भेट “दक्षिण भारताच्या दरवाजा”ची
"पुर्वी “दख्खन का दरवाजा” म्हणून प्रसिध्द असलेला आसिरगढ व इतर पुरातन वास्तू सुद्धा कुणास ठाऊक कुणाच्या शापाने आपले गतवैभव हरवून केवळ भग्नावशेशरूपाने उभ्या आहेत. अश्वत्थामाच्या जखमेला तरी कुणी तेल देत असेल परंतू या प्राचीन वास्तूंना त्यांच्या तोडफोडीमुळे झालेल्या जखमांना डागडुजीरुपी तेल देण्यास शासनाला वेळ नाही त्याउपर त्यांना आणखी भग्न करून , क्षती पोहचवून त्या जखमा पूर्वीपेक्षा अधिक चिघळवणारी बेशिस्त तरुणाई या देशात आहे. इतिहासाची साक्ष देणा-या या पुरातन वास्तूंना असेच अश्वत्थामाप्रमाणे चिरकाल आपली जखम बरी होण्याच्या प्रतिक्षेत राहावे लागेल काय ?"
भारतात पाहण्यासारखे खुप काही आहे. परंतू कुठे पर्यटनास जायचे असल्यास जाण्यासाठी म्हणुन नेमके ठिकाण आठवतच नाही. बरेचदा आपल्या जवळच्या एखाद्या प्राचीन , ऐतिहासिक स्थळाचा आपणास विसर पडून आपण इतर ठिकाणी पर्यटनास जातो आणि जवळचे ठिकाण राहून जाते. यंदाच्या दिवाळीत सहकुटुंब कुठे जावे हा प्रश्न पडला असता महाभारतात ज्याचा अश्वत्थामागिरी म्हणून उल्लेख आहे त्या आसिरगढ किल्ल्याचे एकदम स्मरण झाले.
'अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥'
या सप्त चिरंजीवांपैकी एक असा द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा याच ठिकाणी नित्यनेमाने शंकराच्या पुजेसाठी येत असलेल्याचे बोलले जात असलेल्या किल्ल्याबाबत कुटुंबियांना सांगितले सर्वानी “शिक्का मोहरतब” केले आणि 23 नोव्हें 2020 रोजी सकाळीच आसिरगढ किल्ल्याकडे निघालो. हा किल्ला खामगांव-इंदोर या मार्गावर ब-हाणपूरच्या पुढे 15-20 किमी अंतरावर आहे. खामगांवहून हा किल्ला पहायला जायचे असल्यास मलकापूर व जळगांव-जामोद मार्गे जाता येते. जळगांव जामोद मार्गे गेल्यास घाटातील निसर्ग सौंदर्य अनुभवता येते. आम्ही याच दुस-या मार्गास पसंती दिली व मार्गक्रमण सुरु केले. सातपुडा पर्वताच्या रांगांतून मोटारीतून सुखाने जात असतांना याच पर्वतरांगा ओलांडून अहमदशहा अब्दाली या परकीय आक्रमकास रोखण्यासाठी म्हणून पानिपतच्या लढाईसाठी आपल्या बाजार बुणग्यांसह निघालेल्या सदाशिवरावभाऊ पेशवे व त्यांच्या सैन्यास किती त्रास सहन करावा लागला असेल हा विचार मनात येत होता. भल्यामोठ्या त्या सातपुड्याच्या चढावरून हत्ती , तोफा नेण्यास भाऊंच्या सैन्याची मोठी दमछाक झाली होती. याच विचारात मग्न असतांना मोटारीने घाट पार केला. आम्ही मध्यप्रदेश या भारताच्या मध्यभागातील निसर्गाने समृद्ध असलेल्या राज्यात दाखल झालो. एका ठिकाणी चहापान केल्यावर थोड्याच वेळात ऐतिहासिक काळातील मोठी व्यापारपेठ असलेल्या व संभाजी राजांनी दोनवेळा लुटलेल्या ब-हाणपूरच्या वेशीवर दाखल झालो. हातमाग, सोने इ अनेक वस्तूंचा व्यापार करण्यास देश विदेशातील व्यापारी ज्या गावात येत असत त्या गावातून आमची मोटार जात होती. रस्त्याच्या शेजारी असलेली परकोटाची भली मोठी भिंत ब-हाणपूरच्या गतवैभवाची साक्ष देत होती. ब-हाणपूर येथेही प्रेक्षणीय अशी अनेक ठिकाणे आहेत परंतू आमचे प्रथम प्राधान्य हे आसिरगढ किल्ल्यास होते. ब-हाणपूर सोडल्यावर थोड्याच वेळात भव्य असा आसिरगढ आमच्या दृष्टीस पडला. या किल्ल्याच्या जवळच नेपानगर हे कागदाच्या कारखान्यासाठी वसलेले निसर्गसमृद्ध गांव आहे. त्या वळणावर नेेेपानगर येथील काही मित्रांचे स्मरण झाले. एव्हाना आमची मोटार किल्ल्याचा रस्ता चढू लागली होती. बिकट वाट पार करून आमची मोटार किल्ल्यावर पोहोचली. किल्ल्याची माहिती देणारा फलक दिसला व समोर पायरस्त्याने येेण्याचे किल्ल्याचे प्रवेशव्दार दिसते. थोड्या पाय-या चढल्यावर अरुंद वाट असलेला मुख्य दरवाजा आहे व पाय-या चढतांना उजव्या बाजूने प्राचीन शिलालेख तसेच नवीन फलक आहेत. मुख्य दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा नकाशा आपल्याला दिसतो. डाव्या बाजूने किल्ल्यात गेल्यास एका महालाचे भग्नावशेष दिसतात. पुढे एक मस्जिद आहे. तेथून पुढे भला मोठा तलाव , व त्यापुढे गेल्यावर एक शिव मंदिर आहे , मंदिरात जाताच नंदीची सुबक मुर्ती लक्ष वेधून घेते, सूर्याची किरणे पिंडीवर पडतील अशी रचना असलेले हेच ते चिरंजीव अश्वत्थामा पुजेसाठी येत असलेले मंदिर आहे. याच मंदिरात दररोज भल्या पहाटे अश्वत्थामा शंकराच्या पिंडीवर पुष्प अर्पण करून जात असल्याचे मानले जाते. कितीही लवकर किल्ल्यावर गेलो तरी पुजा झालेली असते. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने सुद्धा याबाबत “स्टोरी” दिली आहे. येेथे महाकाय अशा पुरुषाच्या दर्शनाने बेशुद्ध झालेल्या लोकांच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात. या मंदिरात नतमस्तक होऊन आम्ही पुढे गेलो. थोड्या अंतरावर इंग्रजांनी बांधलेल्या तुरुंगाचे अवशेष आहेत. या तुरुंगात अनेक क्रांतिकारकांना कैद केले होते ज्यांचे नांव सुद्धा आता आपल्याला ज्ञात नाही. तीन स्तरात असलेल्या या किल्ल्याकडे पर्यटन विभाग व पुरातत्व विभाग यांचे दुर्लक्ष आहे. अनेक शिलालेख विद्रुप केले आहेत, स्वत:ची नांवे कोरलेली आहेत, पडझड झालेली आहे ती पाहून वाईट वाटले. चर्च व इंग्रजांच्या कबरी सुद्धा येथे आहेत. परकोट आसिरगढ, कमरगढ व मलयगढ असे या किल्ल्याचे तीन स्तर आहेत. तीन तासांनी किल्ल्या बाहेर आलो, मोटारीत बसलो. परतीचा प्रवास सुरु झाला. नित्यनेमाने पुजा , सकाळ संध्याकाळ संध्या करणारे , नामस्मरण करणारे माझे आजोबा एकदा भल्या पहाटेच या किल्ल्यावर अश्वत्थामाचे दर्शन व्हावे या आशेने गेल्याचे त्यांनीच मला सांगितल्याचे स्मरण झाले. ते पोहोचल्यावर पुजा झालेली होती. आज तो किल्ला पाहिल्यावर समाधान वाटत होते. पांडव कुळाचा नाश व्हावा म्हणून अभिमन्यू पत्नी उत्तरा हीच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडणा-या अश्वत्थामाच्या कपाळावर जन्मता:च असलेला मणी भगवान श्रीकृष्णाने त्यास दंड म्हणून काढून घेतला आणि "तू आपली जखम घेऊन मरणाची प्रतीक्षा करीत फिरत राहशील" असा शाप दिला होता. अश्वत्थामा जसा त्याच्या कपाळावरील जखम घेऊन मण्याच्या वैभवाच्या आठवणीत जखमेसाठी तेल मागत फिरत आहे त्याचप्रमाणे भारतातील पूर्वी “दख्खन का दरवाजा” म्हणून प्रसिध्द असलेला आसिरगढ व इतर पुरातन वास्तू सुद्धा कुणास ठाऊक कुणाच्या शापाने आपले गतवैभव हरवून केवळ भग्नावशेशरूपाने उभ्या आहेत. अश्वत्थामाच्या जखमेला तरी कुणी तेल देत असेल परंतू या प्राचीन वास्तूंना त्यांच्या तोडफोडीमुळे झालेल्या जखमांना डागडुजीरुपी तेल देण्यास शासनाला वेळ नाही त्याउपर त्यांना आणखी भग्न करून , क्षती पोहचवून त्या जखमा पूर्वीपेक्षा अधिक चिघळवणारी बेशिस्त तरुणाई या देशात आहे. इतिहासाची साक्ष देणा-या या पुरातन वास्तूंना असेच अश्वत्थामाप्रमाणे चिरकाल आपली जखम बरी होण्याच्या प्रतिक्षेत राहावे लागेल काय? असा प्रश्न परतीच्या प्रवासात मनात घोळत होता.