खामगांवची खाद्य संस्कृती भाग-4
स्वादिष्ट रबडी
...रबडीचा शोध कसा लागला ? बासुंदी आणि रबडी यातील फरक काय ? रबडीची पाळेमुळे शोधू गेल्यास फार मागे जावे लागेल. खामगावात मात्र 1955 पासून मिळत असलेली स्वादिष्ट रबडी ही 66 वर्षांपासून एकमेवाद्वितीय अशी आहे...
मागील भागापासून पुढे...
मागील लेख हा अंबिका हॉटेलच्या पेढ्याविषयी होता तो लिहितांना खामगांवात पुर्वी खुप प्रसिद्ध असलेल्या रबडीची सुद्धा आठवण होत होती. एक दिवस विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. थोडे ढग जमा झाले व वा-याचा वेग जराही वाढला की आपल्याकडे सर्वात प्रथम काय होत असले तर ते म्हणजे विद्युत पुरवठा बंद होणे व तसेच यावेळी झाले होते. मुलांना करमत नव्हते म्हणून बाहेर फिरायला घेऊन गेलो , थेट फरशीवर गेलो व गुप्ता यांच्या हॉटेल मध्ये तीन दुध ऑर्डर केले. मुलांना खुप आवडले. “येथील रबडी सुध्दा खुप चांगली असते” मी म्हणालो. दुध गरम असल्याने मुले निवांतपणे पीत होती आणि मला गतकाळ आठवत होता. पायजामा , कुर्ता, काळी टोपी घातलेले आजोबा व त्यांच्यासह नातवंडे पायी पायीच जात असल्याचे दृश्य गरम दुधाच्या पेल्यातील वाफेच्या आडून माझ्या नेत्र पटलावर तरळू लागले. दुध व दुग्धजन्य रबडी या पदार्थामुळे तसेच बालपणापासून पहात असलेल्या व बाकडे, दरवाजा, कपाटे, हौद इ. अगदी वर्षानुवर्षे जसेच्या तसेच असलेल्या त्या हॉटेलमुळे माझ्या आजोबांची आठवण मला येत होती. आजोबा नानासाहेब वरणगांवकर वैद्य व परवानाधारक शिकारी सुद्धा होते. त्यांना जलंब परिसरातील लोक नाना शास्त्री म्हणून ओळखत. वैद्य असल्याने आहाराबाबत ते दक्ष असत. त्यांचा आहार खुप संतुलित व सुयोग्य असा होता. चहाची चवच त्यांना माहित नव्हती. ते दुध घेत असत. कित्येकदा ते आम्हाला याच गुप्तांजींच्या हॉटेल मध्ये दुध पिण्यास नेत असत. या स्मृती विश्वात मी पुरता गुंतलो होतो. “चला बाबा” हा मुलांचा आवाज मला त्यातून बाहेर काढण्यास निमित्त झाला व मी पुन्हा वर्तमानात आलो. घरी परतलो. घरी आल्यावर निजतांना दुध व रबडीच्या आठवणी येतच होत्या. रबडी बाबतीतील एका गीताचा गमतीशीर प्रसंग सुद्धा आठवला “तेरे जियो नइयो लबड़ी” अशा ओळीचे अमिताभ परवीन बाबीवर चित्रित एक गीत त्याकाळी खुप गाजले होते. “तेरे जियो नइयो लबड़ी ” या ओळी मला "तेरे बिन मै रबडी" अशाच ऐकू यायच्या व रबडी हा खाद्य पदार्थ या गाण्यात कसा काय आला ? असा प्रश्न पडायचा. त्या ओळीचा अर्थ पुढे समजला खाण्याच्या रबडीशी त्याचा काहीही एक संबंध नव्हता. “तेरे जियो नइयो लबड़ी ” या पंजाबी ओळीचा अर्थ होतो "तुझ्या शिवाय जीव लागत नाही" बालवयात जीव लागत नाही वगैरे काय कळणार ? तेंव्हा खाणे, पिणे , झोपणे , खेळणे हेच माहित असते. त्यामुळेच मग त्या गाण्यातील लबडी हा शब्द अगदी काही दिवस अगोदरपर्यंत रबडी असाच ऐकू यायचा. ही शब्दांची गंमत, हे फिल्मी गीतपुराण फक्त रबडी व लबडी या शब्दांतील लहानपणी झालेल्या गोंधळामुळे सांगावेसे वाटले. दुस-या दिवशी या जुन्या स्मृतीतून निघून फरशी वरील गुप्ता यांच्या हॉटेल मधील रबडी बाबत लिहू लागलो.
गुप्ता यांचे फरशी वरील हे हॉटेल आजही ग्राहक सेवेत आहे. 1955 पासून असलेले हे एक खामगांव शहरातील जुने हॉटेल आहे. फरशी म्हणजे खामगांव शहरातील मध्यवर्ती ठिकाण. जुन्या काळात नदीवर फरशांचा अथवा फरशीवजा असा छोटा पुल असे. या भागातून बोर्डी नदी वाहते (आता नाला) त्यावर असा फरशीवजा पुल होता असे सांगितले जाते व म्हणून हा भाग फरशी याच नावाने ओळखला जाऊ लागला असावा. याच भागात म्हणजे शिवाजी वेस कडे जातांना पुलाच्या अगदी समोर हे गुप्ताजींचे हॉटेल आहे. गुप्ता यांचे एक बंधू होते भगवान गुप्ता. यांचे सुद्धा शाळा क्र 6 जवळ तृप्ती हॉटेल होते. तृप्ती हॉटेल मध्ये दही खूप चांगले मिळत असे. रबडीसाठी मात्र फरशी वरील गुप्ताच प्रसिद्ध.
रबडी हा पदार्थ कधी बनला , त्याचा शोध कसा लागला? बासुंदी आणि रबडी यातील फरक काय? अशी रबडीची पाळेमुळे शोधू गेल्यास फार मागे जावे लागेल. मोहेंजोदडो व हडप्पा संस्कृतीत बैलाचे चित्र/खेळणे सापडले होते. त्याअर्थी गाय सुद्धा पाळीव असेलच व तीचे दुध सुद्धा उपयोगात आणले जात असेल म्हणजे दुग्धजन्य पदार्थ बनवणे त्याकाळात मानवाला ज्ञात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खामगावातील गुप्ता यांची रबडी मात्र 1955 मध्ये सुरु झाली, 66 वर्षांपासून खामगांवकर तीची चव चाखत आहेत. ही रबडी आपल्याला घरी आणायची असेल तर एक दिवस आधी जाऊन ऑर्डर द्यावी लागते तरच रबडी मिळते. ऐन वेळेवर गेल्यास उपलब्ध नसते. खामगांवातील अनेक हॉटेल मध्ये सुद्धा ही गुप्ताजींचीच रबडी मागवली जाते. अशी ही खामगांवातील लोकप्रिय रबडी आहे. स्वभावत:च मला खाद्य पदार्थ कसे बनवायचे त्याची रेसिपी यापेक्षा ते खाण्यातच अधिक रस आहे परंतू रबडी ही बासुंदीपेक्षाही अधिक घट्ट व सायीची I mean दुधाच्या सायीची बनवतात. दुधाच्या सायीची असे लिहावे लागले कारण ग्रामिण भागात सायीची/सायीचा असे म्हटले की निराळाच अर्थ होतो. तर रबडी ही दुधाच्या सायीची बनलेली असते. मंद आचेवर दुध दीर्घकाळ आटवले की रबडी बनते. कुणास ठाऊक का परंतू आताच्या पिझ्झा, बर्गर, मोमोज खाणाऱ्या पिढीला दुध हे पौष्टिक जरी असले तरी दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची आवड कमी आहे. दुध तरी आता पुर्वीसारखे कुठे आहे? लोकांनी नकली दुध बनवण्यासाठी रासायनिक सूत्र शोधून काढले आहे. जनतेच्या जिविताशी खेळणा-या भेसळखोरांच्या युगात अस्सल पदार्थ व त्यांची चव लुप्त होत चालली आहे. फरशी वरील गुप्ताजी यांची रबडी मात्र आजही तीची पुर्वीची चव टिकवून आहे. गुप्ता यांच्या हॉटेल मधील घट्ट व सायीचे गोळे असलेली स्वादिष्ट रबडी डबा उघडून वाटीत टाकेतो tempting feel आणून देते व त्या मधुर रबडीचा आस्वाद घेतल्यावर तृप्तीचा ढेकर येतो परंतू खाणा-याची स्थिती मात्र "पेट तो भर गया लेकीन मन नही भरा" अशी हमखास होते. एव्हाना माझे लिखाण संपले होते. "अहो, चहा घेताय ना ?" सौ.चा आवाज आला. "नाही दुध", चहाचा भोक्ता असलेला मी दुध, रबडी या उहापोहामुळे दुध घेतो असे आपसूकच म्हणालो. इतके पदार्थ, हॉटेल आज खामगांवात आहे तरीही आजही खामगांवात रबडी आणायचे काम पडल्यास अनेकांची पावले मात्र फरशी वरील गुप्ता यांच्या हॉटेलकडेच वळतात.
क्रमश:
👉 नवनवीन व स्वादिष्ट पदार्थांच्या रेसिपी साठी नक्की बघा 👇
https://youtube.com/c/OnlyVeg
रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल ला subscribe करायला विसरु नका 🙏