करवा चौथ
हिंदू संस्कृती म्हणजे नाना प्रकारचे उत्सव, सण , व्रत वैकल्ये साजरी करणारी संस्कृती. झाडे , पशू , पक्षी , जल पूजन करणारी व पंचमहाभूतांप्रती आदर बाळगणारी जगातील एकमेव अशी संस्कृती , एक विचारधारा. भारताच्या सर्वा दिशांत निरनिराळे सण साजरे केले जातात, असाच एक सण म्हणजे करवा चौथ. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो. भारताचा उत्तर भागात व पश्चिम भागात हा सण साजरा केला जातो. करवा चौथ हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. भारताच्या जम्मू कश्मीर , हिमाचल प्रदेश, पंजाब , उत्तर प्रदेश , हरियाणा , मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांत मुख्यत: हा सण साजरा केला जातो. करवा चौथ या सणाची माहिती देशभरातील जनतेला ठाऊक झाली ती मुख्यत्वे 80 च्या दशका पर्यन्त आलेल्या हिंदी चित्रपटातून. माझ्याप्रमाणेच अनेकांना करवा चौथ हा सण चित्रपटांनीच लक्षात आणून दिला आहे. पत्नी आपल्या पतीसाठी चाळणीतून चंद्राकडे पाहते एवढीच काय ती करवा चौथ या सणाबाबतची माहिती. चित्रपटातील नटी आपल्या पतीला "आज मैने तुम्हारे लिये करवा चौथ का व्रत रखा है | असे म्हणत असते नट मात्र कुठेतरी नशेत किंवा इतर कुणाच्या प्रेमात पडलेला असा असतो , थिएटर मध्ये लेडीज स्टॉल मध्ये अश्रूंच्या धारा लागतात , चित्रपटात मग नट पुन्हा नटीला भेटतो व मग नंतर सर्व सुरळीत होते थिएटर मध्ये सुद्धा हास्य फुलते असा मेलोड्रामा अनेक हिन्दी चित्रपटातून पाहिला व करवा चौथ ची माहिती झाली. पुर्वीचे हिन्दी चित्रपट म्हटले की गाजर का हलवा , मुली के पराठे , एक पियानो व पियानो गीत व एक करवा चौथ प्रसंग असे समीकरणच असायचे. असो ! परंतू पुढे करवा चौथ या सणाची माहिती झाली. हा सण ग्रामीण तथा शहरी स्त्रिया मोठ्या उत्साहाने साजरा करतात (आज काल इंस्टाग्राम , फेसबुक , व्हाट्स अप यावर फोटो शेअर करण्यासाठी म्हणून जरा जास्तच उत्साह असतो) शास्त्रानुसार करवा चौथ हे व्रत कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करायचे असते. पतिच्या दीर्घायु ष्यासाठी व अखण्ड सौभाग्यासाठी म्हणून या दिवशी भालचन्द्र गणेशाचे पूजन केले जाते. संकष्टी चतुर्थी प्रमाणे उपवास ठेऊन रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर मग भोजन करायचे असते. प्रत्येक घरी त्या-त्या घरच्या रिती रिवाजानुसार महिला हा सण साजरा करतात. स्त्रिया चन्द्रोदयापर्यन्त उपवास ठेवतात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला कारक चतुर्थी असे म्हणतात तसेच करवा म्हणजे मातीचे पसरट भांडे व भांड्यांची सुद्धा पुजा केली जाते. स्त्रिया या भांड्यांची आदान प्रदान सुद्धा करतात त्यावरून करवा-चौथ हा शब्द रूढ झाला. या दिवसाची एक कथा सुद्धा सांगितली जाते. एकदा एका स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी चंद्रोदया पर्यन्त उपवास ठेवला ,काहीही खाल्ले नाही तेंव्हा तिच्या भावांना तिची चिंता वाटली तेंव्हा भावांनी एक युक्ती केली पिंपळाच्या झाडावर चाळणी व दिवा घेऊन चढले व दिव्याचा प्रकाश चाळणीतून बहिणीला दाखवला खाली असलेल्या भावानी बहिणीला आवाज दिला व तो प्रकाश दाखवून चंद्रोदय झाला असे सांगितले तिने भोजन केले. भोजन झाल्यावर तिचा पती मरण पावला. राणीने तिला तू व्रत तोडले म्हणून पती मरण पावला असे सांगितले व पुन्हा वर्षभर हे व्रत पालन कर असे सांगितले. तिने तसे केल्यावर तिचा पती जिवीत झाला म्हणून हिंदू महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण साजरा करीत असतात. हा सण केवळ विवाहित स्त्रियाच साजरा करीत असतात. कोणत्याही जाती, वर्ण, संप्रदायातील स्त्रीला हा दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. 12 किंवा 16 वर्षांनंतर या व्रताचे उद्यापन केले जाते किंवा ज्या स्त्रियांना आजीवन हे व्रत करण्याची इच्छा असेल तर त्यांना तशी अनुमती आहे. सध्या अनेक दिवस साजरे केले जातात त्यानुसार आजकाल करवा चौथ या दिवसाला पती दिवस असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील अनेक हिन्दी भाषिक हिंदू महिला गेल्या कित्येक वर्षांपासून हा सण उत्साहाने साजरा करत असतात. महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेला या सणाची माहिती मात्र अल्पशीच आहे त्यासाठीच हा लेख. करवा चौथची ही "साठा उत्तरी कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण"॰
✍️विनय वि.वरणगांवकर©
खुप चांगली माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाछान महीती दिलीत
उत्तर द्याहटवा