केंद्र उघडण्यात आली परंतू त्या
केंद्रांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नाशिक मध्ये चक्क नकली कोविड
केंद्र असल्याचे उघडकीस आले. वापरलेले हातमोजे पुन्हा विक्री करणारे रॅकेट पकडल्या
गेले. कोरोना पेशंट मृत पावल्या नंतर त्याचा मृतदेह काही दिवसांनंतर न्हाणीघरात आढळून
आला तो पर्यंत तो पेशंट कुठे आहे याचा कुणाला काही थांगपत्ता नव्हता. अनेक विलगीत करण्यात आलेल्या रुग्णांना 14 दिवस पूर्ण होण्याआधीच सुट्टी देण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरील मुद्द्यांसह भ्रष्टाचार,
पुरग्रस्तांकडे दुर्लक्ष , केंद्र सरकारने दिलेला कोरोनासाठीच्या निधीचा योग्य विनियोग न होणे, मजुरांवर
ओढवलेली बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधले. परंतू तरीही उद्धव
सरकार काही करेल की नाही? हा प्रश्नच आहे. कारण राज्य सरकारचे शिलेदार सध्या कंगना
राणावत व सुशांत सिंग राजपूत, शौविक , दिशा , अध्ययन यावरच टीव-टीव (व्टीट) करण्यात
अतिशय व्यस्त आहेत. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी का केली ? ते नक्कीच चुकीचे आहेच परंतू तिला तसे का म्हणावेसे वाटले याचा सुद्धा विचार व्हावा. मुंबईला येऊ देणार नाही असे
भारतातील नागरिकाला कुणी कसे काय म्हणू शकते ? मुंबई बेट हे ब्रिटनच्या राजाला पोर्तुगीजांकडून
त्याच्या लग्नात आंदणात दिले होते तुम्हाला नाही संजयजी ! आणि आज जे शहर जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही असलेल्या
भारत देशातील एक शहर आहे कुणाची खाजगी मालमत्ता नाही. राज्यावर कोणते संकट आहे ,
नैसर्गिक आपत्ती आहे , बेरोजगारी , शिक्षण या सर्व समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी सरकार मात्र कंगना , सुशांत यासारख्या मुद्द्यांवर व्यस्त आहे. राज्य सरकारवर कुणी टीका केली
की लागा त्याच्या मागे. कंगना बोलली तर संजय राउत , विजय वडेट्टीवार , अनिल देशमुख
सर्वानी कंगना विरोधी सूर आळवणे सुरु केले , पत्रकाराने अपमान केल्याच्या नावाखाली अन्वय नाईक याच्या मृत्यूची फाईल उघडणार
( या फाईल बंदच कशा होतात ? , का आरोपी मिळेतो व त्याला शिक्षा होईतो पूर्ण चौकशी होत
नाही ?) , प्रथम कंगनाच्या घराची चौकशी मुंबई मनपाने केली आणि काल तिचे बांद्रा येथील पाली हिल भागातील बंगल्यावर बुलडोझर फिरवला , अनधिकृत बांधकाम पाडले. उच्च न्यायालयाच्या आदेशापुर्वी बरीचशी तोडफोड झाली होती. आभासी सुनावणी झाली ( अशाच आभासी सुनावण्या जन सामान्यांच्या प्रलंबित केसेस सोडवण्यात सुद्धा घेण्यात याव्या व न्यायालयीन कामकाजास गती देण्यात यावी ) कंगनाने घर घेतले , त्याचा व्यावसायिक
उपयोग ती करू लागली , तिने त्यात बेकायदेशीर बांधकाम केले तोवर मनपा काय करीत होती ? आता कंगनाने सुशांतच्या मृत्यूचे , अंमली पदार्थ माफियांच्या विरोधात बोलणे सुरु केल्यावरच
तीच्या घराची चौकशी करण्याचे , बांधकाम पाडण्याचे लक्षात आले का ? आता मनपाने मुंबईतील सर्वच अनधिकृत बांधकामांची चौकशी सुद्धा करावी यात मनपा सदस्यांच्या निवासस्थानांची सुद्धा चौकशी व्हावी. कायद्यासमोर सर्व समान आहेत कुणाचेही बांधकाम अनधिकृत आढळले तर ते मुंबई मनपा पाडण्याचे धैर्य दाखवेल का ? राज्यात
कोरोना मुळे लोक मरत आहेत,खाजगी इस्पितळांची लक्षावधी रुपयांची बिले भरीत आहेत. सरकारी रुग्णालये , विलगीकरण केंद्रे तेथील जेवण या सर्वांची दुरावस्था आहे आणि राज्य सरकार एका महिलेशी भांडण करीत बसले आहे, तिचे घर पाडण्यात धन्यता मानीत आहे. महाराष्ट्रातील माध्यमे सुद्धा जनतेचे प्रश्न , समस्या या बातम्या न दाखवता हत्या , आत्महत्या यांसारख्या त्याच-त्याच बातम्यांचे च्युइंग गम जनतेला खाऊ घालीत आहेत. महाराष्ट्र वासियांना कोरोना महामारीबाबत स्वत:च सजग राहणे अत्यावश्यक आहे कारण राज्यातील सत्ताधारी कोरोना महामारी , पूरग्रस्त ,बेरोजगारी या संकटांकडे लक्ष देण्या ऐवजी कंगना सारख्या विषयांमध्ये व्यस्त आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा