खामगांवची खाद्य संस्कृती भाग-1
आज खाये दहीवडे ssssss
राजाभाऊ हे असेच प्रेरणादायी ‘कॉमन मॅन’ होते. साठी उलटल्यावरही कार्यरत राहणे, व्यवसायात सचोटी, लहान-थोर सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने बोलणे अशी राजाभाऊंची वागणूक सुद्धा नक्कीच प्रेरणादायी होती. आज चुटकीसरशी सर्व हाजीर होते, दोन मिनटात मॅगी, ऑर्डर दिल्यावर पिझ्झा त्वरीत हजर होतो परंतू त्याला “ आज खाये दहीवडेssssss ” अशी आरोळी देऊन जरी व्यवसाय करीत असले तरी आपुलकीने खाऊ घालणा-या राजाभाऊंच्या दहीवडे व इतर पदार्थांची सर मात्र नाही.
आजपासून आगामी 10 लेखात आपल्या आवडत्या खामगांवातील खाद्य संस्कृतीची आठवण , माहिती करून देणा-या 10 खाद्य सेवा देणा-यांंची म्हणजेच हॉटेल, फेरीवाल्यांची तसेच तत्सम व्यवसायांची माहिती करून घेऊ या. आजमितीस खामगांवात अनेक हॉटेल, भेळ, पाणीपुरी स्टॉल, आईस्क्रीम, कुल्फी , चहाचे स्टॉल इ विपुल प्रमाणात आहेत तरीही जुन्या हॉटेलचा दबदबा किंवा अरबीत आणखी एक चांगला शब्द आहे तो म्हणजे "रुतबा". या जुन्या उपहारगृहांचा रुतबा आजही कायम आहे. खाद्य संस्कृतीचा आजचा हा पहिला भाग.
बालपणीच्या मनावर कोरलेल्या अनेक घटना, अनेक व्यक्ती ह्या प्रत्येकाच्याच स्मरणात असतात. असाच एक लक्षात राहिलेला व्यक्ती, एक फेरीवाला आजपासून 30-35 वर्षांपुर्वी, त्याही आधीपासून खामगांव शहरांत दररोज खाद्य पदार्थ विक्री करीता येत असे. त्या काळी खामगांव आजच्या इतके विस्तारीत नव्हते. आज जितक्या खाद्य पदार्थांच्या गाड्या खामगांवात दिसतात तेवढ्या त्या काळात नव्हत्या. त्या काळात रुचीपालटाकरीता खामगांवकर या एका फेरीवाल्यावर व एखाददोन उपहारगृहांवर निर्भर होते. काळी टोपी, धोतर, सदरा घातलेल्या त्या व्यक्तीचे वय तेंव्हा 65 ते 70 च्या घरात असावे. संध्याकाळी “आज खाये दहीवडे ssssss” असली काहीतरी दात नसलेल्या तोंडाच्या बोळक्यातून त्याची आरोळी ऐकली की “राजाभाऊ आले“ हे लोकांना समजायला वेळ लागत नसे. त्वरीत त्यांच्याभोवती लोकं, लहान मुले गोळा होत व पाणी पुरी, दहीवडे व इतर अनेक पदार्थांचा स्वाद घेत असत. एक फेरीवाला व त्याचे नांव राजाभाऊ एवढेच काय ते त्या माणसासोबतचे नाते. परंतू आजही तो स्मरणात का असावा? हे एक कोडेच आहे. परंतू कालपरत्वे राजाभाऊंचे येणे बंद झाले. त्यांचे न येण्याचे कारण काय हे कधी कुणाकडून ऐकले नाही किंवा बालवयात राजाभाऊ का येत नाही ? याची चौकशी करण्याचे कधी मनांतही आले नाही. रक्ताचे नाते असलेले कुटुंब असते आणि मित्र, दैनंदिन परिचित फेरीवाले, परीट, भाजीवाले, चप्पल दुरुस्त करणारे, घरगुती सेवक, आपले पाळीव पशू यांचा समावेश असलेला तो आपला परिवार असतो. असे सरसंघचालक मोहनजी भागवतांनी 2018 मध्ये खामगांवला झालेल्या सभेत सांगितले होते. परंतू परिवारातील या लोकांची आपण दखल ती काय घेतो? आपल्या परिवारात असलेल्या या वरील लोकांना आपण किमंत ती काय देतो? विविध प्रसंगी आपणास त्यांचे स्मरण सुद्धा होत नाही. राजाभाऊंचे सुद्धा तसेच झाले. ते सुद्धा एक दैनंदिन परिचयाचे फेरीवाले होते. आपल्या परिवारातील होते. परंतू एका फेरीवाल्याचे येणे बंद झाल्याने कुणाला काही फरक पडला नाही. राजाभाऊ कुठे गेले, ते का येत नाही? याची कुणी चौकशी केली की नाही देव जाणे? कुणी चौकशी केलीही असेल तर ती बहुतांपर्यंत मात्र नक्कीच पोहोचली नव्हती. राजाभाऊ कोण होते, कुठले होते, जात काय, धर्म काय, आडनांव काय? हे आज खामगांवातील तत्कालिन तरुण आणि सध्याचे जेष्ठ नागरिक यांना सुद्धा ठाऊक नाही. जात- धर्म तर ठाऊक असण्याचे काही कारणही नाही. तसे राजाभाऊ हे काही फार मोठेही नव्हते, किंवा काही उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते वगैरे सुद्धा नव्हते. परंतू जिभेवर साखर ठेऊन सचोटीचा व्यवसाय करणारे होते. केवळ व्यवसायच नव्हे तर त्यांच्या ग्राहकांची संतुष्टी होईल हा सुद्धा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या सचोटीचा दाखला देण्यासाठी त्यांची एक गोष्ट आठवते. शुक्रवार असला की राजाभाऊ त्यांचा खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय असून सुद्धा ग्राहकांना " आज शुक्रवार आहे आंबट खाऊ नका" अशी आठवण करून देत. त्यांची ती लहानपणी नेहमीच ऐकू येत असलेली “आज खाये दहीवडे ssssss” ही आरोळी लक्षात राहून गेली. आजही दहीवडे खातांना राजाभाऊंचे स्मरण अनेकदा होते व खामगांवकर समवयीन व जेष्ठांना सुद्धा तसे होत असावे. प्रेरणा घेण्यासाठी नेहमीच काही नावाजलेल्या,फार मोठ्या व्यक्तींची गरज नसते. प्रसंगी एखादा ‘कॉमन मॅन’ सुद्धा प्रेरणादायी असतो. राजाभाऊ हे असेच प्रेरणादायी ‘कॉमन मॅन’ होते. साठी उलटल्यावरही कार्यरत राहणे, व्यवसायात सचोटी, लहान-थोर सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने बोलणे अशी राजाभाऊंची वागणूक सुद्धा नक्कीच प्रेरणादायी होती. आज चुटकीसरशी सर्व हाजीर होते, दोन मिनटात मॅगी, ऑर्डर दिल्यावर पिझ्झा त्वरीत हजर होतो परंतू त्याला “आज खाये दहीवडे ssssss” अशी आरोळी देऊन जरी व्यवसाय करीत असले तरी आपुलकीने खाऊ घालणा-या राजाभाऊंच्या दहीवडे व इतर पदार्थांची सर मात्र नाही.
वास्तविक पाहता राजाभाऊं बाबतचा हा लेख वर्ष 2018 मध्येच लिहिलेला आहे. खाद्य संस्कृतीची लेख मालिका असल्याने या मालिकेत हा लेख सर्वात प्रथम द्यावासा वाटला. त्यावेळी लेख प्रसिद्ध झाल्यावर. एक दिवस सायंकाळी माझा भ्रमणध्वनी खणाणला. अनोळखी नंबर होता. पलिकडून एक महिला हिंदी भाषेत बोलायला लागल्या " आपने हमारे ससूरजी के बारेमे लेख लिखा, हम सबको बहोत अच्छा लगा आपका बहोत बहोत धन्यवाद " योगायोगाने तेंव्हा राजाभाऊंचे भाऊ सुद्धा आलेले होते ते सुद्धा बोलले , अंतिम दिवसांत राजाभाऊ त्यांच्याकडेच म्हणजे ग्वाल्हेर येथे होते असे सांगून त्यांनी सुद्धा आभार व्यक्त केले. राजाभाऊंची कुणीतरी घेतलेली दखल पाहून त्यांच्या नातेवाईकांनी केलेले आभार प्रकटन मला राजाभाऊंच्या आशीर्वाद प्राप्तीचा व एखाद्या पुरस्कार प्राप्तीचा आनंद देऊन गेले.
क्रमश:
:
छान. हृदयस्पर्शी...
उत्तर द्याहटवाThank You
हटवाAtishay chhan likhan agadi june divas dolyasamor aale
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाअतिशय सुंदर लिहिलेय!
उत्तर द्याहटवा🙏
हटवाअतिशय सुंदर लिहिलेय!
उत्तर द्याहटवासुंदर विनु
उत्तर द्याहटवा