"बहुजन हिताय एस.टी.कर्मचारी सुखाय"
सुरक्षितरित्या परिवहन मंडळाची मोटार हाकणारे चालक आणि वाहक यांची मेहनत खरच वाखाणण्याजोगी आहे. विदर्भ आणि खानदेशातील उन्हाळ्यात भर उन्हात सूर्य आग ओकीत असतांना मंडळाचे चालक व वाहक मोटारीच्या गरम संयंत्रा शेजारीच बसून गाडी चालवीत असतात. पिण्यासाठी बारदान्याच्या कपड्याने लपेटलेली बाटली असते शिवाय आगारामध्ये दुरुस्ती पथक सुद्धा राबत असते. अशा कर्मचा-यांची सुद्धा सरकारने इतर कर्मचा-यांप्रमाणे काळजी वाहणे आवश्यकच आहे.
महामंडळ कर्मचा-यांचा वेतनासाठी संप सुरु आहे. आजपावेतो राज्यभरात 376 एस.टी. कर्मचारी निलंबित झाले आहे, त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल झाली, कित्येक आत्महत्या झाल्या. श्रमाची किंमत, श्रमाला प्रतिष्ठा असायलाच हवी. “सबको मिले मेहनत के मुताबिक अपना अपना हिस्सा” याप्रमाणे सर्वाना त्यांच्या कामाचा योग्य असा मेहनताना मिळायलाच हवा आणि तो देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. थंडी, पाऊस आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूत आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी प्रवाश्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या गंतव्यस्थानी पोहचवण्यासाठी परिवहन मंडळाची मोटार हाकणारे चालक आणि वाहक यांची मेहनत खरच वाखाणण्याजोगी आहे. विदर्भ आणि खानदेशातील उन्हाळ्यात भर उन्हात सुर्य आग ओकीत असतांना मंडळाचे चालक मोटारीच्या गरम संयंत्रा शेजारीच बसून गाडी चालवीत असतात, सोबत वाहक सुद्धा असतोच. पिण्यासाठी बारदान्याच्या कपड्याने लपेटलेली बाटली असते शिवाय आगारामध्ये दुरुस्ती पथक सुद्धा राबत असते. अशा कर्मचा-यांची सरकारने सुद्धा इतर कर्मचा-यांप्रमाणे काळजी वाहणे आवश्यकच आहे. याच कर्मचा-यांच्या संघटनेने त्यांच्या मागण्यांसाठी ऐन दिवाळीत संप केला.नेमके जेंव्हा नागरिकांना फिरण्याचे जास्त काम असते तेंव्हाच हा संप झालेला आहे. खेड्यापाड्याच्या जनतेची तर फारच कुचंबणा होईल. दिवाळीच्या दिवसांत खाजगी प्रवाशी वाहतूकदार आपल्या वाहनांचे भाडे अव्वाच्या सव्वा वाढवितात. जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागतो शिवाय यांची वागणूक अरेरावीची. संप पुकारून आता बरेच दिवस लोटले आहेत. प्रशासनाने निलंबन व कारवाईचा इशारा दिला आहे. ऐन दिवाळीत कुणाचेही निलंबन न होवो. सरकारने व कर्मचारी संघटनेने सुद्धा जनता, कर्मचारी अशा दोघांचेही हित बघून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कित्येक कर्मचा-यांनी आत्महत्या सुद्धा केल्या. पण सरकार आर्यन, अमली पदार्थ, नावं गाणे, अंडी कशी उबवली इ बाबीतच जास्त व्यस्त आहे. हा लेख प्रकाशित होईतो कदाचित संप मिटलेलाही असू शकतो. महामंडळाकडे पैसाच नाही असे ऐकिवात आले आहे. पैसेच नाही तर मग मंडळ नफ्यात येईल अशा काही उपाययोजना करा ना ! एकीकडे शासन फुकट पैसे वाटते, धान्य वाटते अनेक योजनांमधून जनतेला ऐदी बनवते तर दुसरीकडे मेहनत करणा-यांना मेहनतीचा योग्य तो परतावा देत नाही त्यामुळेच ऐन सणासुदीच्या काळात कर्मचा-यांना असा मार्ग निवडावा लागला. परंतू त्यांनी जर काळ्या फिती लावून काम केले असते तर जनतेच्या मनात त्यांच्या विषयी आदर वाढला असता. पण अशा करण्याने सरकारने त्यांच्याकडे कितपत लक्ष दिले असते हा सुद्धा एक मुद्दा आहे. हा संप दिवाळी नंतर करण्यास हरकत नव्हती असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ही तळागाळातील जनतेसाठी उपयुक्त अशी सुविधा आहे. त्यांना परिवहन मंडळाच्या मोटारीचा किती आधार असतो. ग्रामीण भागातील गरोदर महिला दवाखान्यात जाण्यासाठी याच मोटारीला प्राधान्य देतात. कित्येक वेळा तर महिलांची प्रसूती सुद्धा परिवहन मंडळाच्या मोटारीतच झालेली आहे. असे हे परिवहन मंडळ जनतेच्या सुविधेसाठी आहे. म्हणून “बहुजन हिताय बहुजन सुखाय” असे ब्रीदवाक्य मिरवणा-या महामंडळ कर्मचा-यांना ऐन दिवाळीत संप करावा लागणे हि मविआ सरकारची नाचक्की करणारी बाब आहे. ड्रग्ज, बॉम्ब फोडणे यापेक्षा सरकारने व माध्यमांनी या संपाकडे, एस टी कर्मचा-यांच्या मागण्यांकडे। लक्ष देणे अधिक अपेक्षित नाही का ? एस.टी. कर्मचारी संपामुळे सामान्य जनांची मात्र गोची झाली आहे. एस. टी. च्या “बहुजन हिताय बहुजन सुखाय“ या ब्रीदवाक्याप्रमाणे बहुजन हिताय व एस.टी. कर्मचारी सुखाय असा काही सकारात्मक तोडगा मेहरबान सरकारं , न्यायप्रणाली, कर्मचारी संघटना यांनी सर्वांनी मिळून काढून या दिवाळीत सर्वाना “जो जे वांछील तो ते लाहो” असा काही निर्णय घ्यावा हीच तमाम कर्मचारी वृंद व महाराष्ट्रीय जनतेची सदीच्छा आहे.
Khup chhan
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा