लता नांवातच ताल होता
काय तो उंच चढणारा,गोडव्यात मधालाही मागे टाकणारा आवाज होता. आकाशवाणीवर सकाळी ऐकलेले लता दीदींनी गायलेले अभंग, देशभक्तीपर गीते व नतंर हजारो जुनी फिल्मी गाणी ऐकत-ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलेच आम्ही. असंख्य गाण्यातील कोणत्या गाण्यांबद्दल लिहावे? “ये मुलाकात एक बहाना है” खानदान चित्रपटातील हे गीत कितीही पुनरावर्तने होवोत कंटाळा तो मुळी येतच नाही. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या लता दिदींनी “मै हुं अपने सनम की बाहो मे, मेरे कदमो तले जमाना है” हा आपल्या सोबत्या सोबत असलेला भाव शब्दांत किती सुंदर व्यक्त केला आहे.
लता मंगेशकर या सुविख्यात गानसम्राज्ञी 6 फेब्रुवारी रोजी काळाच्या पडद्याआड गेल्या. अखिल भारत शोकसागरात बुडाला. लता दीदींना कोरोनाची लागण झाल्यापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. जेंव्हा त्यांच्यावर Aggressive Therapy सुरु झाली तेंव्हा मात्र काळजाचे ठोके चुकू लागले होते. अखेर त्यांच्या दु:खद निधनाची बातमी येऊन धडकलीच व अपरिमित असा शोक समस्त भारतीयांना झाला. आपल्या गोड आवाजाने सिनेमाच्या सुरुवातीच्या काळापासून ते अगदी काल-परवा पर्यंतच्या काजोल, ग्रेसी सिंग सारख्या नायिकांना आपला आवाज देणा-या लता दीदी या साध्या, लाघवी बोलणा-या व सिनेसृष्टीतील कलाकार, खेळाडू, राजकारणी यांच्याशी सुहृदयी संबंध राखणा-या लता दीदींचे जाणे म्हणजे संगीत क्षेत्र व सिनेसृष्टीची न भरून निघणारी हानी होय. वडील मा. दिनानाथ यांच्या नंतर कुटुंबाची देखभाल करत, लहान भावंडाना सुद्धा चांगली शिकवण देत पुढे आणत त्या स्वत:चे सुद्धा करीअर करीत होत्या. आजकालच्या काळात आपण पाहतो की केवळ स्वत:च्या करीअर पुरतीच धावपळ, उठाठेव सुरु असते. लतादिदींनी मात्र कुटुंबीयांसह इतरांना सुद्धा लता असूनही वटवृक्षाप्रमाणे आधार दिला व वाटचाल करीत राहिल्या. 30 हजार पेक्षाही जास्त गाणी गायली , आनंदघन नावाने संगीत सुद्धा दिले. त्यांच्या गायनाबद्दल व अवीट गोड अशा गाण्यांबद्दल लिहू गेल्यास सब धरती कागज करू , लेखनी सब वनराय , सात समुद्र की मसी करू या कबीरांच्या गुरुसाठी लिहिलेल्या दोह्याप्रमाणे समस्त धरतीचा कागद, सात समुद्राची शाई, व सर्व वनांतील झाडांची लेखणी करून लता दीदींबाबत लिहू गेलो तरी ते लिहिता येणे अशक्य आहे. तसेच लता दीदी यांच्या निधनानंतर काही बोलणे, लिहिणे हे अशक्यच झाले. म्हणूनवं सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी सुद्धा “लता मंगेशकर यांच्या निधनामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनाला ज्या वेदना झाल्या व जी पोकळी निर्माण झाली त्याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे” असे समर्पक विधान केले. लता दीदी यांच्या अंतिम संस्काराचे वृत्त पाहत असतांना मन सुन्न झाले होते. अनेकांचे लेख येऊ लागले होते परंतू मी मात्र स्तब्धच, निशब्द झालो होतो. एका मित्राचा फोन सुद्धा आला की, “इतके लिहीतो लता दीदींबद्दल काहीच नाही लिहिले रे” , “लिहील रे” मी उत्तरलो. अनेक विचार मनात घोळत होते. किती एकापेक्षा एक सरस अशी गाणी, काय तो उंच चढणारा, गोडव्यात मधालाही मागे टाकणारा आवाज. आकाशवाणीवर सकाळी ऐकलेले लता दीदींनी गायलेले अभंग, देशभक्तीपर गीते व नतंर हजारो जुनी फिल्मी गाणी ऐकत-ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलेच आम्ही. असंख्य गाण्यातील कोणत्या गाण्यांबद्दल लिहावे? “ये मुलाकात एक बहाना है” खानदान चित्रपटातील हे गीत कितीही पुनरावर्तने होवोत कंटाळा तो मुळी येतच नाही. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या लता दिदींनी “मै हुं अपने सनम की बाहो मे, मेरे कदमो तले जमाना है” हा आपल्या सोबत्या सोबत असलेला भाव शब्दांत किती सुंदर व्यक्त केला आहे. तेच “आजकल पांव जमी पर नही पडते मेरे” बाबत, अभिनेत्री साधनावर चित्रित झालेले “तेरा मेरा प्यार अमर” किती गोड, पहायलाही व ऐकायलाही सुंदर. हजारो गाणी आहेत. “दिल तो है दिल दिल का ऐतबार क्या कीजे?”, रेखा वर चित्रित “कैसी लग रही हुं मै?” ही सर्व गाणी हा लेख लिहितांना कानात घुमत आहेत. आयेगा आयेगा आनेवाला, पंछी बनू उडती फिरू अशा जुन्या गीतांपासून ते अगदी आजच्या “कितने अजीब रिश्ते है यंहा पे“, “मेरे ख्वाबो मे जो आये”, “मधुबन मे जो कन्हैय्या” ही गीते तसेच मैने प्यार किया, पत्थर के फुल, सनम बेवफा या चित्रपटातील गीते. अशा गीतांबाबत लिहू गेल्यास उपरोक्त दोह्याप्रमाणेच गत होईल. म्हणूनच काय लिहावे कळत नव्हते, शब्दांची कृपा होत नव्हती, लिहिण्यास उशीर झाला खरा परंतू लिहवित्याने आजचा हा लेख स्फुरण्याचे निमित्त घडवलेच. हे निमित्त म्हणजे खामगांवच्या पशूंच्या दवाखान्याजवळ रस्त्याच्या कडेला मला दिसलेले एक श्रद्धांजलीचे बॅनर. आत्मशक्ती ब्रास बँड पार्टीने लावलेले हे बॅनर पाहून मला आश्चर्य व आदर दोन्ही वाटले. मी या लेखासह दिलेला त्या बॅनरचा त्वरीत फोटो काढला. आपण ज्या प्रतिथयश गायिकेनी गायलेली गाणी आपल्या बँडवर वाजवली त्यामुळे आपला चरितार्थ चालला त्या गायिकेप्रती आदराची, कृतज्ञतेची भावना प्रकट करणारे ते त्या बँड पार्टी वाल्यांनी लावलेले ते बॅनर म्हणजे आपल्या देशाची एकात्मता, समाजिक समरसता प्रकट करणारे वाटले. या बँड पार्टीने लता दीदींना श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुद्धा परवा सकाळी घेतला होता. बँड पार्टीचे संचालक मोतीराम बोरकर यांना तेथील बोर्डवरचा नंबर पाहून फोन केला, त्यांच्याशी बोललो त्यांना बरे वाटले, “साहेब या माउलीने म्हटलेली गाणी आम्ही वाजवतो, आमचे घर चालते. आमचा बी बँडचा मंजे संगीताचा धंदा हाय, लता माऊलीने बी लगन न करता संगीताशीच लगन केलतं, मंग या माऊलीसाठी एक बॅनर बी नायी लावू शकत काय?“ लता मंगेशकर यातील लता या नांवास उलट लिहिल्यास ताल शब्द निर्माण होतो, अशा नावातच ताल असणा-या legendary गायिकेस पंतप्रधानांपासून ते खामगांवच्या आत्मशक्ती बँड पार्टीने वाहिलेली श्रद्धांजली ही त्या जनसामान्यांच्या मनातल्या ख-या “भारतरत्न” होत्या याचे द्योतक आहे.