वेडयांच्या विश्वात - भाग 4
बावरी
आपल्या 7 अर्भकांना मारल्यावरही भगवंताच्या मातेने, देवकीने ते अपार दु:ख पचवले, मनाचा समतोल ढळू दिला नव्हता. या बावरीला मात्र असे काय झाले होते की तिचा मानसिक तोल ढासळला होता. बावरीच्या अशा दशेला कुणी कारणीभुत असेल का ? असल्यास तो कसा असेल , त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले असेल की नाही ? दूर का असेना परंतू त्या महाभारतातील देवकीला तिच्या श्यामचा आधार वाटत होता. या बावरीचा कुणी श्याम होता की नव्हता हे मात्र कधी कळले नाही.
👉मागील भागापासून पुढे...
परवा संध्याकाळी नांवात श्याम हे कृष्णाचे नाव असलेल्या एका रस्त्याने जात होतो. या रस्त्याने आता जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती झाल्या आहेत काही होत आहेत. घरी परततांना जुन्या इमारती आठवल्या व त्याच अनुषंगाने बावरी पण आठवली. महादू हा वेडा इसम होता त्याच काळात बावरी ही पागल स्त्री सुद्धा याच भागात फिरत असे. या बावरीला पाहिल्यावर मात्र मला वाटायचे की ही बावरी अशी का ? लुगडे नेसलेली बावरी गावात फिरत असे. महादू कुणाशी बोलत नसे पण बावरी मात्र लोकांशी बोलत असे. बालपणी मी एकदा माझ्या मित्राच्या दुकानात गेलो होतो, कित्येकदा मी तिथे जात असे. याच दुकानासमोर बावरी मला सर्वप्रथम दिसल्याचे स्मरते. बावरी कुणाला तरी चहा मागत होती. चहाला पैसे दिले किंवा नाही दिले तरी बावरी त्यावर काही प्रतिक्रिया देत नसे. फक्त हसून निघून जात असे. गावातील मध्यवस्तीत बावरी फिरायची. बावरी वरून लोक एकमेकांची थट्टा मस्करी सुद्धा करीत असत. पण ते बावरीला काय ठाऊक. बावरी आपल्याच धुन मध्ये आपल्या लुगड्याच्या पदराशी चाळा करीत निघून जात असे. आमच्या एका मित्राचा जेष्ठ बंधू ढेकर देतांना “ए बावरी” असा आवाज काढत असे व त्याचे ते ढेकरातून बावरी अशा केलेल्या उच्चारणामुळे एकच हशा पिकत असे. हा गमतीचा भाग झाला. पण बावरी कुठून आली होती , कोण होती , ती वेडी का झाली याबाबत कुणाला काही ठाऊक नव्हते ,
मै वैसी नही जैसी बतायी गयी हूं |
मै बावरी नही , बावरी बनायी गयी हूं|
या उपरोक्त पंक्तींप्रमाणे तिच्या वेडेपणास कुणी कारणीभूत असेल का ? पण या सर्व बाबींचा कुणी कशाला विचार करेल. कोणी काही खायला प्यायला दिलेल्या अन्नावर बावरीची गुजराण होत असे. बावरी कधी चिडलेली, कुणाच्या अंगावर धाऊन गेलेली दिसली नाही. ज्या गांवात बावरी राहायची ते गांव पुर्वी खुप लहान होते त्यामुळे बावरीला सर्वच ओळखत. बावरीला मात्र सर्व लोक सारखेच वाटत असावेत. बावरी कधी काळाच्या पडद्याआड गेली कुणाला कळले सुद्धा नाही. तिच्या असण्या- नसण्याने कुणाला काय फरक पडणार होता ? या लेखमालिकेच्या निमित्ताने मला या वेड्या लोकांचे स्मरण होत आहे नाहीतर मी पण त्यांना विसरलोच होतो. धकाधकीच्या जीवनात मनुष्य काय काय म्हणून लक्षात ठेवेल ? पण तरीही वेळप्रसंगी त्याला अनेक गोष्टींची आठवण होतच असते. म्हणूनच त्या दिवशी लॉकडाऊन मध्ये शाळेजवळ पाहिलेल्या त्या वेड्या तरुणामुळे मला हे इतर वेडे एकापाठोपाठ एक असे आठवत आहेत. मी त्यांच्या आठवणी झर-झर टाईप करत काही वेड्यांना जसे बंधनात टाकतात तसे मी या वेड्या व्यक्तींच्या आठवणींना शब्द बंधनात अडकवू लागलो. ही वेडया लोकांविषयीची मालिका वाचकांना कितपत रुचेल असाही विचार आला खरा. पण तरीही याच विषयावर लिहिण्याची अंत:प्रेरणा मात्र मला झाली म्हणून मी लिहिता झालो. आपण वेड्यांसाठी काही करू शकत नाही निदान काही लेखन तरी करू जेणे करून त्यांच्याप्रतीची जाणीव, संवेदना, भावना त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण यांबाबत काही प्रमाणात जागृती होईल अशी आशा कुठेतरी वाटली.
बावरी जन्मत: बावरी होती की नंतर झाली होती कोण जाणे ? भगवंताच्या भावंडाना जन्म झाल्याबरोबर कंसाने ठार मारले होते. आपल्या 7 अर्भकांना मारल्यावरही भगवंतमाता देवकीने ते दु:ख पचवले, मनाचा समतोल ढळू दिला नव्हता , अपार दु:ख पचवले होते. या बावरीला मात्र असे काय झाले होते की तिचा मानसिक तोल ढासळला होता. बावरीच्या अशा दशेला कुणी कारणीभुत असेल का ? असल्यास तो कसा असेल , त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले असेल की नाही ? दूर का असेना परंतू त्या महाभारतातील देवकीला तिच्या श्यामचा आधार वाटत होता. या बावरीचा कुणी श्याम होता की नव्हता हे मात्र कधीच कळले नाही पण योगायोगाने नांवात श्याम हे नांव असलेला मार्ग मात्र तिला राहण्यासाठी म्हणून होता व अनेक लोकांच्या रूपातून श्यामच खाऊ-पिऊ घालत होता.
क्रमश:
👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे.
या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन.
Khup changala upkram likhañ pan mast
उत्तर द्याहटवा🙂🙏
उत्तर द्याहटवा