वेडयांच्या विश्वात - भाग 2
काही आठवणी
कुणीतरी कॅसेट बदलवली रफीच्या आवाजातील मधुर गीते वाजू लागली. टेपरेकॉर्डरवरून रफीच्या आर्त , करुण आवाजातील “खि लौsss नाsss जानकर तुम तो" या ओळी ऐकू आल्या. खिलौना चित्रपटात वेडया माणसाची भूमिका वठवणारा हरहुन्नरी अभिनेता संजीवकुमार खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून गीत गात असलेले दृश्य डोळ्यासमोर तरळू लागले. नुकतेच त्या वेडयांच्या इस्पितळात पाहिलेले अनेक वेडे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले.
मागील भागापासून पुढे
ठाण्याच्या वेडयांच्या इस्पितळातील कर्मचारी निवास्थानात केलेला मुक्काम , मुंबई दर्शन , जीवाची मुंबई करून आम्ही गच्छंतीस निघालो. प्रवासात मुंबईच्या आठवणी , गप्पा सुरु होत्या. तेंव्हा चार चाकी गाडयांत ऑडीओ कॅसेट प्ले होणारा कार टेप असे त्यात रेडिओ नव्हता व एफ एम बँड सुरु झाले नव्हते. कुणीतरी कॅसेट बदलवली रफीच्या आवाजातील मधुर गीते वाजू लागली. गाडीने वेग पकडला होता. सर्व पेंगू लागले होते. मला प्रवासात क्वचितच झोप लागते त्यामुळे मी बाहेरील दृश्ये न्याहाळत होतो. खिडकीचा प्रश्नच नव्हता, कमांडर जिपला दरवाजे नसत पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून मेनकापडाचे गुंडाळून ठेवता येतील असे दरवाजे असत त्यामुळे हवेशीर वाटत असे. आता तसे दरवाजे अॅटोरिक्षाला असतात. टेपरेकॉर्डरवरून रफीच्या आर्त , करुण आवाजातील “खि लौsss नाsss जानकर तुम तो" या ओळी ऐकू आल्या. खिलौना चित्रपटात वेडया माणसाची भूमिका वठवणारा हरहुन्नरी अभिनेता संजीवकुमार खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून गीत गात असलेले दृश्य डोळ्यासमोर तरळू लागले. नुकतेच त्या वेडयांच्या इस्पितळात पाहिलेले अनेक वेडे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. आम्ही मुक्काम केलेले निवासस्थान व आत्याचे निवासस्थान यात 100-200 पावलांचे अंतर होते व या रस्त्याने जातांना अनेक वेडे दिसत होते. कुणाची भेदक नजर, कुणी शुन्यात नजर लावून बसलेले, कुणी स्वत:शीच बडबडत असलेले, कुणी मोठ्याने ओरडणारे राठ मोकळे केस सोडलेली मांडीवरील गाठोड्याला बाळाप्रमाणे थोपटणारी , त्याच्याकडे पाहून हसणारी वेडी स्त्री , कुणी येणा-या-जाणा-यांकडे पाहून हसत होते व निरर्थक बडबडत होते. मध्येच एक जण येऊन आम्हाला नमस्कार करून गेला. आम्हाला आश्चर्य वाटले "तो पण वेडा आहे , पण हिंसक नाही. म्हणून आम्ही त्याला मोकळेच ठेवले आहे" आत्या म्हणाली. प्रथम दर्शनी त्याला कुणीही पाहिले तर कुणालाही तो वेडा न वाटावा असाच दिसत होता.
ही सर्व दृश्ये त्या परतीच्या प्रवासात माझ्या डोळ्यासमोर आली होती. कुणी वेडे का होत असावे ? मेंदूवर असा काय बरे परीणाम होत असावा की एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती पार कोलमडून जावी. असे नाना प्रश्न त्यावेळी माझ्या मनात निर्माण झाले होते. परंतू या प्रश्नांची उत्तरे मात्र माझ्याकडे नव्हती व नंतर ती शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. पुढे जीवनाच्या रहाटगाडग्यात त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा विसर पडून गेला. तो मुंबई प्रवास , ठाण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात एक रात्र केलेला मुक्काम या गोष्टी इतक्या वर्षानंतर परत स्मरण होण्यास शाळेजवळ दोन महिन्यांपुर्वी दिसलेला तो वेडा तरुण कारणीभूत होता. त्या दिवशी दिसलेला तो तरुण व त्यामुळे आठवलेला खुप वर्षांपूर्वी ठाण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात एक दिवस केलेला मुक्काम या दोन घटनांनामुळे मला वेडे , वेड्यांचे इस्पितळ , त्यांची हालत, रस्त्यावर फिरणारे वेडे व त्यांना आणखी वेडे करणारे काही शहाणे लोक व मुले , वेड्यांसाठी कार्य करणा-या काही संस्था , वेड्यांसाठी सेवाभावाने कार्य करणारे डॉक्टर्स हे सर्व आठवले. शाळे समोरून तो तरुण गेल्यावर मी या काही आठवणींच्या जाळ्यातून बाहेर आलो, शाळेतून घरी परत येतांना मला माझ्या जीवनात मी पाहिलेली जी मनोरुग्ण, वेडी माणसे होती त्यांचे एकापाठोपाठ एक असे स्मरण होत होते. आगामी काहीं लेखात मी तसेच अनेकांनी पाहिलेल्या या व्यक्तींबाबत येईलच.
क्रमश:
👉या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन.
Chhan mahiti
उत्तर द्याहटवा👌👌👍चांगले लिहिलेस
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा